शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधील गोल्डमॅन

By admin | Updated: May 10, 2014 18:13 IST

छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातला पर्यावरणप्रेमी. पर्यावरण रक्षणासाठी त्याने उभारलेल्या संघर्षाची दखल अखेर जगाला घ्यावीच लागली. रमेश अग्रवाल यांना पर्यावरणातील नोबेल समजला जाणारा गोल्डमॅन पुरस्कार प्राप्त झाला. न थकता, न खचता केलेल्या लढाईची ही विलक्षण कहाणी.

- गजानन दिवाण

 
छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातला पर्यावरणप्रेमी. पर्यावरण रक्षणासाठी त्याने उभारलेल्या संघर्षाची दखल अखेर जगाला घ्यावीच लागली. रमेश अग्रवाल यांना पर्यावरणातील नोबेल समजला जाणारा गोल्डमॅन पुरस्कार प्राप्त झाला. न थकता, न खचता केलेल्या लढाईची ही विलक्षण कहाणी.
 
 
पर्यावरणासाठीची लढाई एकट्या-दुकट्याची नाही. खांद्याला खांदा लावून ती सर्वांनीच लढायची असते. हे खरे असले, तरी छत्तीसगडमधील एका ‘गोल्डमॅन’ने एकट्याच्या बळावर ही लढाई लढली आणि जिंकलीदेखील. ‘वन मॅन आर्मी’च्या  या यशाने सार्‍या पर्यावरण मोहिमेलाच हत्तीचे बळ मिळाले आहे. 
 
रमेश अग्रवाल, छत्तीसगडमधील रायगड हे त्यांचे गाव. गेल्याच आठवड्यात पर्यावरणाचे नोबेल समजल्या जाणार्‍या ‘गोल्डमॅन’ने त्यांना अमेरिकेत गौरविण्यात आले. त्यांच्यासह जगभरातील आणखी पाच जणांना हा पुरस्कार मिळाला. प्रत्येकी पावणेदोन लाख डॉलरचा म्हणजेच सुमारे एक कोटी पाच लाख ६0 हजार रुपयांचा हा पुरस्कार. आतापर्यंत तीन भारतीय या पुरस्काराचे मानकरी ठरलेत. अग्रवाल यातले चौथे. या पुरस्काराने अग्रवाल यांची पर्यावरणासाठीची लढाई सातासमुद्रापार पोहोचली.  त्यांनी ती डोक्यावरही घेतली. मुळात देशात किती लोकांना ती ठाऊक होती? सध्याच्या कॉर्पोरेट जगतात उद्योगपतींच्या हितासाठी अशी जिद्दीची लढाई गावकुसाबाहेर ठेवण्यासाठीच सार्‍या यंत्रणा झटत असतात. 
अग्रवाल यांच्यासारखा असा ‘गोल्डमॅन’ प्रत्येक राज्यात जन्म घेत नाही. जन्मलाच तर सरकारी यंत्रणांच्या जाचातून तो उभा राहू शकत नाही. रमेश यांनी हे सारे अडथळे पार केले. पैशांचे आमिष दिले गेले. ते न मानल्याने लाठी-काठीच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यालाही न जुमानल्याने दुकानात जाऊन गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्या पायावर झेलत त्यांनी विरोधकांचा शेवटचा प्रयत्नही हाणून पाडला. दोन गोळ्या लागल्याने अग्रवाल यांच्या पायात सहा रॉड टाकण्यात आले. जागचे उठायचे म्हटले, तरी त्यांना आता काठीचा आधार घ्यावा लागतो. म्हणून त्यांनी पर्यावरण मोहिमेची साथ सोडली नाही. मोठय़ा हिमतीने ते ही लढाई लढत आहेत. 
एका छोट्याशा दुकानात सायबर कॅफे चालविणारा माणूस केंद्रालादेखील निर्णय फिरविण्यास भाग पाडू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडने (जीएसपीएल) इच्छा नसताना शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या. विविध प्रकल्पांसाठी उद्योगपतींचे हित जपण्यासाठी सर्वच राज्ये अशा पायघड्या घालतात. छत्तीसगडनेही त्या घातल्या. म्हणून रमेश यांचे बळ खचले नाही. उलट, आणखी जिद्दीने ते कामाला लागले. जेएसपीएलसोबत त्यांचा लढा सुरू झाला तो २00८मध्ये. कुठलीही जनसुनावणी न घेता या कंपनीने २00९मध्ये कोळसा खाणीसाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळविली. २0१0मध्ये या कंपनीनेच अग्रवाल यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला. पोलिसांनी या प्रकरणाची मात्र तातडीने दखल घेत अग्रवाल यांना दोन महिने गजाआड केले. कारागृहातून बाहेर येताच त्यांनी जेएसपीएलविरुद्धची लढाई पुन्हा नव्या दमाने सुरू केली. न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. छत्तीसगड उच्च न्यायालयापर्यंत ते गेले आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. सरकारी यंत्रणा, धनाढय़ कंपन्या हरल्या. वन मॅन आर्मी जिंकली. पर्यावरण मंत्रालयाला एप्रिल २0१२मध्ये कोळसा खाणीच्या प्रकल्पाची परवानगी रद्द करावी लागली. ही तर केवळ सुरुवात असल्याचे अग्रवाल सांगतात. त्यांना अशा अनेक लढाया लढायच्या आहेत आणि त्या जिंकायच्यादेखील आहेत. त्यासाठी पायात बळ नाही म्हणून काय झाले? काठीचा आधारदेखील त्यांना पुरेसा आहे. 
१५ वर्षांपासून काही सहकार्‍यांच्या मदतीने ‘जन चेतना’ संस्थेच्या छताखाली छत्तीसगडमधील रायगड येये अग्रवाल यांची पर्यावरणासाठीची ही लढाई सुरू आहे. छत्तीसगडसोबतच ओडिशा, झारखंड आणि बिहारमधील आदिवासींच्या जागृतीसाठी ते सरसावले आहेत. माहिती अधिकार हेच त्यांचे मोठे हत्यार.  आदिवासींच्या रोजीरोटीचे साधन असलेल्या शेतीपासून त्यांना दूर होऊ द्यायचे नाही, हाच त्यांचा ध्यास आहे. असे मोठे प्रकल्प आल्याने स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान सुधारते, हा केवळ दिखावा आहे. कामगार एकत्र येऊ नये म्हणून अशा कंपन्यांत बाहेरूनच वेगवेगळ्या ठिकाणांहून कामगार आणले जातात. 
कंपनीतर्फे शाळा, रुग्णालये उभारली जातात. कोण उपचार घेतो तिथे? सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसलेली ही सुविधा आमच्या काय कामाची? या शाळेत धनवंतांची मुले शिकतात आणि त्यांच्याच रुग्णांवर येथे उपचार केला जातो. म्हणून स्थानिकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याची गरज आहे. यासाठी आपल्याकडे भरपूर कायदे आहेत. आरटीआयसारखे शस्त्र आहे. या आदिवासींना केवळ त्याचा वापर शिकवायचा आहे. 
मी तेच करत असल्याचे अग्रवाल सांगतात. देशात पर्यावरण राखायचे असेल, तर आधी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय बंद करायला हवे. सोबत प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कुलूप ठोकायला हवे. असे केले, तरच देशात पर्यावरणाचा विचार होऊ शकतो.. हे मत आहे अग्रवाल यांचे. एवढा टोकाचा विचार करण्याची 
वेळ त्यांच्यावर का आली, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.   
(लेखक लोकमत औरंगाबाद आवृत्तीमध्ये 
उपवृत्तसंपादक आहेत.)