यवतमाळ : पोलीस ठाणे हे तसे सर्वाधिक सुरक्षित ठिकाण समजले जाते़ पण चक्क पोलीस ठाण्यातच हवाला प्रकरणातील जप्त केलेली तब्बल ४२ लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचे बुधवारी उघडकीस आले़ वडगाव रोड पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला़ या कृत्यामागे पोलीस शिपाईच असल्याचे गुरुवारी निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येऊन ३९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली़ निर्मल उत्तम राठोड (बक्कल नं. ९९५) असे पैसे चोरणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. यवतमाळच्या बसस्थानकावर तीन महिन्यांपूर्वी हवाला प्रकरणातील ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. ही रक्कम वडगाव रोड पोलीस ठाण्यातील मालखाण्यात ठेवली होती. या मालखाण्यावर जमादार अशोक पत्रकार यांची ड्युटी होती. निर्मल राठोड हा त्यांना सहायक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, पत्रकार सुटीवर गेले. याच काळात निर्मल राठोडने ३ मे रोजी पहाटे ३ वाजता मालखाण्यात चोरी केली. रोकड ठेवलेल्या पेटीचे सील कायम ठेवत कोंडा वाकवून त्यातील रक्कम राठोड याने बाहेर काढली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला नाही. दरम्यान, पेटीचा कोंडा वाकविल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती जमादार अशोक पत्रकार यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांना दिली. तीन दिवसांपासून ठाण्यात गैरहजर असलेल्या निर्मल राठोडवर संशय बळावला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निर्मल राठोड याला यवतमाळातूनच ताब्यात घेतले. बुधवारी रात्रभर त्याची कसून चौकशी केली. त्याने दारूच्या नशेत चोरी केल्याची कबुली दिली. ही रक्कम दारव्हा तालुक्यातील ब्रह्मनाथ जवळा येथे सासऱ्याच्या घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस पथकाने सासरे शेषराव चव्हाण यांचे घर गाठले. या ठिकाणी राठोडने जमिनीत गाडून ठेवलेली ३९ लाख ३४ हजार ६०० रुपयांची रक्कम हस्तगत केली. दरम्यान, निर्मल राठोडने २ लाख ३२ हजार रुपये खर्च केले. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी गुरुवारी दिलेल्या तक्रारीवरून निर्मल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. असे असतानाच आता पोलीस ठाण्याचा मालखाणाही सुरक्षित नसल्याचे या घटनेच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे़ (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यातच चोरी होते तेव्हा़ !
By admin | Updated: May 15, 2015 01:23 IST