शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

एलॉन मस्क जपानी अब्जाधिश चंद्रावर जाण्यासाठी चांद्रपर्यटकांची टीम तयार करतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:00 IST

एलॉन मस्क यांच्या बिग फाल्कन रॉकेटमधून चंद्रावर प्रवासाला जाणारे पहिले प्रवासी असतील चाळिशीतले युसाका मेजवा! हा जपानी अब्जाधीश माणूस आपल्यासोबत लेखक-चित्रकार- गायक-संगीतकार अशा प्रतिभावंतांनाही घेऊन जाणार म्हणतो आहे.

-पवन देशपांडे

इलॉन  मस्क हे नाव तुम्ही ऐकलंच असेल.. नसेल तर एकदा गूगल करून बघा.. या अब्जाधीशाने आतापर्यंत सगळ्यांना अचंबित करणा-या गोष्टीच केवळ केल्या आहेत. हवेच्या दाबावर ताशी हजार किमी वेगाने धावणारी ‘हायपरलूप’ वाहतूक सुरू करण्यासाठी धडपडणारा हाच. मंगळ पर्यटनाचे स्वप्न दाखवणाराही हाच. आता या अवलिया मस्कने आणखी एक भन्नाट आयडिया जाहीर केली आहे. 2023 मध्ये चंद्रावर जाऊन येण्यासाठी ‘चांद्र-पर्यटकां’ची एक टीम तो पाठवणार आहे. 

या मोहिमेसाठी बिग फाल्कन रॉकेट नावाचे खास यान तयार केले जात आहे. हे यान जवळपास 35 मजली इमारतीएवढय़ा उंचीचे असेल. त्याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते चांद्रमोहिमेसाठी तयार होईल असा मस्क यांचा दावा आहे. मस्क यांची कंपनी स्पेसेक्स हे यान तयार करणार आहे आणि याचा संपूर्ण खर्च जवळपास 5 अब्ज डॉलर आहे. 

केवळ 42 वर्षे वय असलेले युसाका मेजवा हे जपानी अब्जाधीश या प्रवासी- चांद्रमोहिमेतले पहिले पर्यटक असतील. युसाका म्हणतात, ‘‘समजा पाब्लो पिकासो नावाच्या महान चित्रकाराने जर चंद्र अगदी जवळून पाहिला असता तर त्याच्या कुंचल्यातून आणखी कशा प्रकारच्या कलाकृती कॅनव्हॉसवर उतरल्या असत्या? जर जॉन लेनन या गीतकाराने पृथ्वीची गोल बाजू वर अवकाशातून पाहिली असती तर त्याच्या गीतांमध्ये आणखी जादू आली असती का? जर ही मंडळी एकदा तरी अवकाशात जाऊन आली असती तर त्यांच्या कलाकृती कोणत्या उंचीच्या असत्या? आज ही जर- तरची भाषा असली तरी ती लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. जे स्वप्न आजपर्यंत आपण पाहिलेलेच नाही, ते कदाचित सत्यातही येऊ शकेल. जे गीत आपण ऐकलेले नाही ते तयार होईल आणि जे चित्र आजपर्यंत कॅनव्हॉसवर उतरलेले नाही, ते प्रत्यक्षात सजीव होईल’’ चांद्रमोहिमेवर आतापर्यंत 24 जण गेले; पण त्यातले 12 प्रत्यक्षात चंद्रावर उतरले आहेत. गेल्या 46 वर्षांमध्ये एकही जण चंद्रावर पोहोचला नाही. एवढेच नाही तर आतापर्यंत चंद्रावर गेलेली प्रत्येक व्यक्ती केवळ अंतराळवीर होती. आत्ताची मस्क यांची ही मोहीम मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. या बिग फाल्कन रॉकेटमध्ये बसून अब्जाधीश युसाका मेजवा झेपावणार आहेत. आणि ते एकटे नसतील. त्यांच्यासोबत असेल चित्रपट निर्माता, नर्तक, चित्रकार, लेखक, संगीतकार, फॅशन डिझाइनर, शिल्पकार, फोटोग्राफर आणि वास्तुकलातज्ज्ञ अशा सृजनशील व्यक्तींची फौज. या मंडळींची नावं अजून ठरली नसली तरी युसाका यांनी त्यासाठी सर्वांनाच आमंत्रित केले आहे. 

ही मोहीम यशस्वी झाली तर 1972 सालानंतरची पहिली यशस्वी चांद्रमोहीम ठरेल. चंद्रावर जाण्याचा खर्च कमी नाही. या संपूर्ण मोहिमेवर 5 अब्ज डॉलर खर्च होणार आहेत. त्यातले अध्र्याहून अधिक अर्थातच युसाका मोजणार असेल, असा तर्क लावला जातो आहे आणि त्यामुळेच मस्कने त्यांना या मोहिमेसाठी निवडले असावे. पण युसाका आणि त्यांच्या सृजनशील व्यक्तींची टीम चंद्रावर बहुदा पाऊल ठेवणार नाही. हे लोक केवळ चंद्राच्या भोवती फिरतील, अशी सध्याची योजना आहे. येऊ घातलेल्या या अजब चांद्रमोहिमेच्या गजब कहाणीची पटकथा लिहिण्याची सुरुवात झाली आहे. पण ती पूर्ण होणार का, प्रत्यक्षात येणार का, असे प्रश्न सध्या जगभरातील संशोधक-शास्त्रज्ञांमध्ये चर्चिले जात आहेत. कारण मस्क यांच्या स्पेसेक्स या कंपनीने पुनर्वापर होऊ शकेल, अशा रॉकेटने प्रत्यक्षात आत्तापर्यंत एकाही व्यक्तीला अवकाशात नेलेले नाही. मस्क यांची टीम एका अशाच कॅप्सूलवर काम करत आहे. या कॅप्सूलमध्ये बसून नासाची टीम इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहे; पण अजून त्याचीही प्रतीक्षा आहे. शिवाय मस्क यांनी यापूर्वीही गेल्या वर्षी अशाच प्रकारे चांद्रपर्यटनाची योजना जाहीर केली होती, तिही अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. मस्क यांनी मंगळ ग्रहावर पर्यटकांना घेऊन जाण्याची योजना आखली; पण अजूनही ती हवेतच आहे. मस्क यांच्या अशा अनेक योजना आत्तापर्यंत केवळ संशोधन आणि डिझाइनच्या पातळीवर आहेत. त्यातूनही ही नवी चांद्रमोहीम यशस्वी ठरली तर, अवकाशवीरांशिवाय झालेली पहिली सृजनशील चांद्रमोहीम ठरेल. आणि त्यानंतर येणार्‍या सर्व साहित्यकृती, कलाकृती ह्या प्रत्यक्ष अनुभवावर बेतलेल्या असतील. अस्सल असतील. ..त्यांची सध्या तरी आपण केवळ प्रतीक्षा करू शकतो.

 

100 खोल्यांचे 35 मजली रॉकेट

या चांद्रमोहिमेसाठी वापरले जाणारे बिग फाल्कन रॉकेट अजूनही विकसित होत आहे. त्याची चाचणीही अद्याप दूर आहे. 35 मजली इमारतीएवढय़ा उंचीच्या या रॉकेटमध्ये 100 खोल्या असतील. त्याचे दोन भाग असतील. एक असेल बूस्टर रॉकेट, तर दुसरे असेल प्रत्यक्ष यान. हे यान नंतर काही दिवस चंद्राभोवती फिरेल. 150 टन वजन ते वाहून नेऊ शकेल. हे रॉकेट प्रथम 2022 मध्ये मंगळावर झेपावेल. ते परत येऊच शकले तर त्याची वारी चंद्रावर होईल. 

टिनटिनने दिली आयडिया

बिग फाल्कन रॉकेट तयार करण्याची आयडिया एका कॉमिक्सवरून घेण्यात आली आहे. बेल्जियन काटरूनिस्ट जॉर्ज रेमी यांच्या टिनटिन या 24 भागांच्या कॉमिक्समधील ‘द अँडव्हेंचर ऑफ टिनटिन’मध्ये अशीच चांद्रमोहीम आखली जाते. त्यात तयार काल्पनिकरीत्या वापरल्या गेलेल्या रॉकेटच्या डिझाइनने मस्क यांना प्रेरित केले. त्यातून मग बिग फाल्कन रॉकेटचे डिझाइन तयार झाले आहे.    

(लेखक ‘लोकमत’ मुंबई कार्यालयात  मुख्य उपसंपादक आहेत)

pavan.deshpande@lokmat.com