मुंबई - गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, गणपती प्रतिमेचा एक ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. भारतात आतापर्यंत सापडलेल्या गणेश प्रतिमांमध्ये सर्वात जुनी प्रतिमा ही मुंबईतील पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांच्या संग्रहातील एका प्राचीन नाण्यावर आहे. तज्ज्ञांच्या मते, हे नाणे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील असून, नाण्यावरील प्रतिमा ही आतापर्यंत माहिती असलेल्या सर्व प्रतिमांमध्ये सर्वांत प्राचीन ठरते. डॉ. कोठारी यांनी दुर्मीळ वस्तू गोळा करण्याचा छंद अनेक वर्षांपासून जोपासला आहे.
कुठे मिळाले नाणे? : २० वर्षांपूर्वी चोरबाजारात फेरफटका मारताना डॉ. कोठारी यांच्या नजरेस अनोखे नाणे पडले. त्यावर एका बाजूस नंदी व ब्राम्ही लिपीत ‘जागेश्वर’ असा उल्लेख असलेला, तर दुसऱ्या बाजूला एका हातात लाडू आणि मागे प्रभावळ असलेली दोन हातांची गणेश प्रतिमा त्यांना दिसली. हे नाणे २.९८ ग्रॅम वजनाचे असून, त्यावर टेराकोटा प्रकारचा मुलामा आहे.
सहाव्या शतकातील गणेश प्रतिमा चीन, अफगाणिस्तानात होत्या. १,७०० ते २,००० वर्षांपूर्वीची प्रतिमा भारतात आहे. माझ्याकडे २५० प्रकारच्या दुर्मीळ प्रतिमा, शिल्प आहेत.- प्रकाश कोठारी, सेक्सओलॉजिस्ट
तज्ज्ञांकडून शिक्कामोर्तबडॉ. कोठारी यांनी हे नाणे प्रथम पुणे येथील डेक्कन कॉलेजचे इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञ प्रा. एम. के. ढवळीकर यांना दाखवले.त्यांनी या नाण्याचे ऐतिहासिक मूल्य अधोरेखित करत पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे विभागाचे संचालक टी. एस. रविशंकर यांना ते दाखविले. रविशंकर यांच्या मते, संबंधित हे नाणे पहिल्या किंवा चौथ्या शतकातील असण्याची शक्यता आहे. तसेच डॉ. कोठारी यांनी हे नाणे धारवाड विद्यापीठाचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास रीट्टी यांनासुद्धा दाखविले. रीट्टी यांनी ही प्रतिमा पहिल्या ते दुसऱ्या शतकातील असल्याचे सांगितले आहे.