मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांकडे पाठ फिरवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पुन्हा फडणवीस यांनी बोलावलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला दांडी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याआधी एक मंत्रिमंडळ बैठक तसेच १०० दिवसांच्या आढावाच्या बैठकीलाही उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित नव्हते. पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या विकास प्राधीकरणाची बैठक दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे भरणार होती. तर १२.३० वाजता नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबतही बैठक होती. या बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते.
नाराजीनाट्यानंतर प्राधिकरण नियमात बदलनुकतेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये नव्या रचनेत अध्यक्ष व नऊ सदस्य असतील. त्यात मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील. पदसिद्ध सदस्य पदासाठी मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. २०१९ च्या रचनेनुसार मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असत तर महसूल, वित्त, गृह, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य या विभागांचे मंत्री हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याचं बोलले गेले. मात्र मंत्रिमंडळात नियमात बदल करून एकनाथ शिंदेचा समावेश करण्यात आला.