डोंबिवली : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील आकर्षण म्हणजे महिलांचे लेझीम पथक. सध्या या पथकाचा कसून सराव सुरू आहे. या वर्षीच्या पथकात ४२ महिला आहेत. विशेष म्हणजे त्यातील २८ महिलांचे झांज पथक विवेक ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात आले आहे. झांज वाजवत नाचताना या महिला मानवी मनोरे तसेच वेगवेगळे आकार तसेच काही चिन्हेही साकारणार आहेत. याला बाप्पाच्या आणि विठुरायाच्या गजराची साथ राहणार आहे. ताम्हणकर यांनी १४ महिलांचे ढाल आणि तलवार पथकही बसवले आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, ढाल व तलवार पथक छाऊ नृत्याच्या प्रकारावर आधारित आहे. पूर्वी सैनिक स्वत:च्या मनोरंजनासाठी हातात शस्त्र घेऊन नृत्य करत असत. साधारणपणे सैनिकांच्या छावण्यांमध्ये अशा प्रकारची नृत्ये नेहमीच होत असत. त्यामुळे पूर्वी या नृत्याला छावणी नृत्य असे संबोधले जात असे. पण, पुढे त्याचा अपभ्रंश होऊन त्याला छाऊ नृत्य असे संबोधायला लागले. छाऊ नृत्य हा मार्शल आर्ट्सचा उपयोग करून केलेला नृत्य प्रकार आहे. या नृत्याचे पुरु लिया,सरईकेला व मयूरभंज असे तीन प्रकार साधारण प्रचलित आहेत. छाऊ नृत्यात साधारणपणे मुखवटे वापरले जातात, परंतु मयूरभंज छाऊ नृत्यप्रकारात मुखवटे घातले जात नाहीत आणि म्हणूनच त्याचा आधार घेत ओडिशातल्या मयूरभंजच्या छाऊ नृत्याच्या जवळ जाणारा नावीन्यपूर्ण नृत्यप्रकार यावर्षी बसवण्यात आला आहे. हर्षा दातार, सायली पोळ, प्रियंका भिडे, कल्याणी साळी, स्नेहा नाईक आणि उज्ज्वला वैद्य आपली नोकरी सांभाळून तर आसावरी भावे, माधवी लोकरे आपला लघुउद्योग सांभाळत तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आपला अभ्यास आणि छंद जोपासत नियमितपणे सरावाला येत आहेत. ताम्हणकरांच्या मार्गदर्शनाखाली या एकूण ५६ जणींच्या पथकाचा कसून सराव मंडळातर्फे सिद्धी वैद्य व सोनाली गुजराथी रोज समाजमंदिर हॉल आणि टिळकनगर शाळेच्या प्रांगणात करून घेत आहेत. त्यांना ताशाची साथ युवराज ताम्हणकर आणि प्रथमेश जोगळेकर करणार आहेत, तर ढोलाची साथ विराज साने आणि सोहम वैद्य करणार आहेत. अध्यक्ष नंदन दातार यांनी डोंबिवलीकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)>यंदा झेंडा पथकयंदा ८ ते १३ वर्षे वयोगटांतल्या १४ मुलामुलींचे झेंडा पथकही असेल. काही आकार आणि मानवी मनोरे ही मुले साकारणार आहेत. या पथकात ५८ वर्षांच्या देसाई काकूंपासून ते आठ वर्षांच्या स्पंदन कुलकर्णी आणि शाल्मली जोग यांचा समावेश आहे. खास आकर्षण म्हणजे या पथकात ११ आई आणि मुलगा किंवा मुलगी अशा जोड्याही आहेत. दोन बहिणींच्या, नणंद-भावजय आणि जावाजावांची एक जोडी आहे.
विसर्जनाला लेझीम, झांजेचा साज
By admin | Updated: September 5, 2016 03:23 IST