यवतमाळ : येथील केसरिया भवनस्थित जैन मंदिर हे जगत मंदिर असून ते सर्वधर्म समभावाचे प्रतीक होईल. या मंदिरात राष्ट्राच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी रोज पूजा होईल. जैन महामंत्र हा समभावाचा संदेश देतो, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. केसरिया भवनातील जैन मंदिरात प्रभू सुमतीनाथ आणि श्री आदिनाथ प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बुधवारी पंडित पूज्य अध्यात्मयोगी आचार्य भगवंत श्रीमद् विजयपूर्णचंद्रसुरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते झाली. खा. दर्डा म्हणाले, मांस निर्यातीविरोधात आपल्यासह सहकारी खासदारांनी आवाज उठविला आहे. मुक्या जनावरांची हत्या व्हायला नको. आपल्या देशातील पशुधन विदेशात जात आहे. भ्रृण हत्येकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पोहरादेवी येथे बोकडांंचा बळी प्रथा थांबावी यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना आचार्यदेव श्रीमद् विजय पूर्णचंद्रसुरीश्वरजी महाराज यांनी पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांना केली. या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आचार्य विजय कलापूर्णचंद्रसुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने सुमतीनाथ व आदिनाथ प्रभूंच्या मूर्तीचे जिनालय तयार करण्यात आले आहे. अंजनशलाका-प्रतिष्ठा महोत्सवात आचार्यांसह सात साधू आणि ३१ साध्वी तप आणि आराधना करत आहेत. (प्रतिनिधी)
यवतमाळचे जैन मंदिर सर्वधर्म समभावाचे प्रतीक होईल
By admin | Updated: February 12, 2015 03:22 IST