शैलेश कर्पे/बाळासाहेब कुमावत, सिन्नर - साप शब्द कानावर पडला तरी अंगावर काटा उभा राहतो. फणा उभारून डोलणारा नाग दिसला तर पाचावर धारण बसली नाही तर नवल. तर मग अत्यंत विषारी कोब्रा जातीचा नाग पँटमध्ये घुसल्यावर काय होईल?... ऐकूनच घाम फुटला ना ! सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे झोपेत एका तरुणाच्या पँटमध्ये साडेचार फूट लांबीचा कोब्रा घुसला आणि अचानकपणे जागा झालेल्या या तरुणाची सुमारे पंधरा मिनिटे मृत्यूशी झुंज सुरू होती. पाथरे खुर्दमधील योगेश मोहन गुंजाळ हा २२ वर्षीय तरुण रविवारी दिवसभर शेतात काम करुन दमला होता. रात्री आठ वाजता जेवण झाल्यानंतर योगेश घराच्या पडवीत अंथरूण टाकून पडला आणि झोपी गेला. रात्री अचानक मांडीजवळ त्याला गार स्पर्श झाला आणि वळवळ जाणवली. तो ताडकन जागा झाला. आपल्या पँटमध्ये साप घुसल्याची खात्री पटल्यानंतर त्याची गाळणच उडाली. मात्र मोठ्या हिमतीने त्याने दोन्ही हातांनी नाग दाबून धरला. पडवीत त्याच्याजवळ झोपलेल्या वडिलांना व घरातील मोठ्या भावाला त्याने बेंबीच्या देठापासून आवाज दिला. योगेशचा मोठा भाऊ मकरंद पळतच बाहेर आला. योगेशने पॅँटमध्ये काहीतरी घुसले असून हाताला जाणवणार्या स्पर्शावरून तो साप असल्याचे छातीठोकपणे सांगितले. हे ऐकताच मकरंदलाही घाम फुटला. आपण स्वप्न तर पाहत नाही ना, असे काही क्षण मकरंदला वाटले. मकरंदने शेजारच्या वस्तीवरील गावकर्यांना मदतीसाठी बोलावले. पंडित दवंगे व सदानंद गुंजाळ यांनी मदतीसाठी धाव घेतले. तोपर्यंत मकरंदनेही सापाची एक बाजू हाताने घट्ट पकडून धरली. शेजारच्यांनी ब्लेडने पँट फाडली. तोच दोघा भावांनी त्यांच्या हातातील साप बाजूला फेकला तर तो साडेचार फूट कोब्रा नाग असल्याचे पाहताच योगेशला भोवळ आली. इतर सर्वांची बोबडी वळण्याची वेळ आली होती. त्यानंतर अर्धमेला झालेल्या नागाला उपस्थितांनी मारले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला.
युवकाच्या चड्डीत कोब्रा नाग शिरतो तेव्हा..!
By admin | Updated: May 30, 2014 02:53 IST