शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गदिमा- मराठी संस्कृतीचा सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 06:12 IST

साध्या शब्दांत मोठा आशय हे अण्णांचं वैशिष्ट्य. पेळूतून सूत निघावं इतक्या सहजपणे शब्द-सुरांत घोळलेला हा आशय श्रोत्यांच्या मनातही मुरला. मराठी संस्कृतीची गोधडी जागतिकीकरणानं उसवायला घेतली असताना अण्णांचं महत्त्व आणखीच अधोरेखित होतं.

ठळक मुद्दे1 ऑक्टोबर 2018 पासून  ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होत आहे.  त्यानिमित्त.              

-अनंत येवलेकर

ज्यांचे वर्णन मराठी संस्कृतीचा सारांश असे करता येईल अशा मोजक्या कलावंतात ग.दि. माडगूळकर यांचा समावेश करावाच लागेल. बहुरंगी, बहुढंगी असे हे व्यक्तिमत्त्व असले तरी त्यांचा मूळ पिंड कवीचा. त्यातही गीतकाराचा होता. गीतात काव्य नसते असे मानणा-या समीक्षकांनी गदिमांना कवी मानले नसले तरी त्यांच्या गीतांनी रसिकमनावर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. साध्या शब्दात मोठा आशय पेळूतून सूत निघावे इतक्या सहजपणे शब्दात गुंफून सुरेल सुरात घोळून र्शोत्यांच्या मनी मानसी मुरवला गेल्याने गदिमा हे नाव विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घराघरांत पोहचले. मराठी साहित्य संस्कृतीचा संपूर्ण पट समोर घेतला तर अभिजन बहुजन अशा सगळ्यांना आकृष्ट करणारे थोडेच लेखक कवी दिसतात. बहुतेकांचा मुक्काम दोन पाच वर्षे विद्यापीठीय अभ्यासक्रमात राहतो. त्यात पहिल्या पंक्तीत अर्थातच संतांची प्रभावळ आणि पुढे लोकसाहित्याची माया मराठीवर पाखरलेली दिसते. या सगळ्या परंपरेचा अर्क म्हणजे गदिमा होत. त्यांच्या चरित्राचा धांडोळा घेतला तर गदिमा ही गावगाड्याची, आजी-पणजीने सांगितलेल्या गोष्टींची, ग्रामीण अवकाशातली आत्राप माणसं, झाडझाडोरा, मंदिराच्या ओव-यात होणा-या कथा-कीर्तनातून, लोकशाहिरांच्या डफ तुणतुण्याच्या ठेक्यातून आपसूक झालेली निर्मिती होती. एक श्रीमंत सांस्कृतिक पैस आपल्या अंगावर घालणा-या मराठी संस्कृती नावाच्या गोधडीची ऊब ज्या पिढय़ांना मिळाली त्या भाग्यवान होत.

आज जागतिकीकरणाने ही गोधडी उसवायला घेतली असताना अण्णांचे महत्त्व आणखी अधोरेखित होते.दुष्काळ पाचवीला पूजलेल्या माणदेशातल्या शेटफळ या गावंढय़ा गावात गरीब ब्राहमणाच्या घरात जन्मलेल्या गदिमांना तशा अर्थाने साहित्याची काही परंपरा नव्हती. बामणाला बामन म्हणण्याचा तो काळ. (पुढे गदिमांनी माडगुळातल्या ज्या शेतघरात बसून सिनेमाच्या कथा लिहिल्या त्याला ‘बामणाचा पत्रा’ असेच संबोधले जायचे. तिथल्या लोकांचा तो राजा होता आणि त्याच्यासाठी ते नायक होते.) लिहिणे हेच ज्यांचे जगणे झाले अशांपैकी माडगूळकर एक होते. ‘थोडे शब्द, थोडी गाणी, हेच माझे अन्नपाणी’ हेच त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. (ही ओळ नाशिकचे दिवंगत कवी प्रमोद कुलकर्णी यांची आहे.)

अंकगणितात फड्डीस नंबर आला; पण शब्दगणितात अव्वल. वि.स. खांडेकरांचे लेखनिक म्हणून काम करताना या अवलगिरीला आणखी पैलू पडले असणार. महालक्ष्मीच्या स्तुतिगीताने सुरुवात करणारे गदिमा पुढे जीवनलक्ष्मीचे स्तुतिपाठक झाले. औंधच्या राजाने बाळ गदिमांना टाकीत म्हणजे सिनेमात जाण्याचा सल्ला दिला. राजाज्ञा पाळायचीच असते. मराठी चित्रपटाचा तो काळ होता. मराठी नाटक रूळ बदलत होते. सिनेमाला सूर गवसल्यासारखी स्थिती होती. कोल्हापूर हा या घडामोडींचा भोज्या होता आणि कविराज तेथेच मंगेशकर कुटुंब ज्या घरात राहत होते त्याच्या वरच्या मजल्यावर मुक्कामी होते. संसारही सुरू झाला होता. पण चित्त सगळे कलेत गुंतलेले. अभिनेता व्हायचे होते. सिनेमात मिळतील त्या भूमिका पत्करल्या. एचएमव्हीसाठी गाणी लिहिली. शीघ्रकवी लहरी हैदर यांचा प्रभाव पडला आणि शब्द, गाण्यातूनच अन्नपाणी मिळवायचे हे नक्की झाले. ‘भक्त दामाजी’, ‘पहिला पाळणा’पासून हा सिलसिला सुरू  झाला. ‘राजकमल’च्या रामजोशीसाठी कविराजांनी कथा, संवाद आणि गाणी लिहिली  वर एक छोटी भूमिका केली. सिनेमा गाजला. सिलसिला पुढे हिंदीत गेला. शेकड्यांनी मराठी सिनेमे केले. गदिमा हा गोष्ट सांगणारा माणूस होता. कधी कवितेतून, कधी पटकथेतून किंवा संवादातून ते गोष्टच सांगत राहिले. त्यांच्यातला हा कथक कवीच नंतर आधुनिक वाल्मीकी म्हणून समोर आला तो गीतरामायणाच्या रूपाने. कोल्हापुरातच त्यांची गाठ सुधीर फडकेंशी पडली होती. त्यांच्यामुळे गदिमा पुण्यात आले. आकाशवाणी तेव्हा जम बसवत होती. सीताकांत लाड यांच्यासारखे कलेचे जाणकार कारभारी होते. गदिमांचे ते मित्र. या मैत्रीतून 1955 साली जन्मले गीतरामायण. फडकेंनी ही गीते गायली. सगळी गीते आधी लिहून झालेली नव्हती. माध्यमे वेळेच्या ताणलेल्या प्रत्यंचेवर चालत असतात. त्यातून अनेक ताणाचे पण नंतर आनंदात पर्यवसित होणारे प्रसंग घडले. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे पहिले गीत मित्रवर्य लाड यांनी कविराजांना खोलीत कोंडून लिहून घेतले होते. या कार्यक्रमाने अमाप लोकप्रियता मिळवली. आकाशवाणी हे माध्यम महाराष्ट्रात रुजवण्यास त्यातून हातभार लागला. माध्यमांचे एक अर्थकारण असते. कलावंत हेच त्याचे वंगण असते. कोल्हापुरात माडगूळकर, फडके, राजा परांजपे या त्रिकुटाने सिनेमाला सुवर्णकाळ दाखवला.

गदिमांनी मराठी सिनेमाला कथा, पटकथा, संवाद, गाणी पुरवून फुलते ठेवले तसे गीतरामायणाने रेडिओ घरोघर नेला. आज सहा दशकांनंतरही या कथन काव्याची मोहिनी ओसरलेली नाही. 2005 साली पुण्यात रमणबागेत गीतरामायणाचा दिमाखदार सुवर्णमहोत्सवी सोहळा झाला होता. अन्य भाषा भगिनी आणि मराठी यांच्यात मराठीला अधिक श्रीमंत करणारी ही रचना आहे. संत, पंत आणि तंत या तिन्ही परंपरांचे वारसदार असल्याने गदिमांच्या रचनांना आपला डौल प्राप्त झाला. त्यांचे संवाद लोकांची बोली बोलायचे. त्यात अस्सल मराठी बाज होता. असे चौफेर यश मिळत होते तरी कवीच्या मनात एक सल होती. जोगिया या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत ती व्यक्त झाली आहे. जीवन व्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला. या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे. विशुद्ध कवीच्या व्याख्या त्यांना ऐकवल्या गेल्यामुळे त्यांनी हा खुलासा केलेला असू शकेल; पण खरं तर त्याची गरज नव्हती. गीतरामायण संस्कृतसह विविध  भारतीय भाषात गेले. शिर्डीला साईबाबांच्या देवळात पहाटे जी काकड आरती होते ती गदिमांनी लिहिली आहे. अजय-अतुलसारख्या नव्या पिढीतल्या संगीतकारांना गदिमांच्या रचना खुणावतात हा खुलासा पुरेसा आहे.

शेवटी एका लेखाचा उल्लेख केल्याशिवाय गदिमांचे स्मरण पूर्ण होणार नाही. कविराजांना कर्करोगाने गाठले. कविप्रकृतीची माणसे अशा संकटात गडबडतात, गोंधळतात. प्रकृती आणखी ढासळते. समोर मृत्यू दिसत असताना माणूस कसा वागतो याला खूप महत्त्व असते. त्यातूनही माणूस कळतो. गदिमांनी या अनुभवावर एक लेख लिहिला. ‘हॅलो मिस्टर डेथ’ हा तो लेख. सरळ, साधेसोपे गद्य ही त्यांचे बंधू व्यंकटेश यांची ख्यातीच होती. पण या लेखात गदिमांनी बोट न दाखवता मिस्टर डेथ यांचे जे काही केले आहे ते गद्यकाव्यच आहे. त्यांचा पिंड कवीचा होता. कवीत तत्त्वज्ञ असतोच.

(लेखक मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.)

ananty@gmail.com