मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांना वारंवार पक्ष बदलण्याची सवय आहे. सध्या त्यांची पावले सत्तेकडे पडत आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर सतत टीका करत असल्याचे सांगत त्यांचा बोलविता धनी कोण, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रवादी दुष्काळाचे राजकारण करत नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार राज्यातील सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. त्यांनी स्वत:हून मुख्यमंत्र्यांची तीनदा भेट घेऊन दुष्काळ हाताळण्यासाठी सूचना केल्या. आम्ही आणखी काय करणे अपेक्षित होते. तरीही सरकार हलत नाही. ते शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत नाही, हे लक्षात आल्यावर महिन्याभराची सूचना देऊन आम्ही जेलभरो आंदोलन केले. झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारने आता तरी शरद पवार यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही तटकरे केली.शिवसेनेला सत्तेत राहून काहीच मिळत नाही. त्यामुळे ते विरोधी पक्षाप्रमाणे बोलतात की काय अशी शंका येते. आशिष शेलार फार बडबडत असतात. मुंबई महापालिकेमधील आॅक्ट्रॉय आणि नालेसफाई घोटाळ्यावर बडबडण्यापेक्षा त्यांनी सरकारकडून त्याची चौकशी करून घ्यावी, असेही तटकरे म्हणाले. (प्रतिनिधी)
विखे-पाटील यांचा बोलविता धनी कोण?
By admin | Updated: September 15, 2015 02:23 IST