मेघना ढोके
समाजवादी पक्षातली लढाई भडकलेली आणि उत्तर प्रदेश जीवघेण्या थंडीने गारठलेला! अलाहाबादच्या बोचऱ्या वाऱ्यात रिक्षा हाकणारे अनिल कुशवाह म्हणाले,‘जान पे बन आयी तो बाप ‘बाप’ नहीं रहता, और बेटा बेटा. नेताजी भी तो वहीं किये..’!! त्यांच्या घरात १२ मतं आहेत. जात कुशवाह. मागासवर्गीय. हातावर पोट. पण सायकल-हाथी-हाथ आणि कमल या साऱ्यांना नाकारत होते ते.
म्हणाले, ‘अब तो इकठो आदमी ही है,
जो कुछ कर के दिखाए..’
कुर्ला-टिळकनगरहून सुटल्यापासून बनारस सुपरफास्ट एक्स्प्रेस उशिरानं धावत होती. चांगली तासभर ‘लेट’. वाराणसीत उशिराच पोचणार हे उघड होतं..
त्यात उत्तर भारतात थंडीची लाट. घना कोहरा.. पण एकदम पहाटे गाडी बराच वेळ थांबली असं वाटलं म्हणून खिडकीतून डोकावलं तर बाहेर वाराणसी स्टेशन! डब्यातल्या साऱ्यांचीच पळापळ झाली. नियोजित वेळेपूर्वी साधारण ४५ मिनिटं आधी गाडी वाराणसी स्थानकात दाखल झाली होती. पहाटे तीनच्या ठोक्याला. ‘बिफोर टैम’ गाडी पोहचल्यानं झोप मोडलेला एक मूळचा यूपीवाला तरुण भलीमोठी बॅग गाडीतून उतरवत म्हणाला, ‘इ मोदी का राज ही डेंजर है, मोदी के चुनाव क्षेत्र में गडियांभी इकठो घंटा जल्दी पोहंच गयी, माना लेट हुवा तो क्या हो उस बेचारी का!’
गारठ्यानं हातापायांची लाकडं होत असतानाही तोंडाची गरम वाफ शब्दश: दवडत सारे खळखळून हसले खरे! पण त्याचक्षणी डोक्यात हे चमकून गेलं की, आपण फक्त वाराणसी नावाच्या धार्मिक स्थळी आलेलो नाही, त्याला हा नवा संदर्भही चिकटलेला आहे. पंतप्रधान मोदीजी का चुनाव क्षेत्र!
आणि मग हा संदर्भ वाराणसीतच नाही, तर उत्तर प्रदेशातल्या ज्या ज्या रस्त्याने प्रवास झाला, तिथे तिथे भेटलाच!
वाराणसी नावाचं गर्दीनं गच्च तुंबलेलं शहर. वारूळ फुटावं तशी माणसं रस्त्यानं चालतात. धक्काबुक्की होते, शाब्दिक चकमकी तर सर्रास. कचऱ्याचे ढीग. रस्त्यात ठाण मांडून बसलेल्या गायी आणि या साऱ्यातून वाट काढत फिरणाऱ्या सायकल रिक्सा, ई-रिक्सा आणि बाइक्सचे कोकलणारे हॉर्न. वातावरणात गर्मी एवढीच काय ती. बाकी घना कोहरा. माणसांच्या तुंबळ गर्दीतून वाट काढताना समोर दहा पावलांवरचंही काही दिसत नाही. डोक्यावर सूर्य उगवतच नाही आणि धुकं-धूर यांचा दाट पदर!
स्थानिक वर्तमानपत्रं सपामधल्या कुस्तीने रंगलेली. जीवघेण्या थंडीने काकडणाऱ्या माणसांना माध्यमांमध्ये जागा म्हणून दिसेना!
वाराणसी नगर निगमने १२७ चौक-चौराहे निश्चित केलेले आहेत, जिथं नगरपालिकेनंच लोकांसाठी शेकोट्या पेटवणं अपेक्षित आहे. थंडीत लोकांना ऊब मिळावी म्हणून शेकोट्या पेटवणं ही सरकारचीच जबाबदारी आहे. सरकारचं हे एक मूलभूत काम. ग्रामपंचायत ते महानगरपालिका सगळ्यांनी लोकांची सोय म्हणून सार्वजनिक शेकोटी पेटवणं हे उत्तर प्रदेशात सरकारी कामकाजाचं थंडीतलं एक रुटीन काम आहे, असं समजलं.
पण यंदा प्रचंड गारठ्यात वाराणसीसारख्या शहरात सरकारी शेकोट्या पेटल्या फक्त तीन! शेकोटीची सोय फारशी कुठं न झाल्यानं रात्रीच नाही, तर भर दुपारी १२ वाजताही लोक जमेल ते जाळून शेकोटी पेटवून हात शेकताना, उबेला बसलेले दिसत होते. या भागात शेकोटीला अलाव म्हणतात. दिवसभर हे अलाव धगधगत होते. पण अलावसाठीचं लाकूड सरपणही साऱ्यांकडे नव्हतं. मिळेल ते जाळून धग करण्याची धडपड! लेकरंबाळं, गायीगुरंही दिसेल त्या शेकोटीजवळ येऊन थांबत होते. थंडीनं माणसं रस्त्यांवर अशी गारठलेली असताना नगरपालिका ‘अलाव’ पेटवत नाही, हा स्थानिकांच्या चिंतेचा, रागाचा विषय होता. मात्र माध्यमांत या गारठलेल्या प्रश्नाची चर्चा कुठं दिसली नाही.
समाजवादी पक्षांतर्गत सुरू झालेल्या सत्तासंघर्षाची धगधगती शेकोटी तेवढी माध्यमांत भडभडून पेटलेली होती. आम जनतेला थंडीत ऊब मिळत नाही, साधी शेकोटी दारात पेटवण्याची ऐपत नाही आणि सरकार सार्वजनिक शेकोटी पेटवेल या आशेवर काकडत गारठावं लागतं याचं कुणाला काहीही वाटलेलं दिसत नव्हतं.
वाराणसीत रात्री ९ च्या सुमारात रथयात्रा चौराहावर एक भलंमोठं लाकूड अलाव होऊन जळत होतं. शेकडो माणसांची गर्दी. कुणाला कणभर, कुणाला बोटभर ऊब मिळाली असेल नसेल. सोबत असलेल्या ड्रायव्हरला- इंद्रजितला विचारलं तर तो म्हणाला, ‘कंबल तो रईस लोग बांट देते है, पर इस जाडे का कोई इलाज है यहॉँ? आम है लोगोंका ठिठुरना..’
प्रत्येक थंडीत हे नेहमीचंच. गारठणं, मरणं, ऊब न मिळणं.. सारंच.
ठिठुरलेली अशी माणसं लखनौपर्यंतच्या प्रवासात वारंवार भेटली.
अलाहाबादला पोहचत नाही तो टीव्हीवर नेताजी मुलायमसिंगजी दिसले. मुलाला पक्षातून काढून टाकल्याचं सांगत होते.
अलाहाबादच्या त्या रात्री चौकाचौकात नेताजींनी जे केलं त्याचे चर्चे होते. दुकानांसमोर अलाव गप्पा रंगल्या होत्या.
ई-रिक्सेचे चालक अनिल कुशवाहना सहज विचारलं, ‘नेताजीने जो किया, ठिक लगा?..’ ते म्हणाले, ‘जान पे बन आयी तो बाप ‘बाप’ नहीं रहता, और बेटा बेटा. नेताजी भी तो वहीं किये..’
चाचाजी गप्पीष्ट होते. गारठलेल्या बोचऱ्या वाऱ्यात रिक्सा हाकत बोलत राहिले. अमिताभ बच्चन राहायचा ते एकेकाळचं भाड्याचं सिव्हिल कॉलनीतलं घर त्यांनी दाखवलं. म्हणाले, बघा, इथं साध्या भाड्याच्या घरात राहत होते बच्चन. काय नशीब काढलं. मग गप्पा येत्या निवडणुकीकडे वळल्याच..
ते एकदम म्हणाले, ‘अखिलेश विकास का प्रयास तो बहौत किये, बेहतर किये.. पर अब उसकी ना चलेगी.. अब तो इकठो आदमी ही है, जो कुछ कर के दिखाए..’
कौन?
और कौन? - मोदीजी.
१२ मतं आहेत त्यांच्या घरात. आणि जात कुशवाह. स्थानिक संदर्भात मागासवर्गीय. व्यवसाय रिक्षा चालवण्याचा. हातावर पोट. पण सायकल-हाथी-हाथ आणि कमल या साऱ्यांना नाकारत होते ते. त्यांना वाटत होतं की, कमाल तो वो इकठो आदमीही कर सकता है..
मागासवर्गीयांची मतं सपा-बसपा किंवा कॉँग्रेसला जातील हा समज ते खोटा ठरवत होते. अर्थात, कमळाच्या पक्ष विचारसरणीशीही त्यांना काही घेणंदेणं नव्हतं. ते सांगत होते, हम और हमरे जैसे लोग क्या चाहते? डेव्होलोपमेण्ट होना!! उ चाहे कोई भी करें, हम को क्या?’
हॉटेलातला रिसेप्शनवरचा ज्युनिअर इंजिनिअर मुलगा, काम मिळेस्तोवर पार्टटाइम जॉब करणारा, हॉटेलातला वेटर, चौराह्यावर भेटलेल्या आयाबाया.. या साऱ्यांशी बोलताना जाणवत राहिलं की, इथं माणसांना आस आहे ती फक्त विकास या एका गोष्टीची. बाकी जातीपातीची नेहमीची ठोक गणितं लोक बाजूला ठेवायला तयार दिसत होते. म्हणजे निदान गप्पांमध्ये तरी!
‘सायकल-हाथी-हाथ-कमल का नहीं दीदी, ये हमरा चुनाव है, हम विकास को चुने या गुंडाराज को, ये एकबारही तो डिसाइड करना है ना?’ - चहा टपरीवाला वीस वर्षाचा अभिसेक सांगत होता. अलाहाबादच्या आनंद भवनसमोर चहाची टपरी आहे त्याची.
बोलता बोलता तो एकदम म्हणाला, ‘करिअर तो नहीं है ना, ये चाय बनाना! पर जिंदगी उभरी नहीं हमरी तो का करे? हां, बोलने की आझादी ना सहीं, ना बोलने की तो है ना..’
लोकांना वाटतंय की निदान अखिलेशनं विकासासाठी प्रयत्न केले. गुंडाराज कमी करण्याची इच्छा दाखवली. जमलं नसेल त्याला, पण प्रयास तो किए.. असं म्हणणारे अनेकजण भेटले.
३१ डिसेंबरच्या संध्याकाळी मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं तेव्हा सारं अलाहाबाद नुक्कड टीव्हीवर, टीव्हीच्या दुकानांसमोर गर्दी करून ते भाषण क्रिकेट मॅच पाहतात तसं पाहत होतं. अवतीभोवती तरुण गर्दी. एक पोरगा दुसऱ्याला म्हणत होता, ‘वैसे तो कुछ भी नहीं दिया प्रधानमंत्रीने, लेकिन प्रयास तो कर रहे है, उस प्रयास का वेलकम करो भय्या..’
‘प्रयास’ हा फार सुंदर शब्द भेटला या प्रवासात. बनारस, मुगलसराय, प्रतापगंज, फैजाबाद, अयोध्या, चित्रकुट, सुलतानपूर, लखनौ असा प्रवास करत फिरताना प्रत्येकाच्या आयुष्यात हा शब्द दिसला.
बाकी सगळं चित्र निराश करणारं. लोकसंख्येची घनता जास्त. ना रोजगार फार, ना उद्योग. यंदा तर नोटबंदी आणि थंडी यांनी टुरिस्ट सिझन डुबवला. भकास-बकाल गावंं. घाणीचे डोंगर. रस्ते ना के बराबर. आणि या साऱ्या खदखदीला पोटात सामावत फिरणारी गंगामय्या, तिच्या खळाळाला भेटणाऱ्या यमुना-सरयू.
अयोध्येत पांडे नावाचे एक गाइड गृहस्थ भेटले. उच्च जात असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यात सतत होता.
आमची जात कोणती हे ते शोधत असावेत. पण मग बोलता बोलता एकदम म्हणाले, ‘सच कहूं, जात देखकर बिकास तो नहीं होता, अबहू सोचे है की, जो बोले की फॅक्टरी लगवाऐंगे, इंग्लिस स्कूल चलाऐंगे उसी का करें चुनाव, इ जातिधर्म की राजनीती ने क्या दिया आजतक?’
सवालही तेच करत होते, जबाबही तेच देत होते! फरक एवढाच की बोलण्याची भाषा बदलली होती. विचाराच्या पायातले जुने उच्च-नीच जातवाले दोर अजून पुरते सुटलेले दिसत नव्हते.
जबाब शोधण्याचे हे प्रयास आता देशाच्या उत्तर भागात सुरू झालेले मात्र दिसले. आणि ती उत्तरं राजनीतीत नाही तर शिक्षणात आहेत याची जाणीवही रुजत असावी बहुतेक!
बीए-बीएड झालेला ड्रायव्हर इंद्रजित कुमार. शिक्षकाची नोकरी मिळाली नाही म्हणून मग ड्रायव्हरी करून पोट भरतो म्हणाला. मूळचा बनियाचा, बनारसमध्ये राहत होता. तो म्हणाला, ‘हम पढके क्या कमाए, आप को लगता है? हम कमाए ताकद, अब हम किसी को भी मूंह पे कह सकते है की, तू होगा साब तुम्हारे घर का, आज तुम साब होगे, कल हम होंगे..’
लखनौच्या वाटेवर मोठ्ठा ट्रॅफिक जाम लागला. मोदींची परिवर्तन रॅली नेमकी त्याच दिवशी होती. हजारो वाहनं रस्त्यांवर.
झेंडे घेतलेल्या गाड्यांना टोल माफ होता त्यादिवशी. बाकी वाहनं टोलच्या रांगेत. ट्रॅफिक जाम. खच्च गर्दी.
इंद्रजित म्हणाला, ‘इ लोग कैसा परिवर्तन लाएंगे? जब ये टोल ही ना भरे अब, ऐसे खुद ही कानून न माननेवाले कैसे शासन चलाएंगे..’
त्याला हसत विचारलं, मग आता पर्याय काय?
तर तो म्हणाला, ‘एजुकेसन. हमारे लोग सिखेंगे तब ही तो सवाल करेंगे..’
सवाल करणाऱ्यांची आणि प्रयास करणाऱ्यांची आस अशी जागोजागी दिसली.
समाजवादी पिता-पुत्राच्या सायकल लढाईत आणि मोदींच्या विकासपुरुष प्रतिमेंतर्गत आखलेल्या परिवर्तन रॅलीतल्या चर्चेत जे दिसलं, समजलं नाही ते यूपीतल्या सामान्य माणसांनी सांगितलं..
बिकास, प्रयास आणि एजुकेसन! - हे सूत्र!!
माणसं वेगळं बोलू लागली आहेत हे नक्की!
मतदानाच्या दिवशी जे होईल त्याच्याशी या वेगळेपणाचं नातं असेल का?...
उत्तर प्रदेश समजून घेणं एवढं सोपं होतंच कधी म्हणा!!
(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)