शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘अजिंक्य डोंबिवलीकर’ होऊन रहाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 06:05 IST

रहाण्यांचा अजिंक्य डोंबिवलीचा, रोहित शर्माही मूळचा डोंबिवलीकरच! सच्चा डोंबिवलीकर चपळ, चिकाट, आक्रमक असतोच, म्हणजे त्याला असावेच लागते!

ठळक मुद्देवेगाने रेल्वे स्थानकात शिरणाऱ्या लोकलमध्ये अचूक उडी ठोकून विंडोसीट पकडतो तो सच्चा, कडवा डोंबिवलीकर. फलाट दिसेपर्यंत ‘छशिमट’हून पकडलेली सीट न सोडण्याची चिकाटी अंगी असते तोच डोंबिवलीकर.

- संदीप प्रधान

भरधाव वेगाने रेल्वे स्थानकात शिरणाऱ्या लोकलमध्ये अचूक उडी ठोकून विंडोसीट पकडतो तो सच्चा, कडवा डोंबिवलीकर. फलाट दिसेपर्यंत ‘छशिमट’हून पकडलेली सीट न सोडण्याची चिकाटी अंगी असते तोच डोंबिवलीकर. शेजारच्या सहप्रवाशाचा खांदा ही आपल्याला मिळालेली जहागिरी आहे, असे मानून प्रवासात त्यावर डोके ठेवून बिनघोर झोपून आपला निद्रा अनुशेष भरून काढतो, तोच आक्रमक डोंबिवलीकर!- त्यामुळे चपळता, चिकाटी, आक्रमकता हे डोंबिवलीकरांचे अंगभूत गुण असून, क्रिकेटच्या मैदानावर याच गुणांची प्रकर्षाने गरज असते. त्यामुळेच डोंबिवलीकर अजिंक्य रहाणे याच्या कप्तानीतील भारतीय क्रिकेट संघाने कांगारूंना त्यांच्याच मैदानात अक्षरश: गडबडा लोळविले. संघाचे उपकप्तान रोहित शर्मा हाही मूळचा डोंबिवलीकर, परंतु त्याने आपल्या आजी-आजोबांकडे बोरीवलीत वास्तव्य करणे पसंत केले. (डोंबिवली व बोरीवली ही शेजारीशेजारील शहरे असल्याने तेथे एकच पत्रकार नियुक्त करण्याचा निर्णय एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकांनी घेतला होता.)

डोंबिवली ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नररत्नांची खाण आहे. बरीच रत्ने डोंबिवलीत लहानाची मोठी झाली. मात्र, पैलू पडून ती जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात तळपू लागली, तेव्हा ती मुंबईच्या किंवा अन्य मोठ्या शहरांच्या कोंदणात जाऊन बसली. अर्थात, डोंबिवलीने कधीही त्याबद्दल कुरकुर केली नाही. नवनवीन रत्ने (पैलू न पडलेली) निर्माण करण्याचा घेतला वसा या शहराने टाकला नाही. अजिंक्यचे वडील बेस्ट उपक्रमात सेवेला तर आई गृहिणी. अजिंक्यच्या अंगी जन्मत: क्रिकेट नैपुण्य. डोंबिवलीतील एस.व्ही. जोशी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळताच शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये अजिंक्यची बॅट तळपू लागली. डोंबिवलीत क्रिकेटच्या क्षेत्रातील रत्ने हुडकून त्यांना संधी देणारे प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी अजिंक्यवर क्रिकेटचे प्राथमिक संस्कार केले. पुढे मुंबईत गेल्यावर विद्या पराडकर यांनी अजिंक्यला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याकरिता घडविला. नीलेश कुलकर्णी हाही मूळचा डोंबिवलीकर. भारतातर्फे क्रिकेट खेळल्यावर जसे नीलेशनी डोंबिवली सोडली तशीच अजिंक्यने. डोंबिवलीहून मुंबईत खेळायला जायचे, तर सकाळच्या वेळी एक तर खेळाडू लोकलमध्ये शिरू शकेल किंवा त्याचे क्रिकेट किट! दोघांना लोकलच्या डब्यात प्रवेशाची संधी मिळाली, तर आतील गर्दीत तो बिच्चारा असा घुसमटून जाईल की, जेव्हा तो मुंबईत सरावाकरिता पोहोचेल, तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका बाजूने संघ सावरून धरताना दमछाक होऊन तंबूत परतलेल्या फलंदाजासारखा थकला भागला भासेल. समजा, रस्ते मार्गे मुंबई गाठून क्रिकेटची आराधना सुरू ठेवायची ठरवली, तर प्रात:कालीन नेटप्रॅक्टिसच्या प्रहरी डोंबिवली सोडलेला खेळाडू लंच टाइमपर्यंत मैदानात दाखल झाला, तरी मिळविले. रस्तेमार्गे डोंबिवलीहून मुंबई गाठण्याकरिता हल्ली तीन ते साडेतीन तास सहज लागतात. सध्या आदित्य रावत, यश सिंग, श्रेयस गुरव, मनिष राव, स्वप्निल प्रधान वगैरे क्रिकेटमधील रत्नांना पैलू पाडण्याचे काम डोंबिवलीत सुरू आहे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते चमकताच डोंबिवली सोडतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.

ब्रिटिश आमदनीत रेल्वेचे पॉवर हाऊस ठाकुर्लीला उभे राहिले, तेव्हा बारा बंगला परिसरात गोऱ्या साहेबाचे वास्तव्य होते. त्यावेळी सुशिक्षित, पांढरपेशा समाजाची वस्ती असलेल्या डोंबिवली या खेडेगावात मुंबईतील लोक हवापालटाकरिता यायचे. (आता याच शहरात प्रदूषणामुळे हिरवा पाऊस कोसळतो) ब्रिटिशांनीच रेल्वे स्थानकालगत प्लॉट पाडून सुरुवातीला या गावाच्या नियोजनबद्ध आखणीचा श्रीगणेशा केला. एके काळी ख्यातनाम साहित्यिक विजय तेंडुलकर हे असेच तीनेक वर्षांकरिता काकुशेठ चाळीशेजारील गांधी बंगल्यातील दोन खोल्यांत राहिले होते. विंदा करंदीकर हे सरखोतांच्या चाळीत काही काळ रमले, नंतर ते दोघे मुंबईला गेले. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर हे मूळचे डोंबिवलीकर. मात्र, संपादकपदाची माळ गळ्यात पडताच त्यांनी डोंबिवली सोडली. डोंबिवलीत वास्तव्य करणाऱ्यात साहित्यिक, लेखकांमध्ये पु.भा. भावे, शं. ना. नवरे, वसुंधरा पटवर्धन, ना. ज. जाईल, प्रभाकर अत्रे, द. भा. धामणस्कर, मधुकर जोशी वगैरे अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘दादा’ (भाई नव्हे) लोक डोंबिवलीत राहतात, सकाळी निमूटपणे लोकल पकडून नोकरी, धंद्याला जातात व रात्री केवळ पाठ टेकण्याकरिता डोंबिवलीत येतात. लग्न होऊन डोंबिवलीत येणाऱ्या चवळीच्या शेंगेसारख्या सुना कालांतराने डोंबिवली ‘मानवल्याने’ (येथील पोळी-भाजी केंद्रात उकडीच्या मोदकापासून पुरणपोळ्यांपर्यंत सर्व विनासायास उपलब्ध होत असल्याने) ‘सुखासीन’ दिसतात, तसेच काहीसे या शहराचे झाले. ब्रिटिशांनी सुरुवातील केलेली शहराची नियोजनबद्ध आखणी विस्कटून अनेक बेकायदा बांधकामे झाल्याने डोंबिवलीची तीही ओळख झाली. अतिक्रमण करणाऱ्यांनी नागरी सुविधांचे भूखंड गिळल्याने मैदाने, बगिचे, क्रीडांगणे, सभागृहे, मंडया वगैरे सुविधा शेवटच्या पंक्तीतल्या पानात जिलेबीचे तुकडे पडतात, तशा अभावाने आढळतात. डोंबिवलीतील काही शैक्षणिक संस्थांनी मैदाने ही आपली खासगी मालमत्ता करून ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे कुलूपबंद केल्याने पुढच्या पिढीतील नीलेश कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यांना तर येथील मटर्निटी होममध्ये टॅहँऽऽऽ करण्यापूर्वी ‘हे डोंबिवली तर नाही ना?’ याची खातरजमा करायला लागेल. अर्थात, मैदाने, सुविधा कुठल्याही शहरात मिळाली, तरी वर म्हटल्याप्रमाणे चपळता, चिकाटी, आक्रमकता आणि सोशिकता वगैरे हे सारे डोंबिवलीकरांच्याच डीएनएमध्ये आहे हे विसरू नका!

(सच्चे डोंबिवलीकर असलेले लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत!)

sandip.pradhan@lokmat.com