जांभळी येथील घटना : १५ दिवसांपासून परिसरात धुमाकूळसाकोली (जि.भंडारा) : मागील १५ दिवसांपासून खांबा (जांभळी) परिसरात बिबट्याची दहशत असून आतापर्यंत या बिबट्याने १५ ते २० शेळ्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे येथे गेल्या पाच दिवसांपासून वन कर्मचाऱ्यांचा पहारा आहे. मात्र शनिवारी पहाटे या बिबट्याने घराच्या पडवीत झोपून असलेल्या एका वृद्ध महिलेच्या नरडीचा घोट घेऊन तिला ठार केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. केमाई ऊर्फ मळाबाई किसन बावणे (७०) रा.जांभळी खांबा असे मृत महिलेचे नाव आहे. नेहमीप्रमाणे मळाबाई रात्री जेवण करुन नेहमीच्या ठिकाणी म्हणजे घराच्या बाजूला असलेल्या पडवीत झोपली. ज्या ठिकाणी ती झोपली होती, तेथे दार नाही.रात्रीच्या सुमारास पडवीत आलेल्या बिबट्याने मळाबाईच्या नरडीला पकडून फरफटत ऊसाच्या शेतात नेले. तिथे तिच्या पायाच्या वरचा काही भाग फस्त केला. मूळची पिंडकेपार येथील रहिवासी असलेली मळाबाई मागील २० वर्षापासून जांभळी येथे भावाचा मुलगा (भाचा) मोतीराम कोसरे यांच्या घरी राहत होती. मोतीराम यांच्या पत्नी पहाटे उठल्यानंतर त्यांनी मळाबाईच्या खाटेकडे पाहिले असता मळाबाई खाटेवर दिसली नाही. तिने आरडाओरड केली. गावकरी गोळा झाले. शोधाशोध सुरु असतानाच ऊसाच्या शेतात मळाबाईचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती वनविभाग व पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, उपवनसंरक्षक विनय ठाकरे, मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक अशोक खुणे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृत मळाबाईच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली. याशिवाय ज्यांच्या शेळ्या बिबट्याने ठार केल्या त्यांना तीन हजार रुपयांची मदत देण्यात आली. (प्रतिनिधी)
बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
By admin | Updated: November 2, 2014 00:57 IST