ऑनलाइन लोकमत
इसापूर (गोंदिया), दि. 08 - अर्जुनी मोरगाव तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचा प्रत्यय आणखी एकदा सोमवारी (दि.८) आला. पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी इसापूरच्या शाळेला भेट दिली असता प्रभारी मुख्याध्यापक विना अर्ज गैरहजर आढळले. एवढेच नाही तर ते माहुरकुडा ते सिरोली रस्त्यावर ‘झिंगाट’ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना अखेर उचलून त्यांच्या घरी नेण्यात आले.सभापती शिवणकर यांनी २ जुलैनी भरनोली, राजोली येथे भेट दिली असता तेथील शाळा बंद असल्याचे निदर्शनास आले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता शिवणकर यांनी त्याच पद्धतीने इसापूर येथील जि.प. प्राथमिक शाळेला भेट दिली. मात्र प्रभारी मुख्याध्यापक आर.जी. फुलबांधे गैरहजर आढळले. त्यांचा शोध घेतला असता माहुरकुडा ते सिरोली रस्त्यावर ते झिंगत असल्याचे आढळले. त्यामुळे सभापती महोदय तेथे पोहोचण्याआधी काही लोकांनी त्या शिक्षकाला उचलून घरी नेले. सदर शिक्षकाच्या बाबतीत हा नेहमीचाच प्रकार असल्याने येथील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. सन १९८४ साली स्थापन झालेल्या या शाळेची दैनावस्था पाहून गतवर्षी काही सूज्ञ पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेतून काढले. शालेय व्यवस्थापन समितीचेही याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या सत्रात पंचायत समितीअंतर्गत व्यसनी शिक्षकांच्या यादीत या शिक्षकाचे नाव होते. त्यांना समुपदेशनासाठी पाठविणार होते, पण त्याचे काय झाले ते अजूनही कळले नाही. त्यांची बदली करुन दुसरा शिक्षक देण्याची मागणी शाळा समितीचे उपाध्यक्ष रमेश चांदेवार यांनी पं.स.सभापती यांना केली.
(वार्ताहर)