शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा आणि कागद

By admin | Updated: October 1, 2016 15:48 IST

शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होतो आणि हा कचरा सरसकट जाळला जातो. शाळेतील कचऱ्यात सर्वात जास्त प्रमाण असतं वापरलेल्या कागदांचं! हा कागद जाळण्याऐवजी मुलांना एक कृती-प्रयोग करून पाहण्याचं साधन होईल का? - या प्रश्नातून आकाराला आलेल्या एका प्रयोगाविषयी...

बसवंत विठाबाई बाबाराव
 
पावसामुळे कचरा जाळता येत नाही ना’’
- कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता? या प्रश्नाला उत्तर देताना शाळेच्या मुख्याध्यापिका खेदाने सांगत होत्या. पर्यावरण शिक्षण केंद्राच्या माध्यमातून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ हा कार्यक्र म राबविला जातो, त्यासाठी ‘सध्या शाळेतील कचऱ्याचं काय करता?’ ही माहिती गोळा केली जात आहे. बहुधा सर्व शाळेत कागदी कचरा आणि पालापाचोळा जाळला जातो. काही ठिकाणी खड्ड्यात पुरला जातो. 
२०११ ते २०१५ या चार वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाची ‘पश्चिम घाट विशेष इको क्लब’ ही योजना सुरू होती. यामध्ये सह्याद्री पर्वतरांगात येणाऱ्या नंदुरबार ते सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतील ६३ तालुक्यांच्या २४३ शाळांमध्ये इको क्लब बनविले होते. या योजनेअंतर्गत शाळाभेटीला गेलं की साफसफाई, झाडलोट, काही ठिकाणी रंग-रांगोळी, शाळेतील एखाद्या बोर्डावर स्वागताचे दोन शब्द, एखाद्या कोपऱ्यात मुलं आवारातील गोळा केलेल्या फुलापासून गुच्छ बनवत बसलेली... कमीअधिक सर्वच शाळेत असंच असायचं. 
नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शाळाभेटीला गेलो तेव्हाची ही गोष्ट आहे. एक-दोन शाळांना भेटी देऊन झाल्या होत्या. या दोन्ही शाळेत एक गोष्ट सारखी दिसली. शाळेच्या एका कोपऱ्यातून धूर निघत होता. एक-दोन सेवक त्या पेटलेल्या जाळात काठीने कचरा लोटीत होते. तिसऱ्या शाळेत हे असंच सुरू होतं. मुद्दाम शाळेच्या कार्यालयात न जाता थेट तिकडेच गेलो. तिथे असलेल्या सेवकांना विचारलं, ‘‘काय आहे हे? काय जाळताय तुम्ही?’’
त्यातला एकजण म्हणाला, ‘‘कोणीतरी पुण्याचे साहेब येणार आहेत, साफसफाई सुरू आहे.’’ 
कोणीतरी साहेब? - तो साहेब मीच होतो. पर्यावरण शिक्षण केंद्र (सीईई), पुणेतर्फेयोजना अधिकारी म्हणून या शाळेत गेलो होतो. मी कारमधून उतरलो नव्हतो. मला घ्यायला मुख्याध्यापक गेटपाशी उभे नव्हते. मी सुटाबुटातही नव्हतो. म्हणून कोणत्याच अंगाने साहेब वाटत नव्हतो. मी त्यांना काही न सांगता विचारलं, 
‘‘हे जे तुम्ही जाळता त्यात काय काय असतं?’’ 
त्यांनी सांगितलं, ‘‘पाला-पाचोळा आणि पोरांच्या वह्या-पुस्तकांचे कागद.’’ 
मी तपशिलात परत विचारलं, ‘‘साधारण किती कागद जाळला जात असेल?’’
त्यांच्यातील एक जण म्हणाला, ‘‘भरपूर निघतं, काही रानात इकडं तिकडं उडून जातो आणि शाळेच्या आवारात इकडचा तिकडचा मिळून आठवड्याला एक पोतंभर कचरा निघतो.’’
...हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. लहानपणी आई माझ्याकडून वापरून झालेल्या वह्या घ्यायची. त्या वह्यांची पानं भिजवून, शिजवून त्यात थोडं उडदाचं पीठ टाकायची. मग ते सारण बांबूच्या जाळीदार टोपलीला, सुपलीला सारवायची. ही सारवलेली टोपली आणि सुपली २०-२५ वर्षे टिकायची. 
- शाळेत जाळल्या जाणाऱ्या कागदाचा वापर असा कशासाठी तरी करता येईल का? याशिवाय इतर काही प्रकारे या कागदाचा विनियोग करता येईल का? असे एक ना अनेक प्रश्न मनात 
येऊन गेले. महाराष्ट्रात एकूण किती शाळा असतील, प्रत्येक शाळेत किती कागद असा जाळला किंवा फेकला जात असेल, अशी गणितं मी मांडायला सुरु वात केली. 
सीईईतर्फे‘पश्चिम घाट विशेष इको क्लब’ ही योजना राबवली जात होती. या योजनेअंतर्गत २४३ शाळा सहभागी होत्या. या शाळेमध्ये पर्यावरणविषयक वेगवेगळे उपक्र म राबविले जात होते. या सर्व शाळांसाठी कागदासंबंधी काही उपक्रम देता येईल का असा विचार केला. 
कागद कसा तयार होतो? कागद तयार होण्यासाठी काय काय करावं लागेल? वापर झालेल्या कागदांचं काय काय करता येऊ शकतं? - या सर्व बाबींना घेऊन शोध सुरू झाला. माझे मित्र व सीईईचे मध्य भारताचे समन्वयक सतीश आवटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना कागदासंबंधी उपक्र म शाळेत घेण्याची कल्पना आवडली. त्यावर अभ्यासपूर्ण काही उपक्र म तयार करण्याचं ठरलं.
प्राथमिक वाचन करून पहिल्या वर्षी केवळ कागद किती जमतो, कागदाचे मोजमाप, कागदाची साठवणूक असेच उपक्र म दिले. दुसऱ्या वर्षी या साठवलेल्या कागदाचा लगदा करून हातकागद करण्याची प्राथमिक माहिती दिली. 
कागदातील घटक
कागदाच्या शोधाने मानवी जीवनाला खूप मोठं वळण दिलं. संदेश पाठवणे, एखादी माहिती अनेक प्रतींमध्ये तयार करणे, पारंपरिक मौखिक ज्ञान लिहून ठेवणे यासाठी कागद खूप महत्त्वाचा आहे. आज ई-माहितीच्या युगातही कागदाचं महत्त्व कमी झालेलं नाही. हा बहुपयोगी कागद तयार करण्यासाठी ऊर्जा, पाणी, मनुष्यबळ आणि झाडं लागतात. साधारणपणे एक टन कागद तयार करण्यासाठी अडीच टन बांबू किंवा १७ मोठी झाडं (किमान दहा वर्षाची) तोडावी लागतात. शिवाय २० हजार ते दोन लाख लिटर पाणी आणि ४१०० युनिट वीजही लागते. याशिवाय अनेक रसायनं, यंत्रसामग्री इत्यादि गोष्टी आवश्यक आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आदि राज्यातील स्थानिक लोक आणि कागद कारखाना यांच्यामध्ये कागदासाठी लागणाऱ्या लाकडावरून संघर्ष झाल्याचा इतिहास आहे. कर्नाटकमधील बंडीपुरचे बुरु ड कैकाडी यांनी कागद कारखान्याच्या विरोधात तेव्हाचे कर्नाटकचे अर्थमंत्री मुरारजी घोरपडे यांना आॅफिसमध्ये कोंडून ठेवलं होतं. 
स्थानिक लोकांच्या उपजीविका आणि कागद कारखाना असा तो संघर्ष होता. 
झाड हा पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला, तर कागदासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जाणे ही चांगली बाब नाही. यासाठी कागदाचा वापर जबाबदारीने करणं महत्त्वाचं आहे. कागदाचा नेमका आणि कार्यक्षम वापर यासाठी शाळेतील शिक्षकांनी पाठपुरावा केला पाहिजे. याशिवाय वापरून झालेला कागद संग्रही ठेवला पाहिजे. या वापरलेल्या कागदापासून पुन्हा हातकागद बनविता येतो. 
महाराष्ट्रात खादी ग्रामोद्योगाचे अनेक हातकागद कारखाने होते. यापैकी काही कारखाने आज कसेबसे तग धरून आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की, वापरलेल्या कागदापासून पुन्हा असा कागद तयार करता येतो हे मला शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण घेऊनही माहीत झालं नव्हतं. ही परिस्थिती आजही खूप बदललेली नाही. शालेय शिक्षणात कागद हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. या घटकाविषयी विद्यार्थ्यांना माहिती का असू नये? अलीकडील पाठ्यपुस्तक पाहिलं, त्यामध्ये सहावीच्या हिंदी पुस्तकात कागज नावाचं एक प्रकरण आहे. त्यामध्येही खूपच जुजबी माहिती दिलेली आहे. कागद निर्मिती, कागदाचे वेगवेगळे वापर, पुनर्वापर ही कौशल्याची बाब आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास होणं खूप महत्त्वाची बाब आहे. 
आज ज्ञानरचनावादी शिक्षण, कृतिशील शिक्षण या नावाखाली या गोष्टी जाणीवपूर्वक पुढे आणल्या जात आहेत. मात्र यांचा अवकाश मर्यादितच आहे. 
वापरलेल्या कागदामधील सेल्यूलोज किंवा तंतू कसे वेगळे करायचे, सेल्यूलोज म्हणजे काय? कागदाचे वेगवेगळे आकार, कागदाचे वापरानुसार बनविलेले प्रकार, प्रकारानुसार त्यामध्ये वापरलेले वेगवेगळे साहित्य या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना कागद उपक्र माच्या माध्यमातून सांगता येतील असं ठरवलं, आणि हातकागद निर्मितीचा उपक्रम आकाराला आला. 
त्याबद्दल पुढच्या रविवारी!
 
कागदाचा शोध 
कागद बनवण्याचा शोध चीनमध्ये इ.स. १०५ ला हान राजवटीच्या काळात लागला. चीनमधील युद्धकैद्यांमार्फत युरोप व जगभरात प्रसार झाला. चीनबाहेरील जगाला कागद बनविण्याच्या तंत्राची माहिती व्हायला आठवं शतक उजाडावं लागलं. भारतात मोगल राजवटीत सोळाव्या शतकात हातकागदाची निर्मिती होऊ लागली. या काळात कागद तयार करणं ही एक कला मानली जात असे. उत्तर भारतामध्ये त्यावेळी हातकागद बनविण्याचे बरेच ‘कागझीपुरे’ होते. (कागद बनविणाऱ्या गावाला कागझीपूर म्हणत.) कागद बनविणारे ‘कागझी’ भरपूर कमाई करीत असत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कागद तयार करण्याचे कारखाने निघाल्याने हातकागद व्यवसायाला उतरती कळा लागली. हातकागद निर्मितीसाठी लागणारा प्रमुख कच्चा माल मोठ्या प्रमाणात इंग्लंडला निर्यात होऊ लागल्याने विसाव्या शतकात भारतातील हातकागद निर्मिती व्यवसायाला उतरती कळा लागली. उच्च दर्जाचे कागद बनविणारे कारागीर बेकार झाले. 
(लेखक पुणेस्थित पर्यावरण शिक्षण केंद्र (सीईई) येथे योजना अधिकारी आहेत.)