अनंत सुखाच्या अनुभवासाठी

By Admin | Published: April 29, 2014 03:26 PM2014-04-29T15:26:23+5:302023-10-16T13:16:57+5:30

आत्मभावाने विश्‍वाकडे पाहावे. जे-जे पाहाल ते-ते आत्मभावाने, आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पाहा; मग व्यवहारकाळीदेखील कामना, वासनांचा स्पर्श होणार नाही. परमात्मभाव टिकून राहील.

For the experience of endless happiness | अनंत सुखाच्या अनुभवासाठी

अनंत सुखाच्या अनुभवासाठी

आत्मभावाने विश्‍वाकडे पाहावे. जे-जे पाहाल ते-ते आत्मभावाने, आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पाहा; मग व्यवहारकाळीदेखील कामना, वासनांचा स्पर्श होणार नाही. परमात्मभाव टिकून राहील.
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। । 
एक तरी ओवी अनुभवावी।।’ 
असे नामदेवमहाराज म्हणतात. ज्ञानेश्‍वरीतील एक ओवी अनुभवाला आली, तरी त्यात जीवनाची धन्यता आहे. ज्ञानेश्‍वरमहाराज म्हणतात, 
‘अर्जुना अनंत सुखाच्या डोही। 
एकसरा तळुचि घेतला जिंही। 
मग स्थिराऊनि तेही। तेचि जाहले।।’ 
अनंत सुख याचा अर्थ आत्मसुख. विषयांचे सुख हे अनंत सुख असू शकत नाही. ते र्मयादित सुख आहे, तर अनंतसुख म्हणजे आत्मसुख हे सागरासारखे अर्मयाद आहे.
एकदा एक हंस उडता-उडता जमिनीवरील भू-भागात आला. तेथे एक विस्तीर्ण विहीर होती. तिच्या काठावर येऊन तो थांबला. विहिरीत एक मोठा बेडूक होता. त्याने अशा प्रकारचा पक्षी आत्तापर्यंत पाहिला नव्हता; त्यामुळे आश्‍चर्यचकित होऊन त्याने हंसाला विचारले, ‘तू कोण? कोठून आलास?’ हंस म्हणाला, ‘मी हंस पक्षी, सागरावरून उडत आलो.’ बेडकाने विचारले, ‘सागर? तो केवढा असतो?’ हंसाने उत्तर दिले, ‘खूप मोठा! अगाध असा जलाशय! तुला नुसते सांगून कल्पना येणार नाही.’ हंसाचे हे बोलणे ऐकून विहिरीतील पाण्यात बेडकाने दोन मोठे वेढे घेतले व म्हणाला, ‘इतका मोठा असतो का सागर?’ हंस म्हणाला, ‘सागर अशा वेढय़ांमध्ये मावणारा नाही आणि तो खूप विशाल आणि खोल असतो.’ तेव्हा बेडकाने विहिरीच्या पाण्यात खूप खोल बुडी मारली आणि वर येऊन म्हणाला, ‘सागर इतका खोल असतो का?’ हंस म्हणाला, ‘तुला समजत नाही. हे तर काहीच नाही. सागराच्या खोलीची विहिरीत राहून तुला कल्पनाही येणार नाही.’ आता मात्र बेडूक रागावला व म्हणाला, ‘बस्स झाले तुझे! खोटे बोलण्यालाही काही र्मयादा असते.’ बेडूक सागराचे वर्णन समजूच शकत नव्हता. आत्मसुखाबाबत आपली समजही अशीच थिटी आहे. विषयांच्या सुखावरून अनंत अशा आत्मसुखाची कल्पनाही करता येणे कठीण आहे.
अनंत सुखाच्या अनुभवासाठी सीमित देहबुद्धी टाकावी लागते. ‘देहबुद्धी केली बळकट। आणि ब्रह्म पाहो गेला धीट। तंव दृश्याने रुधली वाट। परब्रह्मची।।’ असे सर्मथ म्हणतात. देहबुद्धीला घट्ट धरून कोणी ब्रह्म पाहायला गेला, तर त्याची गत वरील गोष्टीतील बेडकासारखी होते. विश्‍व आणि त्यातील शब्दस्पर्शादी विषय वाट अडवून उभे राहतात. आपला नावलौकिक, आपले कूळ, घराणे, आपला देश, आपला प्रांत, आपली भाषा यांचा अभिमान आड येतो. याशिवाय, आपले रूपवान असणे, गुणवान असणे, उच्चशिक्षित असणे, श्रीमंत असणे यांचा अहंकार अनंत सुखप्राप्तीच्या आड येऊ शकतो. 
‘देह बळी देऊनि साधिले म्यां साधनी। 
तेणे समाधान मज जाहले वो माये।।’ 
देह म्हणजे ‘मी’ या भावनेचा, अर्थात देहबुद्धीचा बळी देऊन साधना केली पाहिजे; मगच ते अनंत सुख, आत्मसुख प्राप्त होते.
महर्षी नारद सनकादिकांना विचारतात, ‘माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ भेटला, तर मला त्याचा मत्सर वाटतो आणि कोणी कनिष्ठ भेटला तर मी त्याला कमी लेखतो. असे होऊ नये यासाठी काही उपाय आहे का? ’ बघा हं! नारद महर्षींसारखे भक्ताचार्य असे विचारत आहेत; मग आपल्याबद्दल तर बोलायलाच नको. सनकादिक नारदांना सांगतात, ‘अल्प होऊन राहण्यात सुख नाही. व्यापक होण्यातच सुख आहे. नाल्पे सुखमस्ति। भूमैव सुखम।’ हे सुख आपल्या आतच आहे. आत्म्याच्या ठिकाणी आहे. त्याचे अनुसंधान ठेवावे. देहाचे सुख म्हणजे सुख, असे खरे तर मानूच नये. तसेच वळण आपल्याला लावून घ्यावे. 
‘देहातीत वस्तू आहे। ते तू परब्रह्म पाहे। 
देहसंग हा न साहे। तुज विदेहासी।।’ 
तू विदेही आहेस हे जाणून घेशील, तर सुखी होशील. उत्तम ध्यानामध्ये हे सुख मिळते. ध्यानातून बाहेर आल्यावर आत्मबोधासहित आपली कर्मे करीत जावीत. आत्मभावाने विश्‍वाकडे पाहावे. जे-जे पाहाल ते-ते आत्मभावाने, आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पाहा; मग व्यवहारकाळीदेखील कामना, वासनांचा स्पर्श होणार नाही. परमात्मभाव टिकून राहील. असे जीवन होणे, ही सामान्य गोष्ट नाही. मात्र, साधनेने आणि गुरुकृपेने असे जीवन निश्‍चितपणे प्राप्त होते, यात शंका नाही.
(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील 
स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)

Web Title: For the experience of endless happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.