मंगेश व्यवहारे/ मुकेश कुकडे नागपूर : शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत एप्रिल महिन्यात नागपुरात पहिले स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले. पाच महिनेही पूर्ण झाले नाहीत तोच येथील उपकरण चोरीला गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्राचे उद्घाटन केले होते, हे विशेष.हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊनही शेतकºयांना शासनाकडूनही मदत मिळत नाही. या दुष्टचक्रातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने राज्यात २०५९ व नागपूर जिल्ह्यात ६४ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले. पहिल्या केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी रोडवरील डोंगरगाव येथे झाली. ३० एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले होते.या केंद्राला लोकमत चमूने सोमवारी भेट दिली असता केंद्रातील सौरपॅनल तसेच हवामानातील घटकांची नोंद घेणाºया यंत्रणेची मोडतोड करून त्याची चोरी झाल्याचे आढळले. एक खांब आणि उद्घाटनाची कोनशिलाच केंद्राच्या स्थळी होते. केंद्राला चारही बाजूने लोखंडी जाळीचे कम्पाऊंड व गेट बसविले आहे. हा संपूर्ण परिसर जंगली गवत व झाडांनी व्यापला आहे. केंद्रात जायलासुद्धा सुरळीत पायवाट नाही.>स्कायमेटकडे होती जबाबदारीस्वयंचलित हवामान केंद्राच्या दुरवस्थेसंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या केंद्राची जबाबदारी ही स्कायमेट या संस्थेकडे होती. स्कायमेटच्या माध्यमातूनच ही यंत्रणा हाताळण्यात येणार होती. पहिल्या स्वयंचलित केंद्राची मोडतोड झाली असली तरी त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही स्कायमेटची आहे.ग्रा.पं.तर्फे तिथे एक लाइटही लावण्यात आला होता. परंतु यंत्रणेसोबतच लाइटही चोरून नेला आहे. याची तक्रार आम्ही पोलिसात करणार आहोत. भविष्यात महत्त्वाच्या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही ठेवू.- देवेंद्र गौर, सरपंच, डोंगरगाव ग्रा.पं.
स्वयंचलित हवामान केंद्र गेले कुठे?, महत्त्वाची उपकरणे चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:49 IST