चेतन ननावरे, मुंबईसाहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत विशेष योगदान दिल्याबद्दल राज्यातील कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल कामगार वर्गाला पडला आहे. कारण कामगार क्षेत्रात मानाचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, कामगार मंत्री अशा मान्यवरांच्या तारखा मिळत नसल्याने तब्बल ४ महिन्यांचा उशीर झाला आहे. भारतीय कामगार चळवळीचे नेते रावबहाद्दूर नारायण मेघाची लोखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फेब्रुवारी महिन्यात या पुरस्कारांचे वितरण होणे अपेक्षित असते. मात्र चार महिने उलटल्यानंतरही अद्याप पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त सापडलेला नाही. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी ५१ कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो. १९७८-७९ सालापासून मंडळाकडून ५ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या कामगारांना विशेष योगदानासाठी या पुरस्काराने गौरविले जात आहे. या पुरस्कारासाठी एकूण ८६ कामगारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. कल्याण आयुक्त नरेंद्रसिंह नागभिरे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यास विलंब होत असल्याचे मान्य केले. नागभिरे म्हणाले, ‘मंडळाने समिती गठित करण्यास उशीर झाल्यामुळे पुरस्कार जाहीर करण्यास विलंब झाला. हा पुरस्कार मुख्यमंत्री, राज्यपाल, कामगार मंत्री, आयुक्त यांच्या उपस्थितीत देण्याचा मानस आहे. त्यामुळे या सर्व मान्यवरांच्या सोयीनुसारच वितरण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येईल.’ कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारा कामगार भूषण पुरस्कार यंदा नाशिकच्या रामचंद्र शिंदे यांना जाहीर झाला आहे. कामगार पुरस्कारांचे स्वरूप गुणवंत कामगार पुरस्कार १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. पुरस्कारानंतर कामगाराला विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार मिळतात. कामगार भूषण गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील १० वर्षांत विविध क्षेत्रांत दिलेले योगदान पाहून ‘कामगार भूषण’ पुरस्कार दिला जातो. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कामगार मित्र रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कामगार मित्र’ पुरस्कार दिला जातो. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘कामगार मित्र’ मिळणार का? समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसते. म्हणून मंडळाकडून समाजातील विविध स्तरातील मान्यवर, उद्योग संस्था, कामगार संघटना यांच्याकडून माहिती मागवून त्याआधारे एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला ‘कामगार मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र या वर्षी मंडळाने या पुरस्कारासाठी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाची घोषणा केलेली नाही. यावर ‘कामगार मित्र पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती किंवा संस्था मंडळाच्या दृष्टिक्षेपात आलेली नाही. मात्र पुरस्कार वितरण सोहळ्याआधीही अशी एखादी व्यक्ती किंवा संस्था नजरेस आल्यास पुरस्काराची घोषणा करू,’ अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे. पुरस्कारासाठी वशिलेबाजी? गुणवंत कामगार पुरस्कारांत यंदा ४ महिला कामगार आणि ८२ पुरुष कामगारांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी आलेल्या प्रवेशिकांमध्ये बहुतेक कामगारांनी आमदारापासून मंत्र्यांपर्यंतच्या शिफारसपत्रांची जोडणी केल्याचे कल्याण आयुक्तांनी मान्य केले. मात्र कोणताही वशिला न पाहता कामगाराची गुणवत्ता पाहूनच पुरस्कार जाहीर केल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.
गुणवंत कामगार पुरस्कार प्रदानाचा मुहूर्त कधी?
By admin | Updated: June 29, 2015 03:08 IST