अकोला : शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने जिल्ह्यातील २३ हजार ४८ गारपीटग्रस्त शेतकरी पीक नुकसानभरपाईच्या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत. या पृष्ठभूमीवर शासनाकडून मदतीचा निधी केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.गेल्या २२ फेबु्रवारी ते ११ मार्च या कालावधीत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गारपीट व अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील पिकांना प्रचंड तडाखा बसला. जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यात सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. गहू, हरभरा, संत्रा, लिंबू, केळी व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी ५० टक्क्याच्यावर पीक नुकसानभरपाईपोटी शासनामार्फत मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यातील ४७ हजार २२० गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी ५७ कोटी ५ लाख ६ हजार ५० रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली. त्यापैकी गेल्या महिनाभरात शासनाकडून जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी २७ कोटींचा मदतनिधी शासनामार्फत प्राप्त झाला. उपलब्ध झालेली मदतीची ही रक्कम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त २४ हजार १७२ शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. जिल्ह्यातील उर्वरित गारपीटग्रस्त २३ हजार ४८ शेतकर्यांना पीक नुकसानभरपाईची मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेला ३० कोटींचा मदत निधी अद्यापही शासनामार्फत प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गारपीटग्रस्त २३ हजारांवर शेतकरी पीक नुकसानभरपाईच्या मदतीपासून अद्यापही वंचित असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला ३० कोटींचा मदत निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांकडून केली जात आहे.
गारपीटग्रस्त २३ हजारांवर शेतकरी मदतीपासून वंचित शासनाकडून केव्हा मिळणार मदतनिधी?
By admin | Updated: May 11, 2014 00:06 IST