ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ४ : तुमचा दवाखाना चालत नाही. घरातील व्यक्ती सतत आजाराने बेजार असतात. घरात सुख, शांती नाही. त्यासाठी पूजा करावी लागेल, अशा भूलथापा देऊन अपार्टमेंटमधीलच महिलेसह तिच्या सहकाऱ्यांनी शेजारी कुटुंबाची रोख ७८ हजार आणि १२0 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन फसगत केली.कौलखेडमधील एका वृद्धेचा मुलगा डॉक्टर आहे. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एक महिला राहते. तिने तुमच्या घरात नेहमीच आजार सुरू असतात. मुलाचा दवाखाना चालत नाही. घरात सुख, शांती नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या आत्म्याचा वास आहे, असे सांगितले.
वृद्धेच्या कुटुंबीयांनी तिच्या बोलण्याला सहमती दर्शविली आणि यावर काय उपाययोजना असे विचारले असता महिला व तिच्या सहकाऱ्यांनी त्यांना घरामध्ये काही पूजाविधी करावे लागतील. त्यासाठी खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या घरात विविध प्रकारच्या पूजाविधी केल्या आणि ७८ हजार रुपये उकळले. त्यानंतर महिलेचे त्यांना भूलथापा देणे सुरूच होते. एक मोठी पूजा केल्याशिवाय घरामध्ये सुख, शांती येणार नाही, दवाखाना चालणार नाही, असे सांगितल्यावर पुन्हा घरात एक मोठी पूजा ठेवली.
महिला व तिच्या सहकाऱ्यांनी तुम्ही घरात सोने एकत्र एका कापडामध्ये गुंडाळा. त्याची १६ दिवस पूजा करायची आहे. १६ दिवस पूर्ण झाल्याशिवाय ते कापड उघडायचे नाही. असे सांगितल्यावर हे कुटुंब तयार झाले. पुन्हा मोठी पूजा केली. महिलेने पूजा केलेले सोने एका कपाटात ठेवल्याचे नाटक केले. शिताफीने सोने काढून घेत, त्या ठिकाणी त्यांच्याकडील काही वस्तू कापडामध्ये गुंडाळून ठेवून दिल्या आणि १६ दिवस कपाट उघडायचे नाही, अशी ताकीद दिली; परंतु काही दिवसांनंतर या कुटुंबाला सोने पाहण्याची इच्छा झाली. त्यांनी कपाट उघडून कापडात गुंडाळलेले सोने पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यात सोने नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महिलेला जाब विचारला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.