एसटीला मिळणार का ‘बुस्टर डोज’?

By admin | Published: November 21, 2014 12:47 AM2014-11-21T00:47:08+5:302014-11-21T00:47:08+5:30

प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ अन् प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाची

Will STO get booster dosage? | एसटीला मिळणार का ‘बुस्टर डोज’?

एसटीला मिळणार का ‘बुस्टर डोज’?

Next

धोरणात बदल महत्त्वाचा : गरज शासनाच्या इच्छाशक्तीची
दयानंद पाईकराव - नागपूर
प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ अन् प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवासी ऐषोआराम पुरविणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. सिझनवगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत असून स्पिड लॉक पद्धती, कर्मचाऱ्यांना सुविधा आदी एसटीच्या समस्या अधिवेशनात मार्गी लागणार काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे गरजेचे असताना एसटीने कुठलाच बदल घडवून आणला नाही. या कारणामुळे एसटीचे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून एसटी महामंडळाची धावपळीच्या स्पर्धेच्या युगात कासवगतीने वाटचाल सुरू आहे.
खाजगी ट्रॅव्हल्सपेक्षा भाडे अधिक
एसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासभाडे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत नेहमीच अधिक असते. नागपूरवरून वर्धेला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स एसटीच्या बसपेक्षा १० ते १५ रुपये कमी तिकीट आकारून प्रवाशांची वाहतूक करते. परंतु एसटी महामंडळ स्पर्धेत उतरून प्रवासी मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी भाड्यात तडजोड करण्यास तयार नाही. यामुळे एसटीचे असंख्य प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.
‘स्पिड लॉक’ पद्धतीमुळे कंटाळलेत प्रवासी
एसटी महामंडळाने आपल्या सर्व बसेसचा ‘स्पिड लॉक’ केलेला असतो. यामुळे एका विशिष्ट क्षमतेच्या वर एसटीच्या बस धावत नाहीत. यामुळे प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. अमरावती मार्गावर नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ असलेला चढही अनेकदा एसटीच्या बसेस चढताना बंद पडतात. अशा वेळी प्रवासी चालक आणि वाहकांनाच दोष देऊन वाद घालतात. याउलट खाजगी वाहतुकीच्या गाड्यांचा वेग एसटीच्या तुलनेत कितीतरी अधिक असतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. ‘स्पिड लॉक’ पद्धतीला आता एसटी महामंडळातील संघटना, कर्मचारी विरोध करीत असून खाजगीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाला ‘स्पिड लॉक’ पद्धती बंद करण्याची गरज आहे.
बसेसची अवस्था वाईट
एसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा स्वच्छ नसतात. त्यामुळे बस पाहताच प्रवाशांना या बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडतो. बसमध्येही अनेकदा थुंकी, कचरा, घाण असे दिसल्यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास होतो. खाजगी वाहतुकीच्या बसेस दिसण्यास चकाचक असतात. त्यात बसण्याच्या सिटही आरामदायक असतात. प्रवासभाडेही एसटीच्या तुलनेत कमी असल्यामुळे साहजिकच प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित होतात.
प्रवाशांच्या तुलनेत बसेस कमी
खाजगी वाहतूकदाराकडे राज्यात १ लाख बसेस, एसटीकडे १७ हजार बसेस आहेत. बसेसची संख्या वाढत नसल्यामुळे मनुष्यबळ वाढत नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे त्या परिस्थितीत सेवा पुरविण्याची पाळी महामंडळावर येते. नागपूर शहरात सध्या ४ आगार मिळून ३१८ बसेस आहेत. शहरात आणखी १०० बसेसची गरज असून जिल्ह्यात २०० बसेसची गरज आहे. बसेस जास्त नसल्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी वेळ मिळत नाही. एखाद्या बसमध्ये बिघाड झाल्यास ती त्वरित दुरुस्त करून दुसऱ्या मार्गावर पाठवावी लागते. रस्त्यात गाडी नादुरुस्त झाल्यास बसेस उपलब्ध नसल्यामुळे नाईलाज होतो. परंतु शासन बसेस वाढविण्यास परवानगी देत नसल्यामुळे एसटी महामंडळाला प्रवाशांना सेवा पुरविणे कठीण जात आहे.
शासनाची भूमिका संशयास्पद
एसटी महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. टप्प्याटप्प्याने वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्रात फक्त एसटी महामंडळाला आहे. परंतू खाजगी वाहतूकदार थेट टप्प्याटप्प्याने वाहतूक करतात. राज्य शासनाकडून ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी कुठलीच ठोस उपाययोजना होत नाही. यामुळे एसटीचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. आपलाच उपक्रम असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शासनाची भूमिकाच संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
स्लिपरक्लास, एसी बसेसची सोय नाही
पूणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हैदराबाद अशा ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी एसी आणि स्लिपरक्लास बसेसना प्राधान्य देत आहेत. अनेकदा खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे बुकिंग करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना तीन दिवस वेटिंगमध्ये राहावे लागते. एवढा मोठा प्रवासी वर्ग असताना एसटी महामंडळाने स्लिपरक्लास बसेस, एसी बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्लिपरक्लास बसेसने प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
करमणुकीच्या साधनांचाही अभाव
खाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना प्रवाशांना चांगली गाणी, चित्रपट दाखविण्यात येतात. परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये अशी कुठलीच सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना कंटाळवाणे वाटते. यामुळेही अनेक प्रवासी एसटी बसेसचा प्रवास टाळून ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देतात.
कर्मचाऱ्यांना नाहीत सुविधा
एसटी महामंडळाची बस एखाद्या आगारात मुक्कामी गेल्यानंतर तेथे चालक-वाहकांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही व्यवस्थित राहत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून किमान महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक गरजा भागविण्याची गरज आहे. परंतु अनेकदा मागणी होऊनही महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे गंभीर होऊन पाहिले नसल्याची स्थिती आहे.
एसटी नाही कात टाकण्यास तयार
वाहतूक क्षेत्रात नवनवे तांत्रिक बदल, संगणकीकरण होत आहेत. परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मात्र त्याच पारंपरिक पद्धतीने काम करताना दिसतात. साध्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात पाच ते सहा संगणक उपलब्ध असतात. परंतू महामंडळाच्या विभागीय कार्यालयातही काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पैसे गोळा करून संगणक विकत आणण्याची पाळी येते. तर एसटीच्या अधिकाऱ्यांना आपल्या मुंबईच्या वरिष्ठांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची पाळी येते. त्यामुळे अजूनही एसटी महामंडळ कात टाकण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

Web Title: Will STO get booster dosage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.