शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

कृतज्ञ - जगण्याच्या कोलाहलातले कोवळे क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 06:05 IST

अब्दुल करीम खां कोल्हापुरात केसरबाई केरकर यांच्या घरी त्यांना गाणे शिकवण्यासाठी येत. त्या दिवशी गुरू आले ते पावसात नखशिखांत निथळतच. दोनेक तासांनी पाऊस थांबला आणि त्यापाठोपाठ शिकवणीही. गुरुजी दाराजवळ आले तर बाहेर काढलेल्या चपला गायब. चौकशी करायला म्हणून ते स्वयंपाकघरात डोकावले. समोरचे दृष्य पाहून त्यांच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. केसरबाईंच्या आई पावसात भिजलेल्या गुरुजींच्या चपला चुलीतील निखाऱ्यांवर ठेवलेल्या तव्यावर शेकत होत्या!

ठळक मुद्देसंगीत ऐकत असताना त्याबद्दल कृतज्ञ वाटण्याचा रसरशीत क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच! अशाच कृतज्ञ क्षणांच्या आठवणी जागवणाऱ्या साप्ताहिक लेखमालेचा प्रारंभ

- वंदना अत्रे

खूप वर्षांपूर्वी ऐकलेली ही घटना. त्यामुळे कदाचित काही तपशील घरंगळत विस्मृतीच्या कोपऱ्यात गेलेले. पण अनुभवाचे लख्खपण तसेच आहे. घटना अगदी छोटीशी. असेल शंभरेक वर्षांपूर्वीची. अब्दुल करीम खां कोल्हापुरात केसरबाई केरकर यांच्या घरी त्यांना गाणे शिकवण्यासाठी येत. त्या दिवशी गुरू आले ते पावसात नखशिखांत निथळतच. डोके कोरडे करून शिकवणी सुरू झाली. दोनेक तासांनी पाऊस थांबला आणि त्यापाठोपाठ शिकवणीही. गुरुजी दाराजवळ आले तर बाहेर काढलेल्या चपला गायब. चौकशी करायला म्हणून ते स्वयंपाकघरात डोकावले. समोर जे दिसत होते ते बघून गुरुजी क्षणभर स्तंभित झाले आणि मग, त्यांच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. केसरबाईंच्या आई पावसात भिजलेल्या गुरुजींच्या चपला चुलीतील निखाऱ्यांवर ठेवलेल्या तव्यावर शेकत होत्या! त्यांचे सगळे लक्ष त्या वेळी फक्त त्या जोड्यांवर होते. पुरेशा सुकल्या आहेत असे वाटल्यावर त्या गरम चपला हातात घेऊन निघाल्या तर स्वयंपाकघराच्या उंबरठ्यापाशी गुरुजी उभे! त्या माऊलीने शांतपणे त्या चपला गुरुजींच्या पायाजवळ ठेवल्या. त्या क्षणाला जराही धक्का न लावता शांतपणे जिना उतरून गुरुजी निघून गेले ! ...सहज कोणाला सुचणारसुद्धा नाही अशी त्या माऊलीची ती कृती. कोणताही अविर्भाव नसलेली. कुठून आली असेल ती? त्या आईच्या पोटातील मायेतून? की, आपल्या मुलीच्या तळहातावर स्वर नावाची जगातील सर्वांत सुंदर, अमूर्त गोष्ट ठेवणाऱ्या गुरूबद्दल मनात असलेल्या असीम कृतज्ञतेतून?

- आजच्या करकरीत व्यवहारी काळाला नक्कीच ही दंतकथा वाटेल. किंवा अगदी वेडेपणासुद्धा. माझ्या कानावर ती सांगोवांगी आली असती तर मीही ती मोडीतच काढली असती! पण, एका साध्याशा स्त्रीने केलेल्या त्या एका कृतीने मला संगीत-नृत्याकडे बघण्याची एक अगदी वेगळी दृष्टी दिली. पानाफुलांच्या गच्च गर्दीत लपून बसलेले एखादे अनवट रंगाचे अबोल फूल अवचित हाती यावे तशी. संगीतातील राग, त्याचे चलन, त्यातील बंदिशी, समेचे अंदाज, ते चुकवणाऱ्या तिहाई, रागाभोवती असलेल्या वर्जित स्वरांच्या अदृश्य चौकटी हे सगळे ओलांडून त्याच्या पलीकडे बघण्याची दृष्टी. संगीताबद्दल आणि त्यातील स्वरांबद्दल निखळ आणि फक्त कृतज्ञतेची भावना निर्माण करणारी दृष्टी. एकाकी वाटत असताना हलकेच बोट धरून आपल्याबरोबर चालणारे, वेदनेच्या क्षणी थोपटत स्वस्थ करू बघणारे, हाक मारताच कधीही, कुठेही वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आपल्यापर्यंत येणारे हे स्वर. केसरबाईंच्या आईला त्या स्वरांच्या शास्त्राबिस्त्राची ओळख नसेल पण तिच्या मुलीच्या जगण्याला आणि असण्याला त्या स्वरांमुळे प्रतिष्ठा मिळतेय हे नक्की कळत होते. तव्यावर मायेने जोडे शेकणारे तिचे हात म्हणजे तिच्या भाषेत कृतज्ञतेने केलेला नमस्कार असावा?

- हे मनात आले आणि मग असे हात वेगवेगळ्या रूपात दिसू लागले. संगीत ऐकत असताना, मग ते मैफलीचे असो किंवा तीन मिनिटे वाजणारे एखादे गाणे, त्याबद्दल कृतज्ञ वाटण्याचा रसरशीत क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. कलाकाराच्या आयुष्यात तो येतोच आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या श्रोत्याच्याही. वाऱ्याची झुळूक यावी आणि निघून जावी तसा तो येतो आणि जातो. पण कधीतरी अशा क्षणातून काहीतरी स्फुरते. एखादा राग, एखादी बंदिश किंवा असेच काहीबाही. हा विचार करताना मग वाटू लागले, खांद्यावर घट्टे पडेपर्यंत गुरूच्या घरी कावडीने पाणी भरता-भरता गुरूस्तुतीचे स्तवन सुचू शकते ते या भावनेतूनच. हे साप्ताहिक सदर म्हणजे अशा क्षणांना पकडण्याचा एक प्रयत्न आहे. एरवी जगण्याच्या कोलाहलात असे कोवळे क्षण वेळोवेळी हातातून निसटून जात असतात. पण काही वेळ ओंजळीत घेऊन ते बघितले तर त्यात असलेले निर्मितीचे एक सशक्त बीज दिसू शकते..! ते दिसावे यासाठी हा प्रयत्न.

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com