शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

द ग्रेट परफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 06:09 IST

शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर पुलंना आठवताना.. ...ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही...

ठळक मुद्देपुलंचा खेळिया म्हणून अवतार मान्य केला की त्यांचा प्रचंड मोठा पैस लक्षात येतो...

मुकेश माचकरस्थळ : ‘१, रूपाली’ हा तेव्हाच्या महाराष्ट्रातला कदाचित सर्वाधिक सर्वज्ञात आणि ग्लॅमरस असा पत्ता.वेळ : भल्या सकाळची.त्या पत्त्यावर कुमार गंधर्वांपासून पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर अशा अनेक मान्यवर अभ्यागतांनी आसनस्थ होऊन धन्य केलेला एक साधासा काळा सोफा. त्या सोफ्यावर बसलेला एक तरुण लेखनिक आणि समोर त्याचं दैवत... त्या घराचे मालक, अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे.वर्तमानपत्रात उपसंपादक असलेल्या पंचविशीच्या त्या लेखनिकाला पुलंची भाषणं, त्यांच्याच घरात बसून, ऐकून (खासगी संग्रहातल्या कॅसेट गहाळ होऊ नयेत आणि त्यांच्या नक्कलप्रति निघू नयेत, म्हणून सुनीताबार्इंनी कटाक्षाने घेतलेली ही खबरदारी) उतरवून काढण्याची कामगिरी मिळाली होती. तेव्हाच्या तंत्रानुसार वॉकमनमध्ये कॅसेट घालून प्ले/पॉझ करत करत भाषण ऐकायचं आणि ते मुळाबरहुकूम उतरवून काढायचं हे त्याचं काम. एरवी हे काम सुरू असताना हॉलमध्ये कोणीही असणार नाही आणि लेखनिकाला डिस्टर्ब करणार नाही, याची खबरदारी सुनीताबाई घेत.त्या एका सकाळी मात्र खुद्द पु.ल.च एक जाडजूड पुस्तक घेऊन ते वाचत असल्याचा अभिनय करत समोर बसले होते... अभिनय अशासाठी की त्यांचं त्या पुस्तकाच्या वाचनात मुळीच लक्ष नव्हतं, हे साक्षात पु.ल.च समोर असल्यामुळे अतिशय कॉन्शस झालेल्या लेखनिकाच्या लक्षात आलं होतं. ते मिश्कील डोळ्यांनी सतत पुस्तकावरून कुतूहलाने लेखनिकाकडे आणि त्याच्या उद्योगाकडे पाहात होते.अखेर एका टप्प्याला पुलंना शांतता असह्य झाली. पुस्तक बाजूला ठेवून (आतला कानोसा घेतलाच असणार) आणि ‘अरे वा, तुम्ही फार वेगाने उतरवून घेताय मजकूर, कसं काय जमतं हे’ वगैरे प्रोत्साहनपर कौतुक करून शेवटी एकदम गुगली टाकला, ‘बरं जमलंय ना भाषण?’लेखनिक काय बोलणार? त्याला एकदम अमिताभ बच्चनने कॅमेऱ्यासमोर तीन-चार गुंडांची एकसाथ धुलाई केल्यावर ‘बरी जमतीये ना अ‍ॅक्शन’ किंवा सुनील गावसकरने मख्खन स्क्वेअर कट मारल्यावर ‘फुटवर्क बरं होतं ना,’ असं काहीतरी विचारल्यासारखंच वाटून गेलं.तेवढ्यात आतून सुनीताबार्इंनी येऊन ‘भाई, तू गप्पा मारत बसलास तर त्यांना वेळेत काम करता येणार नाही,’ असं म्हणून त्यांना आत नेलं आणि ती चर्चा तिथेच थांबली.या प्रसंगाला आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. तरीही ‘बरं जमलंय ना भाषण?’ हे विचारणारा तो लोभस, मिश्कील आणि निरागस चेहरा डोळ्यांसमोर ताजा आहे... त्यांच्या त्या प्रश्नात ‘कसला भारी बोललोय ना मी’ असा आविर्भाव नव्हता, त्यांच्या श्रेष्ठत्वाचा खुंटा उगाच विनम्रतेच्या मिषाने हलवून बळकट करण्याची आयडियाबाजी नव्हती...ती एका बहुरूप्याची, एका खेळियाची सोत्कंठ विचारणा होती... हा खेळ जमलाय ना? भावतोय ना?... सिंपल!पु.ल. हे त्यांच्या हयातीतले आणि कदाचित मराठीतले (देवांच्या पोथ्या, नाक कसं शिंकरावं वगैरेंची जीवनविषयक शिकवण देणारी ‘गुरुजी’ छाप पुस्तकं आणि इंटरनेटवरून माहिती भाषांतरून जुळवलेली ज्ञानवर्धक पुस्तकं यांच्याशी पुलंची स्पर्धा नव्हती, असं गृहीत धरलं आहे इथे) सर्वाधिक खपाचे लेखक होते, यापुढे त्यांचं परफॉर्मर असणं, खेळिया असणं, झाकोळलं गेलं सतत.आजही पु.लं.चं सगळं मूल्यमापन हे त्यांच्या लेखनाच्या विशिष्टकालीनत्वावर, त्यांच्या तथाकथित मर्यादित भावविश्वावर दुगाण्या झाडण्यात संपून जातं.पु.ल. आता अपील होत नाहीत, हे ज्यांना ते हयात असतानाही अपील होत नव्हतेच, तेच एकमेकांना सांगत असतात. एक लेखक म्हणून आपल्या मर्यादा इतरांपेक्षा पु.लं.ना अधिक माहिती होत्या आणि मान्यही होत्या. कारण ‘लेखक पु.ल.’ हा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एक भाग, एक पैलू होता, हे बाकी कुणाला नसलं तरी त्यांना माहिती होतंच. सारस्वतांलेखी थोडासा गुन्हा करून सांगायचं तर हा पैलू आपल्याला वाटतो तेवढा महत्त्वाचा नसावा. त्यांच्या बहुतेक साहित्यकृती, अगदी त्यांच्या अतीव लोकप्रिय साहित्यकृतीही या एकपात्री परफॉर्मन्सच्या स्क्रिप्टच्या स्वरूपात आहेत, हे आपण आता तरी लक्षात घ्यायला हवं.समजा पुलंनी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी किंवा पूर्वरंग, अपूर्वाई ही त्यांची बेहद्द लोकप्रिय ठरलेली पुस्तकं प्रकाशित केलीच नसती, फक्त त्यांचे प्रयोगच झाले असते, तर काय झालं असतं? आजही ही पुस्तकं आणि त्यांतल्या व्यक्तिरेखा, ते प्रसंग हे सगळं पुलंच्या चाहत्यांना पुलंच्या आवाजातच ऐकू येतं ना! पुलंची पुस्तकं, त्यांची साहित्यिक ही ओळखही त्यांच्या परफॉर्मर या ओळखीत गुंतलेली आहे. त्यांची निव्वळ साहित्यिक गुणवत्ता आपल्याला खरोखरच माहिती आहे का?- ती जाणून घ्यायची असेल तर काचबंद प्रयोगशाळेत एक प्रयोग करायला लागेल. एखाद्या वाचकाला जन्मापासूनच पुलंच्या कॅसेट, व्हिडीओ यांचा वाराही लागू द्यायचा नाही आणि त्याला निव्वळ त्यांची पुस्तकं वाचायला सांगायचं, असं करता आलं, तर त्या वाचकाकडून होईल तेच पुलंचं निखळ साहित्यिक मूल्यमापन असेल. मात्र, असा वाचक खरोखरच विचक्षण असेल तर त्यालाही हे ‘परफॉर्मन्सचं मटिरिअल’ आहे, हे कळून जाईलच की!पुलंचा हा खेळिया म्हणून अवतार मान्य केला की त्यांचा प्रचंड मोठा पैस लक्षात येतो... त्यांच्या पद्धतीचा आणि आवाक्याचा परफॉर्मर मराठीत त्यांच्याआधीच्या ज्ञात इतिहासात दुसरा नसावा, नंतर तर नक्कीच झालेला नाही.पुलंकडून प्रेरणा घेऊनच की काय, काही अभिनेते चांगलं लिहितात, उत्तम एकपात्री कार्यक्र म सादर करतात. काही नाटककार चांगली समीक्षा करतात, कथालेखन करतात, कोणी स्टॅण्डअप कॉमेडी उत्तम करतात, खुसखुशीत लिहितात. कोणी किस्सेबाज कथा लिहितात, रसाळपणे कथन करतात. बाकी सोडा, आजकाल अनेक संगीतकार चाली देण्यापेक्षा संगीतावर उत्तम विश्लेषक बोलण्यामुळेच अधिक प्रसिद्ध झालेले आहेत आणि अभिनेत्यांना न्यूनगंड यावा इतका अभिनय गायक गाता गाता करताना दिसतात (गातात कसे ते सोडा). पण, पुलंना हे सगळं आणि यापलीकडेही बरंच काही अवगत होतं, त्याचं काय?फारतर शिल्पकला, नृत्यकला आणि चित्रकला हे ठसठशीत विषय सोडले तर ज्याला पुलंचा स्पर्श झाला नसेल असं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगतातलं एकही क्षेत्र नसावं. ते लेखक होतेच, नाट्यदिग्दर्शक होते, चित्रपट दिग्दर्शकही होते, नाटककार होते, कथा-पटकथा, संवाद, गीतं, संगीत, गायन, वादन या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांची मुशाफिरी होती. रेडिओसारख्या आधुनिक माध्यमात त्यांचा सजग वावर होता. दूरचित्रवाणीचं तंत्र त्यांना अवगत होतं, म्हणूनच ते देशातल्या पहिल्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्माते बनू शकले. स्वत: कविता करण्याच्या फंदात ते पडले नाहीत; पण, बा. भ. बोरकरांच्या, चिं.त्र्यं. खानोलकरांच्या कवितांचा त्यांनी सादर केलेला रसास्वाद संस्मरणीय होता.शास्त्रीय संगीत, तंबाखूचं पान आणि अस्सल मराठी खानपान या तिन्ही गोष्टींचा परस्परसंबंध आहे का? - पण, एका पिढीला या तिन्हीची गोडी लावण्याचं सामर्थ्य पुलंच्या लेखणीत होतं. अनेक शास्त्रीय गायक-वादक कलावंतांवर त्यांनी लिहिलेल्या रसाळ लेखनातून त्यांचा सर्वसामान्य रसिकांना परिचय झाला, त्या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेण्याची ओढ निर्माण झाली. ‘पानवाला’सारख्या लेखात त्यांनी तंबाखूच्या पानाचं असं काही रसभरीत वर्णन केलं की हे पान खाऊन आपण साक्षात भगवान श्रीकृष्णाचा वारसा चालवतो आहोत, अशी वाचकांची समजूत झाली. मराठी खाद्यसंस्कृतीवरच्या त्यांच्या लेखात अस्सल ब्राह्मणी शाकाहारी पाककृतींपासून ते मत्स्याहार, मांसाहारापर्यंत एक प्रचंड मोठा पट त्यांनी अतिशय सहजतेने कवेत घेतलेला होता. त्यात निव्वळ इकडून तिकडून ऐकून चतुर भाषेत केलेली पोपटपंची नव्हती, तर अव्वल सुग्रणीलाच समजेल अशा भाषेत, एकेका पदार्थाच्या पोटात शिरून, त्यातली गुह्यं हेरून केलेली ती मर्मज्ञ टिप्पणी असायची. पुलंच्या पेटीवादनाच्याही कॅसेट निघाल्या आणि खपल्या, म्हणजे पाहा !पुलंच्या या सर्वसंचारी वावराचा यूएसपी, सर्वात महत्त्वाचा विशेष काय होता? - दर्जा ! त्यांनी केलेल्या सादरीकरणात, अगदी साध्या रेडिओवरच्या भाषणात किंवा अगदी प्रासंगिक उत्स्फूर्त भाषणातही एक विशिष्ट दर्जा दिसतो. सगळ्या कला त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वस्तीला आलेल्या होत्या आणि त्यांना अभिजात रसिकता आणि उत्तमतेची पारख यांची उपजत जोड होती (यावर काही मोठ्या शास्त्रीय गायकांनी नाकं मुरडल्याचं ऐकिवात आहे; पण ते एक असो), त्यामुळेच एक विशिष्ट दर्जा त्यांनी कधीच सोडला नाही (यात सुनीताबार्इंच्या साथीचा आणि शिस्तीचाही मोठा वाटा असणारच). जेव्हा आपल्यापाशी आता फारसं काही उरलेलं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्यांचा सगळाच खेळ स्वेच्छेने थांबवला......त्यानंतर त्यांची उरवळ, पुरचुंडी यांसारखी दुर्लक्षित लेखांची, अमुक ठिकाणची भाषणं, तमुक ठिकाणची भाषणं अशी साठवणवजा पुस्तकं येत राहिली... त्यांच्या रूपांतरित, आधारित नाटकांचे प्रयोग होत राहिले... कॅसेट खपत राहिल्या... अभिवाचनाचे प्रयोग ध्वनिचित्रमुद्रित झाले... पण, या सगळ्यामागच्या खेळियाने आधीच एक्झिट घेतली होती......ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज, अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही...(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

manthan@lokmat.com