ठळक मुद्देगप्पा होत राहिल्या; पण काही प्रश्न मात्र त्या फोनने त्यांच्या कानापर्यंत जणू नेलेच नाहीत. उदाहरणार्थ, शादी झाल्यावर काही वर्षे शोहरने जाहीर मैफली करायला बंदी केली, तेव्हा कोणती तगमग झाली? रोजचा रियाझ सुरू केल्यावर पडोसी कुरकुर करू लागले, आम्हाला आवाजाचा त्रास होतो म्हणून (!!!) तेव्हा कोणता तोडगा काढला?
- वंदना अत्रे‘यंदा दिवाळी अंकासाठी कोणाची मुलाखत?’- ‘फरिदा खानूमशी गप्पा मारल्यात यंदा.’‘फरिदा खानूम? नाव खूप ऐकलेय..? कोण गं..?- ‘ती गझल नाही का ऐकलीस कधी? आज जानेकी जिद ना करो...’‘हो.. हो.. त्या का? कसली गायलीय ना ती...’गेल्या महिन्याभरात चार-पाच वेळा हा संवाद होत असताना प्रकर्षाने जाणवले, माणसांना आपण कसे फक्त संदर्भाच्या चौकटीमध्ये ठाकून ठोकून बसवतो आणि त्यातच बघत असतो ना? त्या चौकटी उतरवून जरा मोकळ्या अवकाशात तीच माणसं बघण्याची वेळ आली की कितीतरी वेगळी दिसू लागतात आणि मग जरा अधिकच आवडू लागतात ती...! फरिदाजी अशाच. एकाच गझलच्या चौकटीत अडकलेल्या. फक्त एका गझलसाठी ज्यांना आजवर जगभरातून सहा लाखांहून अधिक लाइक मिळालेले आहेत आणि जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपºयात रोज किमान दहा तरी रसिक ती पुन्हा ऐकत-ऐकवत असतात, अशा एका गझलची ही गायिका.
या एका गझलपलीकडे, लाइक करावे आणि ऐकता - ऐकता व्याकूळ व्हावे असे दुसरे काहीच, कधीच गायल्या नसतील त्या? काय आहे ते गाणे? कोणाकडून मिळालेले? असे कितीतरी प्रश्न या मुलाखतीचा प्रस्ताव समोर आला तेव्हा पडले होते. एरवी ‘दीपोत्सव’साठी मुलाखत म्हणजे त्या कलाकाराशी प्रत्यक्ष तास दोन तासांच्या ऐसपैस गप्पा. पण सध्याच्या सर्जिकल स्ट्राइकच्या धामधुमीत देशाची सीमा ओलांडून लाहोरपर्यंत पोहचणे दुस्तर. तेव्हा प्रथमच जाणवले, भूगोलाच्या नकाशातील सीमारेषा प्रत्यक्षात माणसांना एकमेकांपासून अशा अंतरावर ठेवतात जिथून त्यांचा आवाज कानावर येतो; पण त्या आवाजाबरोबर डोळ्यात येणारा भाव दिसू शकत नाही.. आणि कधी पाठीवर हात ठेवावासा वाटला, प्रेमाने हात हातात घेऊन आपल्या मनात कित्येक वर्षांपासून साचलेली कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली तर ती व्यक्त करता येत नाही... अशा वेळी कानावर येणारा तो आवाज, ते शब्द अगदी अपुरे, कोरडे वाटू लागतात आणि तरी आपण अगतिक होत पुन: पुन्हा सांगू बघतो, त्या कलाकाराच्या स्वरांनी आपल्या आयुष्यात कशी पुन्हा पुन्हा साथ दिली ते......मलिका-ए-गझल सन्मान मिळवित बेगम अख्तरनंतर तब्बल तीस वर्षे जगातील पहिल्या क्रमांकावर राज्य करणारी गझल गायिका फरिदा खानूम फोनवर प्रथम भेटल्या तेव्हा त्यांना तेच सांगत होते मीही. त्यांच्या बाकीच्या आवडत्या गझलविषयी बोलत होते. वयाची नव्वदी जवळ आलेली, आवाजात एक अजीब थकान, पण गप्पा मारायला उत्सुक. गप्पांची वेळ भारतातील दुपारची चारच्या आसपासची... पहिल्या दिवशी आदाब-शुक्रि या वगैरे सगळे उपचार झाले. दुसºया दिवशी फोन केला तेव्हा बेगमसाहिबा चहा पिता-पिता मला म्हणत होत्या, ‘आप चाय लेती हैं या नही?... ये तो इंडियामे चायका वक्त हंै..’ किती साधासा हा प्रश्न. अगदी उपचार म्हणून विचारला आहे असे वाटण्याइतका. मला मात्र उगाच त्यामागे दिसत होत्या, त्यांच्या भारतातील जुन्या आठवणी. त्यांच्या तेव्हाच्या कलकत्त्यातील. मोठ्या बहिणीच्या घरात असलेली बेगम अख्तरसारख्या तालेवार कलाकारांची वर्दळ, त्यांच्यासाठी रसोइमध्ये शिजणारी शाही बिर्याणी आणि त्याच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत रंगणारी शेरोशायरी.. अगदी लहान वयात अनुभवलेले ते दिवस त्यांच्या स्मरणात असतील अजून? बेगम अख्तर यांच्या ‘दिवाना बनाना हैं तो दिवाना बना दे’ या गझलने धुमाकूळ घालण्याचे ते दिवस, तो जादूभरा माहोल अत्तराच्या कुपीसारखा असेल का त्यांच्या मनात? आयुष्याला आहे - नाहीच्या जळत्या खुंटीवर टांगणारे फाळणीचे ते दिवस? ते आठवत असतील त्यांना? आणि आठवले तरी सीमेपलीकडून जेव्हा कोणी त्याविषयी विचारते तेव्हा बोलता येईल त्याच्याबद्दल? नाहीच.. हातात रोजचाच फोन; पण त्यावर बोलत असलेल्या दोघांच्या मनात जेव्हा सतत ती फुत्कार टाकत असलेली सीमा असते तेव्हा काही गोष्टींचा उच्चार नाहीच करता येत. असाच हा अनुभव होता; पण कदाचित बेगमसाहिबांना त्या कटु आठवणींपेक्षा या देशाने दिलेले प्रेम अधिक मोलाचे वाटत होते. कोलकात्यातील लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये झालेली त्यांची मुलाखत आणि त्याला लोटलेली अलोट गर्दी, मुंबईमध्ये साक्षात लतादीदींनी घरी बोलावून केलेलं कौतुक.. हे सगळं त्यांना आठवत होते आणि सुखावत होते...गप्पा होत राहिल्या; पण काही प्रश्न मात्र त्या फोनने त्यांच्या कानापर्यंत जणू नेलेच नाहीत. उदाहरणार्थ, शादी झाल्यावर काही वर्षे शोहरने जाहीर मैफली करायला बंदी केली, तेव्हा कोणती तगमग झाली? रोजचा रियाझ सुरू केल्यावर पडोसी कुरकुर करू लागले, आम्हाला आवाजाचा त्रास होतो म्हणून (!!!) तेव्हा कोणता तोडगा काढला? फाळणी झाल्याचे समजले तेव्हा पीर पांजालमध्ये थंड हवेच्या ठिकाणी सुटीसाठी गेलेले हे कुटुंब, फाळणीच्या बातमीने आणि अनुभवाने काय झाले त्यांचे, असे प्रश्न येत असल्याची चाहूल जरी लागली तरी बेगमसाहिबा म्हणत, ‘जी.. जी सुनाई नही देती आपकी आवाज...’कदाचित अवघडच असावे हे सगळं, हे मलाही काही दिवसांतच पटले. जेव्हा एका दुपारी एक फोन आला. सायबर क्राईमच्या कार्यालयातून. तुम्ही लाहोरमध्ये कोणा मलिका-ए-गझलशी फोनवर बोलणार होतात, तसे पत्र आमच्याकडे आहे. झाली का ती मुलाखत? आणि त्याचे तपशील देऊ शकता का असे विचारणारा... काही प्रश्न फरिदाजींच्या कानापर्यंत का पोहचले नाहीत त्याचे उत्तर मला त्यावेळी मिळाले...आणि शोहरने गायला बंदी का केली असे विचारू म्हटले तर एकदम जाणवले, त्याच्या आधी त्यांना ‘मी टू’ नावाच्या जादूच्या छडीची ओळख करून द्यावी लागेल...(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
vratre@gmail.com
‘लोकमत दीपोत्सव २०१८’ या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकातफरिदा खानूम यांच्यावरचा लेख नक्की वाचा.