यवतमाळ : यवतमाळातील खेळाडूंसाठी सुसज्ज असे कुठेही मैदान नाही. असलेल्या मैदानांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. येथील खेळाडूंसाठी शासनाने ई वर्गाची जमीन उपलब्ध करून दिल्यास भव्य स्टेडियम साकारणार, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळ पब्लिक स्कूलच्यावतीने आयोजित येथील पोस्टल मैदानावर रविवारी ‘यवतमाळ प्रिमीअर लिग-२०१४’च्या (वायपीएल-२०१४) उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून खा. विजय दर्डा बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. भावना गवळी, वायपीएस शाळा समितीचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे मुख्य संयोजक किशोर दर्डा, वायपीएसचे प्राचार्य डॉ. जेकब दास, स्पर्धेचे मुख्य समन्वयक यश बोरुंदिया उपस्थित होते. खा. दर्डा म्हणाले, कोणते राष्ट्र किती महान आहे हे सिद्ध करण्यासाठी खेळ हे महत्वपूर्ण माध्यम आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशातील खेळाडू पदक जिंकून देशाचे नाव मोठे करीत असतात. परंतु दुर्दैवाने देशात खेळाच्या प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाही. तालुक्यात मैदानांची कमतरता आहे. शासनाच्या क्रीडा निधीतून योग्य सुविधा निर्माण केल्या जात नाही. क्रीडा क्षेत्रातील ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या बजेटमध्ये विशेष आर्थिक तरतूद असावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खा. गवळी यांनी सांगितले. किशोर दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धा आयोजनामागची भूमिका विशद केली. (प्रतिनिधी)
यवतमाळात भव्य स्टेडियम साकारणार
By admin | Updated: November 10, 2014 04:10 IST