मुंबई : हँकॉक पूल तोडल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी सँडहर्स्ट रोड येथे तात्पुरता पादचारी पूल केव्हा बांधणार, अशी विचारणा सोमावरी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेकडे केली.हँकॉक पूल तोडल्याने नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासाठी हँकॉक पूलाच्या शेजारीच तात्पुरता पादचारी पूल बांधण्यात यावा, यासाठी कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनु केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.नव्या पूलाचे बांधकाम केव्हा पूर्ण करण्यात येईल? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने महापालिका व मध्य रेल्वेला १४ जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयाने मध्य रेल्वे व महापालिकेला नागरिकांना सँडहर्स्ट रोड क्रॉस करण्यासाठी तात्पुरता पादचारी पूल उभारण्याची सूचना केली होती. सोमवारच्या सुनावणीवेळी महापालिकेच्या वकील तृप्ती पुराणिक यांनी पूलासंबंधी महापालिकेचे व रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली असून पूल बांधण्यासाठी मुदत ठरवली नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच हा पूल रेल्वेनेच बांधवा, असे महापालिकेला वाटत असल्याचेही अॅड. पुराणिक यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)
सँडहर्स्ट रोड येथील एफओबी केव्हा पूर्ण करणार?
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST