- गौरी पटवर्धनपरीक्षा संपली फायनली आठवीतून नववीत गेलेल्या आर्याच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप आपापल्या सायकली घेऊन शाळेच्या गेटपाशी जमला. सगळ्यात आधी त्याच दिवशी संध्याकाळी पिझ्झा खायला जाण्याचा प्लॅन परीक्षा सुरू व्हायच्या आधीच ठरलेला होता. सगळ्यांनी आपापल्या पालकांना तसं सांगितलेलं होतं. कुठे जायचं यावर बरीच चर्चा होऊन नवीन उघडलेल्या एका प्रसिद्ध पिझ्झा चेनच्या आउटलेटमध्ये जायचं ठरलं. मुलांना सुटीसाठी आईबाबा जो पॉकेटमनी देणार होते त्यातला बराच मोठा हिस्सा या एका पार्टीत खर्च होणार होता. पण तरी सगळ्यांना ते चालणार होतं. सुट्टीत पिक्चर नाही बघितला तरी चालेल; पण पिझ्झा खायचा हे सगळ्यांचं ठरलेलं होतं. संध्याकाळी ७ वाजता जायचं आणि साडेआठपर्यंत घरी परत यायचं असा प्लॅन होता. सगळ्यांनी आधीच घरच्यांना सांगून, पटवून, भांडून, रडून, रुसून, अबोला धरून किंवा धमक्या देऊन परवानगी मिळवलेली होती. आता प्रश्न फक्त एवढाच होता की तिथे जायचं कसं? आर्या म्हणाली,‘‘कसं म्हणजे? सायकलवर!’’‘‘शी’’ शिवानी म्हणाली, ‘‘सायकलवर कोण जाईल पिझ्झा खायला?’’‘‘का? त्याला काय झालं?’’ इशान आर्याच्या मदतीला आला.‘‘इशान प्लीज यार शाळेतबीळेत सायकल ठीक आहे. आय मीन तिथेपण आपली मजबुरीच असते; पण दॅट्स ओके. पण म्हणून पिझ्झा खायला सायकलवर? किती फालतू दिसेल ते!’’ असं कबीरने म्हणतानाच राधिकाने त्यात भर घातली.‘‘फालतू नाही, डाउनमार्केट दिसेल ते. हॅट ! मी नाही येणार सायकलवर.’’‘‘मग तू येशील कशी? इशानने विचारलं.‘‘मी माझ्या डॅडना सोडायला सांगेन. आमची मोठी एसी कार आहे ना, ते सोडतील मला.’’‘‘अगं पण का?’’ आर्याला काही केल्या ते पटेना. ‘‘आपण जाऊ ना नेहेमीसारखे.’’‘‘एक्झॅक्टली!’’ इशान म्हणाला. पण बाकी कोणाला त्या दोघांचं म्हणणं काही पटत नव्हतं. कबीर म्हणाला,‘‘मीपण सायकलवर येणार नाही.’’‘‘मग तू येशील कसा? ताईला सोडायला सांगशील का?’’ विशाखाने विचारलं.‘‘हॅट!’’‘‘मग? तू येणार कसा?’’ सिद्धांत म्हणाला, ‘‘आॅफ कोर्स, तू तर चालतपण येऊ शकतोस. तुझं घर तिथून अगदीच जवळ आहे. चालत आलास तरी पंधरा मिनिटात पोहचशील.’’‘‘मी का चालत येऊ?’’ कबीर जरा शिष्टपणे म्हणाला, ‘‘मी अॅक्च्युअली ताईची स्कूटर घेऊन येणार आहे.’’‘‘काहीही काय?’’ बाकी सगळे एका आवाजात ओरडले. ‘‘पोलीस पकडतील ना?’’‘‘काही नाही पकडत. आतल्या गल्ल्यांमधून यायचं. तिकडे कोणी नाही पकडत. मी येईन बरोबर... आत्ता निघतो. ताईला त्यासाठी मस्का लावायला लागेल’’, असं म्हणून कबीर सायकलवरून घरी गेला. सगळी मुलं घरी गेली होती. यांचाच ग्रुप राहिला होता. त्यामुळे बाकी पण सगळे हळूहळू हातात सायकली धरून चालायला लागले. आर्या आणि इशानने परत सगळ्यांना पटवायचा प्रयत्न केला की कबीरचं जाऊ दे, आपण तरी सायकलवर जाऊया. पण कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. कोणी वडिलांना सोडायला सांगणार होतं, तर कोणी आईला. शेवटी इशान इरिटेट होऊन म्हणाला,‘‘पण मला एक कळत नाही, आपल्याला जर का तिथे पोहचायची घाई नसेल, आणि अंतरही फार नसेल, तर सायकल न्यायला काय हरकत आहे? उगीच स्टाइल मारण्यासाठी पेट्रोल जाळणं योग्य आहे का?’’‘‘पण एखाद्या वेळी गेलो गाडीतून तर काय फरक पडतो?’’ राधिका तिचं म्हणणं सोडायला तयार नव्हती.‘‘पण कशाला? आपण नेदरलँडसारख्या बाकी देशांच्या गोष्टी वाचतो. तिथली माणसं कशी सगळीकडे सायकल वापरतात म्हणून कौतुक करतो आणि आपली वेळ आली की मात्र आपण गाडी घेऊन जातो. याला काय अर्थ आहे?’’ आर्यापण तिच्या मुद्द्यावर ठाम होती. ‘‘अॅम्ब्युलन्स पेट्रोलवर चालवणं ठीक आहे. पण उगीच येता जाता पेट्रोल किंवा डिझेल जाळायचं आणि मग ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलायचं याला काही अर्थच नाहीये.’’‘‘बरं मग तू ये ना सायकलवर तुला कोणी अडवलंय?’’ विशाखा म्हणाली.‘‘मी येणारच आहे सायकलवर. म्हणजे माझी मी येऊ शकते. उगीच कोणाला तरी सांगा, मग त्यांच्यासाठी थांबा’’.‘‘परफेक्ट! मीपण सायकलवर येणार आहे.’’ इशान म्हणाला.शेवटी प्रत्येकाने आपल्याला पाहिजे तसं यावं त्यावरून भांडायला नको असं ठरलं आणि सगळे आपापल्या घरी गेले.संध्याकाळ झाली, आणि हळूहळू एक एक करत सगळे जण पिझ्झा आउटलेटपाशी पोहचले. राधिकाच्या वडिलांनी तिला आणि विशाखाला सोडलं. सिद्धांतला त्याच्या ताईने सोडलं. कबीर खरंच त्याच्या ताईची स्कूटर घेऊन निघाला होता; पण त्याने कोपऱ्यावर पोलिसांना बघितलं, तो तसाच वळून परत घरी गेला आणि त्याने ताईलाच सोडायला सांगितलं. ते सगळेजण जमले आणि त्यांना आर्या आणि इशान सायकलवर येताना दिसले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते पोहचेपर्यंत जरा दमले होते. पण त्याबद्दल त्यांची काही तक्र ार नव्हती. बाकी चौघं त्या दोघांकडे बघून आपापसात जरा हसले. तिथे सायकलसाठी वेगळं पार्किंग होतं. तिथे आर्या आणि इशानने सायकल लावली, तर त्यांना तिथल्या माणसाने एकेक कूपन दिलं आणि बिल देताना ते कूपन दाखवायला सांगितलं.सगळेजण आत गेले. सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या चॉईसचा पिझ्झा मागवला. पिझ्झा फारच मस्त होता. सगळ्यांना असं वाटलं की, परत एकदा इथे यायला पाहिजे. पण त्यांच्या पॉकेट्मनीमध्ये ते शक्यच नव्हतं. शेवटी जेव्हा ते बिल द्यायला गेले तेव्हा आर्याला एकदम आठवलं, की आपल्याला ते कूपन द्यायचं आहे. तिने दोघांचं कूपन बिलिंग काउण्टरवर दिलं, तर तिथला दादा तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला आणि इशानला वर लावलेल्या कॅमेऱ्याकडे बघून हसायला सांगितलं. त्यांचा त्या कॅमेºयातून फोटो काढला आणि माइकवरून अनाउन्समेण्ट केली,‘‘पिझ्झाप्रेमींनो जरा इकडे लक्ष द्या आज आपल्या पिझ्झा आउटलेटमध्ये अजून दोन पर्यावरणाचे शिलेदार ऊर्फ ग्रीन वॉरियर्स आले आहेत. ते आज इथे सायकल घेऊन आले आहेत. त्यामुळे त्यांनी आज कुठलंही फ्युएल जाळलेलं नाही. त्यांच्यामुळे आज काहीही प्रदूषण झालेलं नाही. त्यांनी आज एकही कार्बन फूटप्रिण्ट आपल्या पृथ्वीवर उमटवलेली नाही. अशा लोकांमुळेच वातावरणाचा होत असलेला ºहास थांबणार आहे. अशा या दोघांचं, इशान आणि आर्याचं, त्यांच्या या विचारांचं आम्ही पिझ्झा आउटलेटतर्फे कौतुक करतो आणि त्यांच्या सायकल वापरण्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना आजच्या बिलात पन्नास टक्के सवलत देतो आहोत आणि अजून एक पिझ्झाचं कूपन त्यांना भेट देत आहोत.’’असं म्हणून त्याने एरवी जिथे टोकन नंबर दिसतो त्या स्क्र ीनवर त्या दोघांचा फोटो दाखवला आणि त्या दोघांना अजून एक-एक कूपन दिलं. तिथे आलेल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या.आता मात्र गाडीतून आणि स्कूटरवर आलेल्या सगळ्यांचे चेहेरे बघण्यासारखे झाले होते. इशान आणि आर्याच्या ते लक्षात आलं, आणि ते म्हणाले,‘‘जाऊदे रे. आज आमचे दोघांचे अर्धे पैसे वाचलेत, शिवाय दोन पिझ्झाचं कूपन मिळालंय. आपण परत येऊ, तेव्हा आम्ही दोघं पार्टी देऊ. फक्त तेव्हा येतांना सगळे जण सायकलवर या म्हणजे झालं !’’(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com