पुणे : वडकी गावच्या युवा सेना विभागप्रमुखाचा खून १० लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आतापर्यंत १० आरोपींना गजाआड केले आहे. फरार असलेल्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिली.हेमंत प्रकाश गायकवाड (३२, रा. वडकी, ता. हवेली) असे खून झालेल्या युवासेना विभागप्रमुखाचे नाव आहे. गायकवाड यांचा ९ सप्टेंबर रोजी दुपारी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात अनिल गायकवाड (३३), उत्तम गायकवाड (४५), सागर गायकवाड (२५), दशरथ गायकवाड (४८), सागर मोडक (१९), अमोल मोडक (२२), मंगेश मोडक (२५), किरण उर्फ दादा झेंडे (२१), सुदाम गायकवाड (४१) आणि गणेश गायकवाड (३२) यांना अटक करण्यात आली आहे. तुषार हंबीर आणि किरण पवार हे फरार आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि पिस्तुले असा ११ लाख ५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये गायकवाड यांनी जामीन मिळू दिला नव्हता. त्याचा राग मनामध्ये धरून त्यांच्या खुनाची सुपारी देण्यात आली. त्यांच्यावर पाळत ठेवून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. गायकवाड यांच्यावर झेंडे, मंगेश, हंबीर आणि पवार यांनी गोळ्या झाडल्या होत्या.
दहा लाखांची सुपारी देऊन युवा सेनाध्यक्षाचा खून
By admin | Updated: September 19, 2015 02:44 IST