शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर काय बिघडणार..? बाबुरावचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

By अतुल कुलकर्णी | Updated: July 31, 2022 07:09 IST

मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल. त्याच्यामुळे आपल्याला काही फरक पडणार आहे का..? मंत्री असले काय आणि नसले काय..? तुम्हाला कदाचित फरक पडेल...

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय संजयजी,सप्रेम नमस्कार.राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होत नाही म्हणून तुम्ही सातत्यानं बोलत आहात. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल. त्याच्यामुळे आपल्याला काही फरक पडणार आहे का..? मंत्री असले काय आणि नसले काय..? तुम्हाला कदाचित फरक पडेल... पण तुमचं जाऊ द्या, आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना दादा मंत्री झाले काय आणि आबा मंत्री झाले काय...? काहीही फरक पडणार नाही. उगाच तुम्ही आमच्यासाठी त्रास करून घेऊ नका...

साहेब, पाच वर्षे भाजप- शिवसेनेचं सरकार होतं. त्या काळातल्या कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं होतं..? हे तुम्ही एका दमात सांगून दाखवा, आपण वाटेल ती पैज हरायला तयार आहोत..! अहो, इथं काल डब्यात कशाची भाजी आणली होती हे आठवत नाही, तेव्हा त्यावेळी कोण मंत्री होतं...? त्याने काय दिवे लावले..? हे कसं लक्षात राहणार..? आमच्या पोरीला विचारलं, बाई गं, चार वर्षांपूर्वी शिक्षण मंत्री कोण होतं...? तर ती म्हणते, त्याच्यासाठी शिकावं लागतं का..? तिच्या मैत्रिणीला विचारलं, अन्न, नागरी पुरवठा मंत्री कोण होतं..? तर ती म्हणते, असा मंत्री असतो का..? तो करतो काय..? अहो संजयराव, आमचं उनाड पोरगं राजकारणात स्वतःला फार भारी समजतं... त्याला विचारलं, बाबा रे, जलसंपदा आणि जलसंधारण मंत्री यात फरक काय..? तर तो म्हणतो, असा कुठे फरक असतो का? दोघेही गांधीजींवर तेवढेच प्रेम करतात ना...? मग फरक कशाला करायचा... आता या उत्तरावर तुमच्याकडे काही प्रति उत्तर आहे का...?

ते जाऊ द्या... आमच्या सौभाग्यवतीला विचारलं, एवढं सकाळी सकाळी पेपरात तोंड खुपसून बसतेस. मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं कुठं अडलंय सांग बरं...? तर ती फणकाऱ्यात म्हणाली, परवा मी कोणती साडी नेसली होती ते आधी सांगा बरं... दोन दिवसांपूर्वीचा दिवस डोळ्यापुढे उभा केला आणि पटकन शेजारच्या मन्याच्या आईनं कोणती साडी नेसली होती हे आठवलं.... तिला म्हणालो त्यांनी किरमीजी रंगाची मोराची पिसं छापलेली साडी नेसली होती... पण तू कोणती नेसली होतीस ते काही आठवत नाही...! आता प्रामाणिकपणे उत्तर दिलं तेव्हा तिने हातातला पेपर तोंडावर भिरकावला, आणि म्हणाली, त्या टवळीची साडी आठवते.... पण मी एवढी चवळीच्या शेंगेसारखी... माझी साडी आठवत नाही...? संजयराव शप्पथ सांगतो, लगेच गुगल वर बघितलं.... चवळीच्या शेंगा बारीक असतात की जाड...? जाम कन्फ्यूज झालो... तिला विचारायला जावं तर आणखी काय फेकून मारेल याची खात्री नाही... त्यामुळे या असल्या प्रश्नांची उत्तरं जिथं आमच्या गृहमंत्र्याला माहिती नाहीत, तिथे तुम्हाला तरी काय गरज आहे याची उत्तरे शोधण्याची...?

संजयराव, जाता जाता एक सांगतो... आबुराव मंत्री झाले काय आणि गबुराव मंत्री झाले काय...? पेट्रोलचे भाव कमी होणार का..? मेथीची जुडी स्वस्त मिळेल का? कांदे- बटाटे, टोमॅटोचे भाव कमी होतील का? कसलं मंत्रिमंडळ घेऊन बसले तुम्ही...? अहो, कोणी आल्याने काही फरक पडत नाही..! आपलं आपल्यालाच निस्तारावं लागतं... सकाळी उठलं की घाण्याच्या बैलासारखं जुंपून घ्यावं लागतं... रात्री उशिरापर्यंत कष्ट करावे लागतात... पोराची शाळा, त्याची फी, त्याचं प्रगती पुस्तक.... आपलं सासर... नातेवाईक... त्यांची दुखणी... एवढं सगळं पाहून, चार पैसे गाठीला कसे राहतील, याचाही विचार करावा लागतो... प्रपंच करावा लागतो, संजयराव आपल्याला... सरकारला कसला प्रपंच...? तेव्हा तुम्ही फार डोक्याला ताण करून घेऊ नका... मंत्री असले काय, आणि नसले काय... आमच्यासारख्यांना कोण विचारतं...? बाकी कसे आहात..? तबला पेटी वाजवायला आता बऱ्यापैकी वेळ मिळत असेल ना... संगीत चालू ठेवा... जीवनात त्याच्यासारखा साथीदार नाही...! ४० सोडून गेले काय आणि ५० गेले काय... सात सूर मात्र कायम सोबत राहतात...! एवढं मात्र पक्कं लक्षात ठेवा... जास्त काय लिहिणार तुमच्यासारख्या विद्वानांना...?

तुमचाच, बाबुराव

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे