लग्न झाल्यावर तारुण्यातली बेफिकिरी मागे टाकून तरुण जोडपी स्थैर्याचा विचार सुरू करतात. स्वत:चं घर, नोकरीतली प्रगती, हाताशी चार पैसे साठतील अशी व्यवस्था या प्राथमिकता कमी-अधिक फरकाने जगात सर्वत्रच असतात. या जागतिक नियमाला पार धुडकावून एक रोमैण्टिक स्वप्नवत आयुष्य जगणारं अँन आणि माईक हॉवर्ड हे अमेरिकन जोडपं सध्या ऑनलाईन जगात फार फेमस झालं आहे.
का? - तर लग्न होताच नोकर्या सोडून, घर चक्क विकून, साठलेला पै-पैसा खिशात घेऊन अँन आणि माईक २0१२ साली हनिमूनला निघाले, ते अजूनही घरी परतलेले नाहीत. (हा लेख लिहित असतानाच्या ताज्या हिशेबाप्रमाणे) तब्बल 675 दिवस झाले तरी या जोडप्याचा हनिमून संपलेला नाही. एकामागून एक देश ओलांडत, अनेक समुद्र, असंख्य नद्या, हजारो गावं मागे टाकत त्यांची मधुचंद्राची जागतिक सफर सुरु आहे.
माईक आणि अन दोघंही अमेरिकन. माईक आहे पेनिसल्व्हानियाचा तर अन हॉलिवूडची. 2006 मध्ये कामानिमित्त त्यांची भेट झाली. मनं जुळली. प्रेम जुळलं आणि 2011 मध्ये लग्नही झालं. दोघांचीही शारिरीक क्षमता उत्तम आहे, आर्थिक रिस्क घेणं परवडू शकणार आहे आणि मुलाबाळांसह सांसारिक जबाबदारी अजून गळ्यात पडलेली नाही तोवर जग बघून घेऊ असा विचार माईक आणि अन हॉवर्ड यांनी केला आणि ही दुक्कल निघाली एका अविस्मरणीय ऐतिहासिक हनिमूनला.
जगातली हनिमून डेस्टिनेशन्स म्हणून प्रसिद्ध असलेली सगळी ठिकाणं पालथी घालायचा त्यांचा बेत आहे. आतापर्यंत त्यांनी सहा खंडांमधील 52 देशांतील 302 हून अधिक ठिकाणांना भेट दिलीय. सध्या ते अमेरिकेतल्या वरमाउँट येथे आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा एवढा लांबलचक प्रवास करायला या तरुण जोडप्याकडे पैसे कुठून आले? इतक्या देशात अखंड भटकताना त्यांना कायकाय सापडलं? आणि ते दोघे..? एकमेकांना सापडले का?
- त्याबद्दल पुढच्या रविवारी.
स्वस्तातला ‘मस्त’ हनिमून
अख्ख्या जगभर फिरून हनिमून साजरा करणार्या या दोघांपैकी प्रत्येकाला दिवसाला
37 डॉलर्स (सरासरी) एवढा खर्च येतो.
त्यात विमानप्रवास, खाणंपिणं, राहणं, व्हिसा आणि इतर खर्चांचा समावेश आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, नॉॅर्वेसारख्या महागड्या देशात दर दिवशी दर माणशी
75 डॉलर्स लागतात.
कंबोडिया, बोलिविआ सारख्या देशात
20 डॉलर्स पेक्षाही कमी खर्च येतो.
तुमच्या प्रवासाची गोष्ट
कधी नियोजन करून, कधी मनात येईल त्या क्षणी सरळ बाहेर पडून, कधी पै-पै वाचवण्याचे मार्ग शोधत, कधी पंचतारांकित चैन विकत घेऊन भटकण्याची हौस असेल तुम्हालाही, तर
देश-विदेशातल्या तुमच्या भटकंतीचे अनुभव छायाचित्रांसह जरूर पाठवा. निवडक लेखनाला प्रसिध्दी