जे कळतं, ते वळत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 06:01 AM2021-09-19T06:01:00+5:302021-09-19T06:05:01+5:30

स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना? तसंच आहे मनाचं! उपाय कळून काय उपयोग ?- कृती करावीच लागणार ना?

I know everything, but I can't do it | जे कळतं, ते वळत का नाही?

जे कळतं, ते वळत का नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देपाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?

डॉ. राजेंद्र बर्वे

‘मला न सगळं कळतं, सगळं म्हणजे सगळंच अगदी कळतंच! आपल्याला ना दोन मनं असतात. एक कॉन्शस माइंड आणि अनकॉन्शस. मला ना तशीच दोन मनं आहेत.’ माझ्यासमोर बसून बोलणारी महिला सिक्सरवर सिक्सर मारत होती.

‘कळतंय ना तुम्हाला?’

मी मान डोलावली, ‘म्हणजे साधारण कळतंय..!’

‘तर माझं अनकॉन्शस माइंड आहे ना, त्याच्यापर्यंत संदेश पोहोचतच नाही. त्यामुळे अनकॉन्शस माइंडमधून योग्य मेसेज मला म्हणजे कॉन्शस माइंडला मिळतच नाहीत!’

- हे असे दणादण षटकार मारणाऱ्या फलंदाजाचं अवसान बघताबघता गळालं. डोळ्यात अश्रू आले! मी टिश्यू पेपर दिला. काही वेळ तसाच गेला. असं बरेचदा होतं. आपली समस्या नीट कळली आहे असं समजून आपण स्वत:ची समजूत काढतो. वरवर समजूत पटते; पण ‘दिल हैं के मानता नही’ अशी अवस्था होते.

‘मला ना खूप भीती वाटते. मनाला कितीही समजावलं, तरी भीती संपत नाही. भीतीचं रूपांतर काळीज कुरतडणाऱ्या काळजीत होतं. धीर सुटतो. सगळं कळतं, पण वळत नाही! मग वाटतं कळलंच नसतं तर बरं झालं असतं. अज्ञानातच सुख असतं ना!’

शेवटी मी त्यांना शांत करीत म्हणालो, ‘म्हणजे तुमची समस्या तुम्हाला कळली आहे; पण प्रत्यक्षात त्या कळण्यानुसार तुमच्यात काही फरक पडत नाहीय. कळलेलं वळत नाहीय, समजेची उमज होत नाहीये!’

‘होय, अगदी बरोबर!’ त्या म्हणाल्या!

रुग्ण तसे साधे असतात. त्यांच्या सभोवतालचे लोक खरं म्हणजे त्यांची टिंगलटवाळी करीत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो म्हणून ते.

‘मी मानसशास्त्राचा खूप अभ्यास करते वाटलं की ते वाचून सगळं आपोआप वळू लागेल..!’

‘तसं नसतं हो,’ मी त्यांना म्हणालो, ‘हे सगळे त्रास मानवशरीर धर्माचे असतात. मनुष्य जन्माला धरूनच येतात. अभ्यास करून माहिती आणि कधी ज्ञानही मिळतं; पण त्यामुळे आपल्या वैयक्तिक त्रासाचे, विकाराचे नि यातनेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे एक फायदा होतो. आपण आपलं दु:ख, यातना आणि विकाराचं स्वरूप स्वीकारतो; पण समजा मलेरियाचा ताप आला, तर त्याची सर्व लक्षणं पारखून मलेरिया बरा होईल का? ताप कसला आहे ते कळलं तरी तो आपोआप उतरत नाही ना! तुमचं तसं होतंय. समस्येचं स्वरूप आणि मनाची अशी मांडणी कळली तरी प्रश्न आपोआप विरून जात नाहीत. त्याकरिता वेगळे उपाय करावे लागतात. मनाला चुचकारून, गोडीगुलाबीने पटवून नव्या सवयी लावून घ्याव्या लागतात. अगदी घरगुती उदाहरणावरून ही लक्षात येईल तुमच्या!’

बाई खूप विचारात पडल्या आणि डोळे पुसून म्हणाल्या, ‘आलं लक्षात, अहो स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना?’

मी म्हणालो, ‘अगदी बरोबर समजलं. मी या प्रक्रियेला माइंड लर्निंग आणि बॉडी लर्निंग म्हणतो. म्हणजे मन शिकून समजून घेता येतं, पण अनुभवानं, प्रयत्नानं शरीराच्या अंगवळणी पडावं लागतं. त्याला काही काळ जावा लागणारच ना! काही भाज्या पटकन शिजतात, तर काहींना बराच वेळ लागतो, त्यासाठी समज आणि चिकाटी हवी. सगळ्या भाज्या आणि पदार्थ एकाच विशिष्ट वेळात शिजलेच पाहिजेत असा हट्ट का?’

- बाई एकदम सावरल्या. म्हणाल्या,

‘माझं काय चुकलं हे लक्षात येतंय आता! मी भीती कशी व का निर्माण होते यावर नेटवर खूप रिसर्च केला. खूप माहिती जमा केली; पण पाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?’

मी हसत म्हणालो, ‘कोच खेळाडूला शिकवितो, शिक्षक शिक्षण देतात; पण खेळायचं, शिकायचं, त्यासाठी धडपडून प्रयत्न करायचे हे आपलं काम असतं ना!’

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

 

Web Title: I know everything, but I can't do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.