कोची मुझिरीस बिएन्नाले अल्पावधीत जागतिक कलाविश्वात आपला दबदबा निर्माण करणारे
हे अनोखे कला-प्रदर्शन २८ मार्चपर्यंत कोचीच्या भूमीवर चालू आहे. त्यानिमित्ताने..
डॉ. सुबोध केरकर
कलेला केवळ उदरभरणाचा व्यवसाय समजत नाही. माझ्या मते तो जगण्यासाठी अत्यावश्यक असलेला श्वास आहे. माझ्यातल्या कलासक्ताला गेली तीन दशके घडवणार्या सृजनाच्या ध्यासापासून मला विभक्त करणेच अशक्य आहे. सर्जन ही तशी खासगी कृती. असे असले तरी तिला चिकित्सेसाठी प्रेक्षकाची आवश्यकता भासतेच.
यामुळेच मी माझ्या वैयक्तिक कलात्मक साहसवादाच्या परिघाबाहेर जात गोव्यातील कलाक्षेत्रात वेगळे काही तरी करावे या कल्पनेला उराशी धरून ‘मोग’ अर्थात ‘म्युझियम ऑफ गोवा’ची निर्मिती केली. रसिक आणि कलावंत एकत्र आले, तर त्यातून चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, संगीत, नाट्य, डिझाईन, व्हिडीओ, आर्ट फिल्म, इन्स्टॉलेशन्स आणि अशाच अन्य कलाप्रकारांना एकमेकांशी संवाद साधता येईल, कल्पनांची प्रयोगशाळा उभी होईल ही धारणा त्यामागे होती.
कोची मुझिरीस बिएन्नाले २0१४ मध्ये गोव्याच्या कलाकारांना घेऊन वेगळे दालन सादर करण्यासाठीचे निमंत्रण मिळाले आणि आम्ही तिथे गेलो.
कोची मुझिरीस बिएन्नालेचे हे दुसरे वर्ष. केवळ चार वर्षांच्या अवधीत या द्वैवार्षिक प्रदर्शनाने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. जगभरातील क्युरेटर्स आणि कलेचे भोक्ते या प्रदर्शनाची दखल आवर्जून घेत येथे येतात. इथे सादरीकरण करणे म्हणजे एका परीने जगन्मान्यता मिळवणे.
कोची हे केरळमधले एक शहर. कोणे एकेकाळी येथे जवळच मुझिरीस नामक बंदर होते. रोम, अरेबियातली जहाजे येथे व्यापारासाठी येत. १३४१ साली या शहराला पुराने वेढा दिला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ बंदरातच साचला आणि बंदराचे अस्तित्व मिटले; पण त्याचबरोबर शेजारीच असलेल्या सखल, मोकळ्या जागेत समुद्राच्या पाण्याने शिरकाव केला आणि एक नवे बंदर अस्तित्वात आले. तेच हे कोची. इथे भरणार्या द्वैवार्षिक प्रदर्शनाला कोची आणि मुझिरीस या वर्तमानकालीन तसेच भूतकालीन बंदरांची नावे देण्याचे प्रयोजन एवढेच की कलादेखील पूर्वसुरींचा शोध घेत घेतच भविष्याचा वेध घेण्यासाठी धडपडत असते.
कलेच्या क्षेत्रात इटालीच्या व्हेनीस शहरात भरणारे द्वैवार्षिक कलाप्रदर्शन ख्यातकीर्त. दुसर्या महायुद्धादरम्यानची काही वर्षे वगळता हे जागतिक प्रदर्शन नियमितपणे भरते आहे. कलाकार आणि चिकित्सकांची तिथली वर्दळ बघता प्रदर्शनाला कलेची मक्का संबोधणे अधिक सयुक्तिक ठरेल. इथे ज्यांचे सादरीकरण झाले ते कलेच्या वैश्विक पटलावर कलाकार म्हणून स्थिरावले असे मानतात.
कोची आणि व्हेनीसमध्ये बरीच साम्यस्थळे आहेत. कालवे, जुनी कोठारे. कोचीच्या राजाचे नदीकाठी असलेले असेच एक कोठार भोवतालच्या ४-५ एकर जमिनीसह डीएफएल कंपनीने विकत घेतले. कोची मुझिरीस बिएन्नालेची संकल्पना वास्तवात येत असताना कंपनीने हे स्थळ प्रदर्शनासाठी देण्याची तयारी दर्शवली आणि प्रदर्शनाच्या प्रचंड व्यापास हक्काचे घर मिळाले.
प्रदर्शनाच्या यंदाच्या आवृत्तीचे क्युरेटर आहेत जितिश कल्लाट. ‘व्होर्ल्ड एक्सप्रेशन्स’ अर्थात ‘आवर्तातील अभिव्यक्ती’ या प्रदर्शनाच्या नावातच काल आणि अवकाशाच्या परिघावर अतित आणि भविष्याला आणि मृण्मय व स्वर्गियाला एकमेकांच्या सन्मुख आणण्याचे उद्दिष्ट सामावले आहे. जितिश कल्लाटनी एकंदर १00 कलाकृतींचे क्युरेटिंग या प्रदर्शनासाठी केले आहे. एकाहून एक सरस अशा कलाकृती. प्रतिभेची आणि सर्जकतेची परिसीमा दर्शवणार्या.
या प्रदर्शनाला चिकित्सकांबरोबर जनसामान्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याचा उल्लेख करायलाच हवा. शंभर रुपये तिकीट असलेल्या या प्रदर्शनात एक दिवस मोफत प्रवेश दिला जातो. अक्षरश: लाखोंच्या संख्येने रसिक येतात. याआधीच्या प्रदर्शनाला चार लाख रसिकांनी भेट दिली होती. सर्वसामान्यांनाही आकळतील अशी सादरीकरणे आणि कलाकृती. वेदांचा गहन अर्थ संतकवींनी जसा सहजसोपा करून सामान्यांपर्यंत पोहोचवला तशाच प्रकारे इथले कलाकार सृजनाचे गहनतत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. मग त्या कलाकारांना आजच्या युगाच्या दृक्-कलेचे संतकवी का म्हणू नये? तर, सर्वसाधारण रसिकांची पसंती हे कोची प्रदर्शनाचे सगळ्यांत मोठे यश.
इथे आहेत असंख्य कलाकृती.. हो रुई अँन या सिंगापूरच्या कलाकाराने सूर्य आणि घाम या संकल्पनेचा वापर करत वसाहतवादावर केलेले भाष्य तर स्तंभित व्हायला लावणारे.
नेहा चोकसी या मुंबईच्या कलावतीने सादर केलेला व्हिडीओ तर अफलातून म्हणावा लागेल. या व्हिडीओत ती स्वत: सर्वसंगपरित्याग केलेल्या अवस्थेत बर्फाच्या एका होडीत बसून होडी वल्हवताना दिसते. बर्फ वितळत जाते आणि ती अपरिहार्य अशा अंतिम सत्याच्या अधीन होते.
पॅलेस्टिनी कलाकार खलील राबाह याने तर खोल समुद्रात एका विमानवाहू जहाजावर चक्क स्ट्रॉबेरी आणि टोमॅटोची शेती दाखवत आपल्या देशाच्या भळभळत्या जखमेवर प्रचंड परिणामकारक ठरणारे भाष्य केले आहे.
जेनी आंतोनी हिने चक्क क्षितिजरेषेशी समांतर अशी दोरी किनार्यावर बांधलीय आणि त्या दोरीवरून ती चालत जातानाचे दृश्य चित्रांकित केलेय.
डेविड हॉरविट्झ याचे ‘दी डिस्टन्स ऑफ दी डे’ हे सादरीकरण असेच अफलातून. त्यात असलेल्या दोन सेलफोन्सवर एकाच वेळी सूर्योदय आणि सूर्यास्ताचे चलदृश्य दाखवले आहे. सूर्योदयाचे दृश्य हॉरविट्झने ज्या क्षणी मालदीवमध्ये राहून टिपलेय, नेमक्या त्याच क्षणी त्याच्या आईने अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरला सूर्यास्त टिपलाय.
अशा अनेकानेक कलाकृती.. काही अचंबित करणार्या, काही विमनस्क करणार्या, तर काही अंतरीचा क्षोभ वाढवणार्या. जगभरातील संवेदनशील कलावंतांची ही निर्मिती शब्दांतून पकडणे तसे अवघडच. त्यासाठी अनुभवायला हवे कोची मुझिरीस बिएन्नाले!
गोव्याची जनेलां
कोची आणि गोव्याचे नाते तसे जुने. कोकणी भाषा बोलणारा कोचीतला जनसमुदाय पंचवीस हजारांच्या घरांतला आहे. तसे केरळ आणि गोव्याच्या जीवनमानात, आणि इतिहासातदेखील बरेच साम्य आहे.
मी पाठवलेली ‘जनेलां - मायग्रेटिंग फॉर्म्स अँड मायग्रेटिंग गॉड्स’ ही संकल्पना याच साम्यस्थळांचा वेध घेणारी होती. ‘जनेल’ हा शब्द मूळचा पोतरुगीज. ‘जनेल’ म्हणजे उघडझाप करता येणारी खिडकी. जुन्या काळात केरळमध्ये अशा खिडक्या नसायच्या. गवाक्षांना केवळ जाळ्या लावायच्या. दारांची खिडकी आणली पोतरुगिजांनी. म्हणून ‘जनेल’ हे नाव मल्याळी भाषेतही रूढ झाले. आमच्या गोव्यातही खिडकीला जनेल म्हणतात.
- हेच सूत्र मी प्रदर्शनाच्या संयोजकांना पाठवले आणि त्यांनी त्याला मान्यता दिली.
(लेखक जागतिक स्तरावरील ख्यातकीर्त चित्रकार आणि इन्स्टॉलेशन आर्टिस्ट आहेत)
शब्दांकन : अनंत साळकर, सहायक संपादक, लोकमत, गोवा