शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अस्सल पुणेरी

By admin | Updated: July 26, 2014 13:04 IST

लेखक श्री. ज. जोशी हे साहित्यिक म्हणून रसिक वाचकांना सुपरिचित होते. ‘माणूस’ हे त्यांच्या कथांचं र्ममस्थान होतं. त्यांचे जन्मशताब्दीवर्ष (१ ऑगस्ट) पासून सुरू होत आहे. त्यांच्या कन्येने जागविलेल्या आठवणी.

 शुभदा साने

 
दादांवर लिहायचं असं ठरवल्यावर मन भरून आलंय. निरनिराळ्या रूपांमधले दादा समोर दिसतायत. मित्रमंडळींमध्ये गप्पांत रमलेले दादा-खेळकर, मिस्कील दादा- खिडकीतून बाहेर बघत स्वत:मध्येच हरवून बसलेले दादा. मोठे असूनही स्वत:ला मोठं न समजणारे साहित्यिक दादा! 
वडील म्हणून ते अतिशय हळवे होते. मला किंवा भावाला बाहेरून यायला उशीर झाला, की ते घराच्या दारात वाट बघत उभे असायचे. आम्हाला लांबून येताना बघितल्यावर ते झटकन आत जायचे. ते काळजी करत दारात उभे होते, हे आम्हाला कळू नये, असं त्यांना वाटायचं! म्हणजे स्वत:चं हळवेपण ते स्वत:पुरतंच ठेवायचे. पण, हळवेपणा त्यांच्या स्वभावातला एक पैलू होता, हे निश्‍चित.. पुण्यावर प्रेम करणारे अस्सल पुणेरी दादा, असंही त्यांच्याबद्दल म्हणता येईल. पुण्यावर आणि पुण्यातल्या व्यक्तिमत्त्वांवर त्यांचं मनापासून प्रेम होतं.  
यावरून एक प्रसंग आठवतोय. मी लहान होते तेव्हा! दादांकडे काही मंडळी आली होती. गप्पा चालल्या होत्या. मी आतल्या खोलीत अभ्यास करत बसले होते. माझ्या कानांवर त्या गप्पा पडत होत्या.
दादांना कुणी तरी विचारलं, ‘‘तुमचं मूळ गाव कुठलं?’’ दादांनी पटकन सांगितलं, ‘‘आमचं गाव पुणं!’’ ते लोक निघून गेल्यावर आई त्यांना म्हणाली, ‘‘तुम्ही असं का सांगितलंत? 
आपलं मूळ गाव कोकणातलं जांभूळपाडा आहेना?’’ दादा म्हणाले, ‘‘ते खरं आहे; पण जांभूळपाडा कुणी पाहिलंय? किती तरी वर्षांपूर्वी आमचे पूर्वज जांभूळपाडा सोडून पुण्यात आले आणि इथंच स्थायिक झाले. जांभूळपाड्याला मी कधी गेलोही नाही. मला पुणं हेच आपलं गाव वाटतं!’’
दादांच्या पुणेप्रेमाचं हे अगदी बोलकं उदाहरण.
‘मी श्री. ज. जोशी पुण्याहून लिहितो की..’ हे सदर ते लिहीत होते.‘पुण्यात दुमजली बस येते’, ‘ओंकारेश्‍वर ओंकारेश्‍वरी गेले’, ‘लकी रेस्टॉरंट’, ‘हुजूरपागेमधल्या मुली’ हे त्या सदरामधून प्रसिद्ध झालेले लेख वाचकांना खूप आवडले. दादांच्या पुण्यावरच्या प्रेमाबद्दल अजून सांगायचं म्हणजे त्यांनी अर्पण केलेली त्यांची दोन पुस्तकं.. अगदी शेवटी प्रकाशित झालेली त्यांची ‘वृत्तांत’ ही कादंबरी त्यांनी पुण्याच्या नगरवाचन मंदिरालाच अर्पण केली आहे. 
‘जिथं वाचलं कमी, पण गप्पाच अधिक मारल्या.. त्या नगरवाचन मंदिराला.’ अशी अर्पणपत्रिका. आणि त्यांचं दुसरं एक पुस्तक त्यांनी पुणे महापालिकेला अर्पण केलं आहे. त्या बाबतीतला एक मजेदार किस्सा आहे.. माझ्या वडिलांनी जेव्हा लेखनाला सुरुवात केली, तेव्हा माझ्या आजोबांना वाटलं, आपला मुलगा बिघडला; म्हणून ते विनोदानं म्हणाले, ‘‘एक वेळ पुणे म्युन्सिपालटी सुधारेल, पण माझा मुलगा सुधारणार नाही!’’
दादांनी जवळ जवळ पन्नास वर्षं लेखन केलं. मराठी लघुकथांमध्ये त्यांनी महत्त्वाची भर घातली. मानवी मनाचे पापुद्रे हळुवारपणे उलगडण्याचं काम त्यांनी त्यांच्या कथांमधून यशस्वीपणे केलं आहे.
‘माणूस’ हे त्यांच्या कथांचं र्ममस्थान होतं. ‘सदाशिवपेठी साहित्य’ म्हणून टीकाकारांनी त्यांच्या लेखनावर शिक्का मारला; पण या टीकेमुळे दादा कधी खंतावले नाहीत. उलट, मध्यमवर्गीय सदाशिवपेठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व त्यांनी मोकळेपणानं मिरवलं. जे अनुभवलं नाही, जे कधी पाहिलं नाही त्याचं कल्पनारम्य चित्रण करण्याचा त्यांनी कधी अट्टहास केला नाही!  ‘क्वेस्ट’ या नियतकालिकानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कथास्पर्धेत त्यांच्या ‘राक्षस’ या लघुकथेनं पारितोषिक मिळविलं होतं.
मला वाटतं, दादा दोन पातळ्यांवर जगत असावेत. मिलिटरी अकाउंट्समध्ये खर्डेघाशी करणारा सामान्य कारकून घरी आल्यावर सुप्तावस्थेत जात असावा. त्या अवस्थेत जात असताना तो दादांमधल्या लेखकाला जागं करत असावा. ऑफिसमधून आल्यावर चहा पिऊन झाल्यावर दादा एकदम फ्रेश व्हायचे. त्यांना लेखन करावंसं वाटायचं. ते आईला म्हणायचे, ‘कमला, चला हं!’ असं म्हणायचं कारण म्हणजे आईच दादांची रायटर होती. अगदी आनंदी-गोपाळ कादंबरीसुद्धा दादांनी फेर्‍या घालत-घालत सांगितली आणि आईनं ती लिहून घेतली. कथाकार दादांना कादंबरीकार म्हणून प्रतिष्ठा मिळाली ती ‘रघुनाथाची बखर’ आणि ‘आनंदी-गोपाळ’ या दोन कादंबर्‍यांमुळे! आनंदी-गोपाळ ही त्यांची कादंबरी अमाप गाजली. ती वाचकप्रिय ठरली. शिवाय, तिला अनेक सन्मानही लाभले. मराठी कादंबरीच्या वाटचालीत चरित्रात्मक कादंबरी म्हणून एक महत्त्वाचा टप्पा या पुस्तकानं निर्माण केला. 
तर असे हे दादा! त्यांच्या आठवणींचा दरवळ मनात कायम आहे.
(लेखिका साहित्यिक आहेत.)