मुंबई : विधान परिषदेचे उपसभापती वसंत डवखरे यांचा आज ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पराभव झाल्याने आता या पदावर भाजपाकडून दावा सांगितला जाणार आहे.विधान परिषदेच्या १० जागांसाठी नुकतीच द्वैवार्षिक निवडणूक झाली. त्यात भाजपाचे पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसची एक जागा बिनविरोध आली. तर ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रवींद्र फाटक विजयी झाल्याने सेनेची आणखी एक जागा वाढली. त्यामुळे ७८ सदस्यांच्या या सभागृहात आता राष्ट्रवादीचे २६, काँग्रेसचे १९, भाजपाचे ४ समर्थकांसह २०, शिवसेनेचे ८ तसेच रिपाइं, शेकाप आणि लोकभारतीचे प्रत्येकी १आणि अपक्ष २ असे संख्याबळ असेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख हे सभापती असताना राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून त्या जागी रामराजे निंबाळकर यांची वर्णी लावली. शिवाय, विरोधीपक्षनेतेपद धनंजय मुंडे यांच्याकडे घेतले. विधान परिषदेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला देण्याची परंपरा कधीच मोडीत निघाली आहे. त्यामुळे या पदावर आता नव्या संख्याबळाच्या जोरावर भाजपाकडून दावा सांगितला जाणार आहे. तर विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा डोळा आहे. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले की, ही दोन्ही पदे पक्षाला मिळावीत, असा आमचा प्रयत्न असेल. मंत्रीपदाची संधी न मिळालेल्या एखाद्या ज्येष्ठ सदस्यास उपाध्यक्षपद देऊन समाधान केले जाऊ शकते. मात्र काँग्रेसची मदत झाली तर राष्ट्रवादी हे पद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)>शिवसेनेचा डोळाविधानसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याची परंपरा कधीच मोडीत निघाली आहे. त्यामुळे या पदावर आता नव्या संख्याबळाच्या जोरावर भाजपाकडून दावा सांगितला जाणार आहे. तर विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा डोळा आहे.
उपसभापतीपदी कोणाची वर्णी?
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST