मुंबई : अर्भकांच्या नाळेपासून औषधांची निर्मिती केली जाते. त्याचा वापर वैध आहे की अवैध, याविषयी अनभिज्ञता आहे. त्यामुळे नाळेपासून तयार करण्यात येणाऱ्या औषध प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याविषयी, औषधे तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने नाळ कुठून मिळविली जाते? असे अनेक प्रश्न केंद्रीय औषध नियंत्रण विभागाला आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने विचारले आहेत. नाळेच्या उपलब्धतेविषयी आॅल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने पत्राद्वारे औषध नियंत्रण विभागासमोर प्रश्न उपस्थित केला आहे.
केंद्रीय औषध नियंत्रण विभाग या औषध निर्मिती कंपन्या आणि पद्धतींकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बाजारात प्लेसेट्रेक इंजेक्शन उपलब्ध होते. त्यात ह्युमन प्लेसेटा अॅब्स्ट्रॅक वापरात आणतात. ह्युमन प्लेसेंटा अॅब्स्ट्रॅक म्हणजे मानवी नाळेचे सत्त्व. यापासून तयार केलेले इंजेक्शन आणि औषध दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी मानवी नाळेची मोठी मागणी असते, पण ही नाळ कशी उपलब्ध होते? बाळाच्या जन्मानंतर नाळ औषध कंपन्यांना उपलब्ध होत असेल, तर त्यासाठी प्रसूतिगृहांना नियम निकष आहेत का, असे प्रश्न या पत्राद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत.