Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana Promise : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. महायुतील २०२४च्या विधानसभा निवडणुकीत २०० पार जागा मिळाल्या. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांना १३२ जागा मिळाल्या. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठे यश मिळाले. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असे अनेक राजकीय तज्ज्ञमंडळींचे म्हणणे आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये दिले जाणार, असे आश्वासन महायुतीने निवडणुकीआधी केले होते. त्या मुद्द्यावर आज नवे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याचे फडणवीसांनी उत्तर दिले.
"लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून २१०० रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. २१०० रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे, ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही," असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
"पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी योजना आणली, त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला होता. नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच ते निकषाबाहेरील असून त्यांना योजनेची गरज नाही हे स्पष्ट केले आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली. तशाच पद्धतीने आता देखील महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल. निकषांमधील सर्व लोकांना योजनांचा लाभ मिळेल. लाडकी बहिणी योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही. ही योजना सुरुच राहिल," असा पुनरुच्चार फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.