शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

भापकर गुरुजी

By admin | Updated: April 15, 2017 16:29 IST

‘समाजसेवा’ या विभागातून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या सन्मानाचे विजेते ठरलेले राजाराम भापकर यांच्या लोकविलक्षण जिद्दीची कहाणी...

 १९६० सालातली गोष्ट.

अहमदनगर जिल्ह्यातले गुंडेगाव डोंगरात वसलेले. पलीकडच्या तालुक्याला जायचे तर मधला डोंगर ओलांडायला चाळीसेक किलोमीटरचा वळसा. अर्जफाटे करून सरकार ऐकेना. तेव्हा गावातल्या शाळेतले भापकर गुरुजी म्हणाले, मी बांधतो रस्ता! - त्यांनी मजूर कामाला लावले, त्यांच्या पगारासाठी स्वत:चा खिसा कापत राहिले. घाम गाळून, आयुष्यभराची पुंजी खर्चून गुरुजींनी गावासाठी डोंगर फोडून  रस्ता बांधला... आणि आता ‘गुंडेगाव ते कोळगाव’ या कच्च्या रस्त्यावर एसटीची गाडी धावायला लागली आहे.
 
 
मी उद्यापासून गावच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करतो आहे. जो श्रमदान करू इच्छित असेल त्याने श्रमदान करावे. ज्याला मजुरी हवी असेल त्याला मजुरी मिळेल. फुकट कुणालाही राबवून घेणार नाही.’
- ही कुणा उद्योगपतीने केलेली घोषणा नाही. ही घोषणा आहे महाराष्ट्रातील दशरथ मांझीची. ज्या अवलियाने आपली सर्व जिंदगी रस्त्यांच्या निर्मितीत घातली त्या गुंडेगावच्या (ता. जि. नगर) राजाराम भापकर यांची. १९६० साली या माणसाने अशी घोषणा केली आणि पुढे आयुष्यभराच्या कष्टांनी गाठीशी बांधलेली सगळीच्या सगळी पुंजी गावच्या रस्त्यांसाठी वापरली. 
गावात रस्ते साकारण्याचा हा एक वेगळाच ‘भापकर पॅटर्न’ आहे. बिहारच्या दशरथ मांझी यांनी साकारलेल्या रस्त्यांची कहाणी सिनेमाच्या पडद्यावर आली. पण गुंडेगावातही हा मांझी आहे. सरकारचा एक छदामही न घेता त्यांनी स्वत:च्या हिमतीवर रस्ते बनवून दाखविले. 
गुंडेगाव हे अहमदनगर तालुक्यातील साधारण सात हजार लोकसंख्येचे गाव. गावच्या आजूबाजूला डोंगर. जंगल. गावाचा व्यास सुमारे १४ किलोमीटरचा आहे. एक काळ असा होता या गावात नगरहून जाणारा एकच मुख्य रस्ता होता. तीही गाडीवाट. त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. हे गाव श्रीगोंदा तालुक्याला लागून असल्याने बहुतांश व्यवहार त्या तालुक्यावरही अवलंबून आहेत. मात्र या दोन तालुक्यांत डोंगर आडवे होते. त्यामुळे ३५-४० किलोमीटरचा वळसा घालूनच डोंगरापलीकडे जाता येई. किंवा डोंगरातून पायपीट करावी लागे. शेजारील कोळगावला एक शासकीय दवाखाना होता. तेथे जायचे म्हटले तरी रुग्णाला घोड्यावरून अथवा डोलीत बसवून नेण्याशिवाय पर्याय नव्हता. डोंगर फोडून रस्ते तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी सरकारकडे अनेक अर्जफाटे केले. वर्षातून चार-पाच तरी अर्ज जायचे. पण, हे रस्ते राज्य सरकारच्या नकाशात नाहीत. हे ‘नॉन प्लॅन’ रस्ते आहेत, असे अधिकाऱ्यांचे ठरलेले उत्तर असे. गावात गेल्यानंतर गावकरी या सर्व कहाण्या आजही ऐकवतात. अखेर राजाराम भापकर (सध्याचे वय ८३) यांनी या गावचे रस्ते सरकारच्या नकाशांवर आणि ‘गुगल’ मॅपवरही आणले. पण, त्यासाठी त्यांना चाळीस-पन्नास वर्षे डोंगरांशी झुंज द्यावी लागली.
ते व्यवसायाने प्राथमिक शिक्षक. १९५९ च्या दरम्यान शिक्षक म्हणून ते स्वत:च्याच गावात बदलून आले. तेव्हा त्यांना रस्त्यांची अडचण प्रकर्षाने जाणवली. रस्ते होण्याचा मार्गच दिसत नसल्याने एक दिवस त्यांनी गावकऱ्यांना एकत्र जमवले. शासन आपली हाक ऐकत नाही आणि कोणी पैसेवालाही पुढे येत नाही. त्यामुळे ‘गुंडेगाव ते कोळगाव’ हा दहा किलोमीटरचा रस्ता आता आपण स्वत: तयार करणार आहोत, मी स्वत: त्यासाठी पैसे खर्च करेन, अशी घोषणाच त्यांनी एक दिवस केली. सगळे गाव अचंबित झाले. 
शिक्षक शाळा सुधारू शकतो, पण शिक्षक रस्ता साकारणार? पैसे कोठून आणणार? गाव आणि कुटुंबीयांनाही हा वेडेपणा वाटला. अगोदर श्रमदानाचे आवाहन केले गेले. पण लोक श्रमदान तरी किती दिवस करणार? मग, मजुरांमार्फत कामाची सुरुवात झाली. या मजुरांचा पगार भापकर यांनी स्वत:च्या खिशातून द्यायला सुरुवात केली. शाळेच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारापैकी निम्मी रक्कम घरी खर्चाला आणि निम्मी रस्त्याच्या कामावरल्या मजुरांच्या पगाराला असे सूत्र त्यांनी ठरविले होते. मजुरांकडून दररोज एक तास ते जादा काम करून घ्यायचे. हे त्यांचे श्रमदान. ते स्वत:ही शाळा सुटली की खोरे-टिकाव घेऊन रस्त्यावर असत. पैशांची फारच चणचण आली की काम बंद. गुंडेगाव ते कोळगाव या दरम्यानचा डोंगर फोडला तरच तेथे रस्ता निघणार. त्यासाठी सुरुंग, मशीनरी हा सगळा खर्च भापकर यांनी स्वत: केला. पैशांअभावी मध्ये अनेक दिवस या रस्त्याचे काम बंदही ठेवावे लागले. मात्र, आता हा घाटरस्ता पूर्णत्वास गेला आहे. त्यासाठी जवळपास ३३ वर्षे लागली. निवृत्तीनंतर मिळालेला भविष्य निर्वाह निधी आणि इतर सगळे पैसे त्यांनी या रस्त्यासाठी खर्च केले. चार महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून नगर-पुणे अशी बसही धावायला सुरुवात झाली. 
गुंडेगावजवळच कोथूळ येथे खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे अंतर पाच किलोमीटरचे. मात्र, येथेही रस्ता नव्हता. डोंगर तुडवतच भाविकांचे जाणे-येणे सुरू होते. या रस्त्याचीही भन्नाट कहाणी आहे. या रस्त्याचा आराखडाच नव्हता. रस्ता कसा न्यायचा? किमान नकाशा तर हवा. भापकर हे नगरला इंजिनिअरकडे आले. पण आराखडा करायला दोन-तीन महिन्यांचा कालावधी आणि पैसे या दोन्ही गोष्टी लागणार होत्या. यावरही त्यांनी वेगळाच उतारा शोधला. गावातील गाढवं या डोंगरमाथ्यावर सहज जातात येतात हे त्यांनी पाहिले होते. एक दिवस त्यांनी दोन गाढवांवर चुन्याच्या गोण्या टाकल्या. त्या गोण्यांना छोटी भोकं पाडली व पिटाळली गाढवं थेट खंडोबाच्या मंदिराकडे. गाढवांनी जो मार्ग दाखविला त्याच मार्गाने पुढे रस्ता बनला. गाढवांनाच इंजिनिअर बनविले गेले. भापकर यांनी या पद्धतीने सात रस्ते साकारले. त्यांची लांबी सुमारे चाळीस किलोमीटरवर पोहोचते. या रस्त्यांत सात डोंगरघाट आहेत. रस्त्यांचा मार्ग काढणे, जागा मिळविणे ही बाबही सोपी नाही. त्यासाठी अनेकांना विनवण्या करून त्यांनी मार्ग काढला. या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार मिळू लागले. त्या रकमाही त्यांनी रस्त्यांवरच खर्च केल्या आहेत. रस्ते मुरूम-मातीचे असले तरी दणकट बनलेत. या रस्त्यांसाठी वापरलेले तंत्रज्ञानही अभियंत्यांनी समजावून घ्यावे, असे आहे. आसपासचा मुरूम उचलायचा व तो रस्त्यांवर टाकायचा. त्यामुळे कमी खर्चात रस्ते साकारले. आज या रस्त्यांवर जिल्हा परिषदेने आपल्या पाट्या लावल्या. पण, यात भापकर हेच मैलाचा दगड आहेत. 
ते स्वत: महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे चाहते आहेत. या दोघांनाही ते भेटलेले आहेत. गांधीजींना भेटण्यासाठी ते थेट गुजरातमध्ये गेले होते. गांधीजींनी देशासाठी चारहात खादी शरीराला गुंडाळली. आपण त्या त्यागाची परंपरा जपली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. भापकर यांनी या सर्व प्रवासात कुटुंबाचीही पर्वा केली नाही. घरदार आणि शेत सोडून त्यांचे आयुष्य बराच काळ रस्त्यावरच गेले. ‘रस्त्यांसाठी आजवर किती पैसे खर्च केले?’ याचा हिशेब व तपशीलही त्यांच्याकडे नाही. ते गमतीने म्हणतात, ‘हा हिशेब मी ठेवला असता तर घरच्यांनी मला घराबाहेरच काढले असते.’ मी रस्त्यांसाठी जन्मलो, तुमचा जन्म कशासाठी आहे हे तुम्ही ठरवा, असे त्यांचे कुटुंबीयांना सांगणे आहे. विवाह करतानाही कुटुंबासमोर अट ठेवून त्यांनी जाणीवपूर्वक अपंग मुलीशी विवाह केला. ‘डोंगर फोडणारे गुरुजी’, ‘रस्तेवाले गुरुजी’ अशा अनेक नावाने त्यांना आता ओळखले जाते. डोंगर फोडायला सुरुवात केली तेव्हा गावातील अनेकांनी ‘वेडा मास्तर’ म्हणून भापकर यांना हिणवायला सुरुवात केली. आज मात्र मित्रांनी त्यांच्या घरासमोर ‘समाजसेवक भापकर गुरुजी’ असा फलक लावलाय.
-सुधीर लंके
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.sudhir.lanke@lokmat.com)