ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - सध्या देशातील परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी 'असहिष्णुता' हा शब्द अपुरा असल्याची टीका लेखिका अरुंधती रॉय यांनी केली. शनिवारी पुण्यातील महात्मा फुले समता पुरस्कारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी रॉय यांच्या भाषणाला जोरदार विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.
सध्या लोकांना ज्याप्रकारे मारले जात आहे, जाळले जात आहे, या घटना पाहता देशातील परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याचे रॉय म्हणाले. दलित, मागासवर्गीय,आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन यांना दहशतीखाली जगण्यास भाग पाडलं जात आहे, दडपशाही होत आहे, असे सांगत त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणावर ताशेरे ओढले.