शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

ही ‘जोहरा’ जगू शकेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 06:05 IST

२०१०ला काबूलमध्ये मुलींची एक संगीत शाळा सुरु झाली! मुलींची शाळा, संगीत म्हटल्यावर जिथे  तालिबान्यांची बंदूक लगेचंच उठते, अशा ठिकाणी मुलींचा संगीताचा रियाज सुरू होता. आपल्या देशाचं संगीत त्यांना पुनरुज्जीवित करायचं होतं. त्यासाठी या मुली जगभर हिंडल्या.. आज कुठे आहे ती शाळा आणि त्या मुली?...

ठळक मुद्देमोठ्या उमेदीने जोपासलेल्या संगीताच्या या बागेत आता बंदुका घेऊन दहशतवादी शिरले आहेत. जागोजागी दिसतायत सतारीच्या तुटलेल्या तारा आणि रोबाबच्या खुंट्या...

- वंदना अत्रे

त्या गावातील फुलपाखरांची बाग आता उजाड झाली आहे. मध गोळा करण्यासाठी दूरदूरच्या प्रांतातून येणारी फुलपाखरे घाबरून, आपले इवलेसे रंगीबेरंगी पंख मिटून धपापत्या उराने गप्प बसून आहेत. कधीतरी पुन्हा बागेतील झाडांवर उन्हे येऊन हसरे दिवस उजाडण्याच्या क्षीण आशेवर...! पण ही आशा तरी बाळगायची कोणाच्या भरवशावर? दहशतीच्या मुठीत गुदमरत असलेल्या या गावापासून दूर जाण्यासाठी विमानाला लटकणाऱ्या आणि या खटाटोपात जीव गमावणाऱ्या, स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कोण्या गोऱ्या सोजीराच्या हातात सोपवून देणाऱ्या आणि फटाके फुटावे तशा बंदुकीच्या फैरी मजेत जागोजागी उडत असणाऱ्या या गावात फुलपाखरांच्या बागेचा विचार करणार तरी कोण आणि कशाला? आणि त्या बागेचा माळी? स्वतःचे जगणे, संसार याची मोळी बांधून स्वतःच्या पाठीला बांधून तो जगभर फिरत होता. ज्याला-त्याला पटवून देत होता, जगातील युद्ध आणि हिंसा संपवायची तर एकच उपाय आहे, स्वरांच्या बागा जागोजागी फुलवल्या पाहिजेत. त्यात मध गोळा करणारी फुलपाखरे जोपासली पाहिजेत... त्याने मोठ्या उमेदीने जोपासलेल्या बागेत आता गावातील बंदुका घेऊन दहशतवादी शिरले आहेत. जागोजागी दिसतायत सतारीच्या तुटलेल्या तारा आणि रोबाबच्या खुंट्या...

xx

२०१० साली, बरोबर दहा वर्षांपूर्वी डॉ अहमद सरमस्त यांनी काबूलमध्ये अफगाणिस्तान नॅशनल म्युझिक स्कूलची स्थापना केली. अनेक अर्थाने ती शाळा अनोखी होती. युद्धाने जर्जर झालेल्या आणि या संघर्षात सगळ्या सांगीतिक परंपरा इतिहासाच्या अंधाऱ्या गुहेत ढकलून देणाऱ्या आपल्या देशातील, अफगाणिस्तानमधील संगीत पुनरुज्जीवित करण्याच्या वेडाने झपाटले होते त्यांना. रस्त्यावर बबलगम आणि उकडलेली अंडी विकून रोजचे घर चालवणाऱ्या छोट्या मुलांना आणि सतत बुरख्यात राहून आपल्या अम्मी-अब्बूचा डुगडुगता संसार चालवण्याच्या ओझ्याखाली वाकलेल्या मुलीना संगीताचे धडे देण्याची प्रखर महत्त्वाकांक्षा घेऊन ते जगभर प्रवास करीत होते. शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी, आपल्या या प्रयोगाचे महत्त्व जगातील सत्ताधीशांना समजावून सांगण्यासाठी. गेली दोन दशके धुमसत असलेल्या युद्धभूमीत संगीताची शाळा चालवण्याच्या त्याच्या कल्पनेला बहुतेकांनी वेड्यात काढले; पण काही माणसे आणि संस्था निर्धाराने त्यांच्या मागे उभी राहिली. काबूलमधील घराघरांमध्ये जाऊन या शिक्षणाची गरज पटवून देत त्यांनी मुलांना आपल्या स्वप्नात सामील करून घेतले आणि काबूलच्या भरवस्तीत उभी राहिलेली संगीताची ती शाळा गजबजली. संगीताचे शिक्षण देण्यासाठी युरोप-अमेरिकेपासून भारतापर्यंत अनेक देशांमधील कलाकार शिक्षक तिथे आले. देशोदेशीची वाद्ये आली. “संगीतासारख्या थिल्लर गोष्टींची या देशाला गरज नाही” असे सांगून दर दिवशी नवनवे फतवे काढणाऱ्या मुल्ला-मौलवींचे आदेश गुंडाळून ठेवत या शाळेत प्रथमच मुले आणि मुली एकत्र संगीत शिक्षणाचा आनंद घेऊ लागली. एवढे काही घडू लागल्यावर आपल्या धमक्या पोकळ नाहीत, हे सिद्ध करणे तालिबान्यांसाठी गरजेचे झाले ! आणि मग शाळेच्या एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून आलेल्या आणि डॉ. सरमस्त यांच्या मागेच बसलेल्या सुसाईड बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात डॉ. सरमस्त जबर जखमी झाले. दोघे जण ठार आणि कित्येक घायाळ झाले. डोक्यात शार्पनेल घुसल्याने तात्पुरते बहिरेपण आलेल्या डॉ. सरमस्त यांच्यावर त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दहशतीचे हे रौद्र रूप मुलांना थिजवून टाकणारे असले तरी मुले मागे हटली नाहीत, कारण आजवर कधीच अनुभवास न आलेले अतिशय आनंदाचे दुर्मीळ क्षण त्यांच्या ओंजळीत होतेच की...

बुरख्याचे बंधन झुगारून या शाळेत शिकलेल्या आणि आपल्या आवडीचे वाद्य घेऊन रंगमंचावर उभ्या फक्त मुलींच्या ‘जोहरा’ या पहिल्या-वहिल्या वाद्यवृंदाने अफगाणिस्तानच्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवले तेच जणू इतिहास घडवण्यासाठी! दर वर्षी जिनेव्हामध्ये जमून जगाच्या अर्थव्यवहारांची चिंता वाहणारे देशोदेशीचे विचारवंत यांना ‘जोहरा’च्या निमित्ताने अफगाणिस्तानचे असे रूप दिसले जे आजवर क्वचितच कोणालाच दिसले होते! काबूलमधील घराची सीमा न ओलांडलेल्या या मुली सगळा युरोप आणि तेथील प्रतिष्ठित कला महोत्सवांमधून हजेरी लावत, भविष्याचे वायदे आणि स्वप्नांची देवाणघेवाण करीत काबूलमध्ये परतल्या ते भयावह वास्तवाला सामोरे जाण्यासाठी..

संगीतावर मनोमन कमालीचा रोष असलेल्या तालिबानींना धर्म संगीत वगळता संगीत नावाची ‘उठवळ गोष्ट’ आपल्या भूमीत वाजणे मुळी मान्यच नाहीय. त्यामुळे संगीताचे कार्यक्रम करणे वगैरे दूर राहो, ते ऐकणाऱ्यांचेसुद्धा प्रसंगी कान छाटले जातात. त्यामुळे काबूल ताब्यात आल्यावर काही तासांमध्येच हातात कट्टर तालिबानी या शाळेत शिरणे अपेक्षितच होते. शाळा ताब्यात घेण्यापेक्षा संगीत निर्माण करणाऱ्या वाद्यांचा विध्वंस करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. बंदुकीचे वार करून शाळेतील वाद्य फोडून-ठेचून झाल्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी-आणण्यासाठी ठेवलेल्या गाड्या त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. आता याच्या पुढचा टप्पा म्हणजे, काबूलमध्ये घराघरांमध्ये जाऊन वाद्यांचा शोध घेतला जाईल आणि ते वाद्य बाळगणाऱ्या घराला आणि त्या वाद्याला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल ! शाळेत झालेल्या विध्वंसाचे चित्रण असलेले संदेश या शाळेचे जगभरातील हितचिंतक आणि माजी विद्यार्थी या प्रत्येकाकडे वेगाने पोहोचले; पण शाळा वाचवायची तर कशी? रोज बळी मागणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घायची तर कोणी आणि कशाला? या शाळेत शिक्षण घेऊन सध्या अमेरिकेत संगीतात मास्टर्स करणारा पियानोवादक एल्हम फनुसच्या मेसेज बॉक्समध्ये हे संदेश पडले तेव्हा शाळेत शिकलेली एक धून तो कोणासाठी तरी रेकॉर्ड करीत होता. मेसेज मिळाल्यावर पियानो बंद करून तो उठला. ‘अफगाणिस्तान म्हणजे कोणत्याही कलेचा कधीच स्पर्श न झालेली दफनभूमी होती असेच आमच्या पुढील पिढ्यांना वाटत राहणार नक्की...’ त्याने उत्तर दिले.

आणि तेथील तरुण मुली? त्यांच्यापैकी काहींच्या वाट्याला आलेला ‘जोहरा’ नावाचा तो मंतरलेला अनुभव? अकाली पोरकेपण वाट्याला आलेल्या त्यांच्या या अनुभवाच्या दुःखाचे चटके जगभरातील स्त्रियांना भाजत राहतील...

म्हणून तरी फुलपाखरांची ती बाग पुन्हा वसवली पाहिजे..!

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

vratre@gmail.com