मकरंद जोशी
मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगालमधील सुंदरबन नॅशनल पार्क, कर्नाटकातील पत्तडकल येथील प्राचीन मंदिरे, जयपूरचं जंतर-मंतर आणि आग्य्राचा ताजमहाल यात काय साम्य आहे? ... नाही नाही हा कोण होईल मराठी करोडपतीचा निवड प्रश्न नाहीये, पण पर्यटनाची आवड असलेल्या, प्रवासाची हौस असलेल्या व्यक्तीला या प्रश्नाचं उत्तर देणं जड जाणार नाही. वरकरणी पाहता एकमेकांशी काही संबंध नसलेल्या या ठिकाणांमधील साम्य म्हणजे ही सगळी ठिकाणं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत समाविष्ट झालेली आहेत.
युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अॅण्ड कल्चरल आॅर्गनायझेशन, या संस्थेची जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, या कमिटीतर्फेएक वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम चालवण्यात येतो. या कार्यक्र माअंतर्गत जगभरातील सांस्कृतिक, ऐतिहासिक, कलात्मक आणि नैसर्गिक वास्तू, जागा यांना संरक्षण दिले जाते. या कार्यक्र माला सुरुवात झाली ती पन्नासच्या दशकात.
इजिप्तमध्ये नाइल नदीवर एक मोठं धरण बांधण्यात येणार होतं, या धरणामुळे इजिप्तमधील हजारो वर्षांपूर्वीची मंदिरे, मूर्ती, वास्तू बाधित होणार होत्या. त्यांच्या संरक्षणासाठी इजिप्त सरकारने युनेस्कोला विनंती केली आणि सुरू झाली एक आंतरराष्ट्रीय मोहीम. या मोहिमेत जगभरातील पन्नास देशांनी आर्थिक सहयोग दिला आणि तीस वर्षांमध्ये इजिप्तचा प्राचीन वारसा मूळ स्थानावरून हलवून उंचावर स्थापन करण्यात यश आले. या मोहिमेमुळे जगभरात असलेल्या मानवी इतिहासातील सांस्कृतिक, ऐतिहासिक, पारंपरिक, कला कौशल्याच्या ठेव्याचे जतन व्हायला हवे हा विचार पुढे आला आणि अशा प्रकारची हेरिटेज यादी तयार करण्याचे काम सुरू झाले.
१९७८ साली युनेस्कोची जी पहिली हेरिटेज ठिकाणांची यादी प्रकाशित झाली त्यात दक्षिण अमेरिकेतील कितो या शहरापासून ते जर्मनीमधील आखेन कॅथेड्रलपर्यंत मानवनिर्मित ठिकाणांप्रमाणेच, यू.एस.ए.मधील यलो स्टोन नॅशनल पार्क, इथिओपियातील सिमिएन नॅशनल पार्क अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ठिकाणांचाही समावेश होता.
सध्या युनेस्कोच्या यादीत आॅस्ट्रेलियातील ग्रेट बॅरिअर रीफपासून ते पेरूमधील माचू पिचूपर्यंत आणि मोरोक्को मधील कुतुबिया मशिदीपासून ते कम्बोडियातील अंगकोर वटपर्यंत जगभरातील १६५ देशांमधील १०५२ ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील ८१४ जागांना सांस्कृतिक महत्त्व आहे, तर २०३ जागांना नैसर्गिक महत्त्व आहे आणि ३५ जागा मिश्र वर्गातल्या आहेत. आता युनेस्कोच्या जागतिक पटलावर भारताचे स्थान आहे सहावे, जास्तीत जास्त युनेस्को साइट्सची उतरत्या क्र माने यादी करायची झाली तर त्यात पहिला क्र मांक येतो इटलीचा (५१ ठिकाणे) नंतर आहे चीन (५०) त्यानंतर आहे स्पेन (४५), फ्रान्स (४२), जर्मनी (४१) आणि नंतर आहे आपला भारत (३५).
या यादीकडे नजर टाकल्यावर लक्षात येतं की आपण आपल्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष जतन करायला आणि जगासमोर मांडायला किती कमी पडतो.
भारतातील युनेस्को हेरिटेज यादीची विगत करायची झाली तर आसाम, बिहार, चंदिगढ, दिल्ली, गोवा, गुजराथ, हिमाचल, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम, प. बंगाल या राज्यांमध्ये ही ठिकाणे विखुरलेली आहेत.
भारतातील युनेस्कोच्या यादीची सुरुवात १९८३ झाली. आग्य्राचा ताजमहाल आणि अजंठ्याची लेणी या दोन जागा पहिल्यांदा यादीत समाविष्ट करण्यात आल्या. आता भारतातील एकूण ३५ ठिकाणे नोंदवण्यात आली आहेत, त्यात २७ ठिकाणे सांस्कृतिक महत्त्वाची तर सात ठिकाणे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची आणि एक मिश्र प्रकारचे (सिक्कीममधील ‘खांगछेझोंग नॅशनल पार्क) स्थान आहे.
भारतातल्या युनेस्को साइट्समध्ये कमालीचे वैविध्य आहे, शिमला आणि उटीच्या माउंटन रेल्वेपासून ते भीमबेटकाच्या इसवीसनपूर्व एक लाखमध्ये काढलेल्या गुहेतील आदिमानवाच्या भित्तीचित्रांपर्यंत या ठिकाणांमधून भारतीय संस्कृतीच्या, परंपरेच्या प्रवाहाचे अचंबित करणारं दर्शन घडतं. या यादीत बिहारमधील इसवीसनपूर्व ३ मध्ये अस्तित्वात असलेल्या नालंदा विद्यापीठाचे अवशेष जसे आहेत, त्याचप्रमाणे ऐन ब्रिटिश राजमध्ये बांधलेलं मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वेस्थानकही आहे.
आसाममधील एकशिंगी गेंड्यांचे आश्रयस्थान असलेल्या काझिरंगा नॅशनल पार्कपासून ते राजस्थानमधील कुंभलगड, चित्तोडगड, रणथंबोर, झालवाड, जैसलमेर गोल्डन फोर्ट या किल्ल्यांपर्यंत ही ठिकाणे, पर्यटकांसाठी पहायलाच हवीत या प्रकारची आहेत. या यादीतील पश्चिम बंगालमधील सुंदरबन नॅशनल पार्क खरोखरच अनोखा आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन महानद्या बंगालच्या उपसागराला मिळताना जो त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे, त्यात हा नॅशनल पार्कआहे. ५४ लहान मोठ्या बेटांनी मिळून बनलेल्या या नॅशनल पार्कला नाव मिळालं आहे ते इथे सापडणाऱ्या ‘सुंद्री’ या झाडावरून. हा सगळा दलदलीचा, पाणथळ प्रदेश असल्याने इथे मँग्रूव्ह अर्थात खारफुटीचे अरण्य पाहायला मिळते. लहान लहान बेटं, त्यांच्याभोवती असलेला खाऱ्या पाण्याचा वेढा, या बेटांवर वाढलेलं खारफुटीचं जंगल आणि या जंगलाच्या आश्रयाने राहणारा ‘दिख्खन रॉय’ अर्थात पट्टेरी वाघ त्यामुळे हा परिसर एखाद्या काल्पनिक प्रदेशासारखा वाटतो. त्यात इथल्या वाघांना हे ‘नरभक्षकतेचं’ वलय मिळालेलं आहे त्यामुळे या गूढ जंगलाची रहस्यमयता आणखी वाढते.
भारतातल्या इतर नॅशनल पार्क्समध्ये आपण जिप्सी सफारी करतो, सुंदरबनच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथे लॉन्चमधून फेरफटका मारण्याशिवाय पर्याय नसतो. त्यात इथले दोबंकी, सजनखाली, संध्याखाली असे जे वॉचटॉवर्स आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग जाळीने बंदिस्त केला असल्याने, त्यावरून चालतानाही मनावर दडपण येतं.
पट्टेरी वाघ हे मुख्य आकर्षण असलं तरी सुंदरबन हे एकापरीनं सागरी उद्यान असल्यानं इथे आॅलिव्ह रिडले टर्टल, इश्चुरियन क्र ोकोडाइल, रिव्हर डॉल्फिन असे अनोखे जलचरही पाहायला मिळतात. सुंदरबनची भेट संस्मरणीय होते ती इथल्या पक्षी दर्शनाने. रूफस किंगफिशरपासून ते व्हाइट बेलिड सी इगलपर्यंत आणि कॉमन स्नाइपपासून ते स्वॅम्प पारट्रिजेसपर्यंत इथली पक्षांची दुनिया तुमची भेट रंगतदार करून जाते. यापुढला पर्यटनाचा बेत आखताना कोलकत्याजवळील या नॅशनल पार्कचा विचार अवश्य करा. अगदी आपल्या महाराष्ट्राचं म्हणाल तर अजंठा, वेरूळ, एलिफंटा (घारापुरी), मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, साताऱ्याजवळचे कासचे पुष्प पठार यांची नोंद युनेस्कोच्या यादीत झाली आहे. त्यामुळे किमान ही ठिकाणे तरी पाहणे आपलं कर्तव्यच आहे.
त्याचबरोबर भारतातील पर्यटनाचा बेत आखताना राजस्थानमध्ये जाणार असाल तर जयपूरचं जंतर-मंतर, चित्तोडगड किंवा कर्नाटकात जाणार असाल तर हम्पीचे प्राचीन अवशेष, पट्टदकल येथील शिल्पांनी नटलेली मंदिरे, मध्य प्रदेशला जाणार असाल तर सांचीचा भव्य स्तूप, दिल्लीला जाणार असाल तर कुतुबमिनार, हुमायुनूचा मकबरा अशा ठिकाणांचा समावेश करायला विसरू नका. आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा हा कलात्मक, ऐतिहासिक वारसा साद घालतोय. त्याला आपण दाद द्यायलाच हवी.
(लेखक पर्यटन व्यवसायात कार्यरत आहेत.)