नागपूर : एरवी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी यांची गर्दी दिसून येते. कोणाला मंत्र्यांना भेटायचे असते, तर कुणाला आमदारांच्या माध्यमातून समस्या मांडायच्या असतात. तर कुणी नुसतेच फोटोसेशन करण्यासाठी येतात. परंतु यंदा मात्र गर्दीची ही परंपरा खंडित झाली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश दिल्यामुळे कामकाजाशी संबंध नसलेल्या बाहेरील व्यक्तींना दुपारी २ पर्यंत प्रवेश नाकारण्यात आला.हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून येणाऱ्या लोकांमुळे अनेकदा परिसरात गर्दी होते व यामुळे कामकाजात अडथळा येतो. विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी वाढल्यामुळे प्रशासन आणि यंत्रणेवर ताण येतो. यामुळे कामकाजावर दुष्परिणाम होतो. शिवाय वाहतुकीचा खोळंबा होतो. ही बाब लक्षात घेऊन अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश रामराजे नाईक-निंबाळकर व हरिभाऊ बागडे यांनी दिले आहेत.हिवाळी अधिवेशनातील निवास, संरक्षण, स्वच्छता याचा आढावा घेण्यासाठी विधानमंडळामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, नागपूर विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. यावेळी कामकाजाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना दुपारी दोननंतर केवळ दोन तासांसाठीच प्रवेश देण्यात यावा. तसेच केवळ पालकमंत्री व मंत्र्यांच्या शिफारशीवरूनच दिवसभराचा पास देण्यात येईल, अशा सूचना त्यांनी केल्या. यामुळे सोमवारी दरवर्षीच्या तुलनेत कमी गर्दी दिसून आली. दुपारी २ नंतर अनेकांना प्रवेश देण्यात आला. परंतु तोपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज संपले होते. (प्रतिनिधी)शासनच अपंग आहे! - बच्चू कडूविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अभिनव आंदोलन करणारे म्हणून आ. बच्चू कडू ओळखले जातात. या वर्षीच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होताच, पहिल्याच दिवशी त्यांनी एक हात बांधलेल्या स्थितीत विधानभवन परिसरात प्रवेश केला. अपंगांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा सर्व खटाटोप केला. मागील वर्षी याच शासनाने अपंगांच्या मागण्या तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन शासनाने पाळले नाही, त्याचा निषेध म्हणून त्यांनी हात बांधून प्रवेश केला. ‘हे शासनच अपंग असून, या शासनानेच आता बांधून घ्यावे’ असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
हिवाळी अधिवेशनाची सुरुवात गर्दीविना!
By admin | Updated: December 8, 2015 01:34 IST