ऑनलाइन लोकमतसातारा, दि. १५ : राज्य अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगल जेधे खून प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर संतोष पोळने आजपर्यंत आणखी 5 खून केल्याचे उघडकीस आले. त्याच्या फार्महाऊसवर 4 जणांच्या मृतदेहांचे सापळे सापडले.दोन महिन्यांपासून गायब असलेल्या वाई येथील अंगणवाडी सेविका मंगला जेधे (वय ४५, रा. वेलंग ता .वाई)0 यांचा मृतदेह पोलिसांनी धोम परिसरातून जमिनीतून उकरुन काढल्यानंतर वाई येथीलच डॉक्टर संतोष पोळ याला अटक करण्यात आली होती.
आजपर्यंत गायब झालेल्या इतर महिलांचीही चौकट त्याच्या अटकेच्या बातमीवेळीच सर्वप्रथम 'लोकमत'ने छापली होती. त्यादृष्टीने तपासही सुरु झाला. त्याला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर 'पोलिसी खाक्या' अनुभवताच डॉक्टर पोपटासारखा बोलत गेला. गेल्या काही वर्षांत धोम परिसरातून गायब झालेल्या 5 जणांचा खून करुन याच शेतात पुरल्याचे त्याने कबूल करताच पोलिस यंत्रणा हलली. स्वत: पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमवारी दुपारी त्याला घेऊन पुन्हा शेत गाठले. त्याने सांगितल्यानुसार सर्व जागा खोदल्या असता तब्बल चार मानवी सापळे सापडले.
वेगवेगळ्या कारणावरुन सलमा शेख, जागाबाई पोळ, सुरेखा चिकणे, नथमल भंडारी अन वनिता गायकवाड यांचे खून केल्याची कबुली मिळाली असून यापैकी चार जणांच्या मृतदेहाचे सापळे आज पोलिसांनी जमिनीतून उकरुन काढले. यातील एकाला धोम धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याचेही उघडकीस आले आहे. 2003 रोजी त्याने सर्वप्रथम सुरेखा यांचा खून केला होता. त्याने केलेल्या पापाची इतरांना समजली म्हणून बाकीचेही खून करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगलाबाई जेधे बेपत्ता होत्या. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत होता. गेल्याच् आठवड्यात अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेधे यांच्या अपहरणाचा तपास ह्यसीआयडीह्णकडे द्यावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी डॉक्टर संतोष पोळ याला मुंबई येथून अटक केल्यानंतर जेधे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने ज्या ठिकाणी जेधे यांचा मृतदेह पुरला होता. ती जागाही त्याने दाखविली होती. सात फूट खड्ड्यात एका पोत्यामध्ये जेधे यांचा मृतदेह त्याने गुंडाळून ठेवला होता.