मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेले दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. स्कूल बॅगच्या ओझ्याने विद्यार्थ्यांवरचा मानसिक व शारीरिक ताण वाढत चालला असल्याने याबाबत न्यायालय काय आदेश देणार, याकडे विद्यार्थी, पालक व सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. चेंबूर येथील स्वाती पाटील यांनी अॅड. नीतेश नेवसे यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दप्तरातील वह्या व पुस्तकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आता प्रत्येक शिक्षक त्याच्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना देत असतो. परिणामी विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांच्या वह्या व पुस्तके शाळेत घेऊन जावी लागतात. याचा विद्यार्थ्यांच्या पाठीवर व मानेवर दुष्परिणाम होत आहे. दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना मानेचे व पाठीचे आजार होत असल्याचे केईएम रुग्णालयाने आधीच स्पष्ट केले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तरी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दप्तराचे ओझे कमी होणार की नाही?
By admin | Updated: April 7, 2015 04:46 IST