लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरपरिषदांच्या निवडणुकीत बऱ्याच नेत्यांचे नातेवाइक जिंकले पण काहींवर पराभवाची नामुष्की ओढावली. घराणेशाहीबाबत ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी स्थिती आहे.पणन मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे (भाजप) या भुसावळमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्याचवेळी आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या कन्या प्रियदर्शिनी वुईके या यवतमाळच्या नगराध्यक्ष झाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या आधीच जामनेरच्या बिनविरोध नगराध्यक्ष झालेल्या आहेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल याही दोंडाईचामधून बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून आधीच जिंकल्या आहेत.
कुटुंब‘राज’नीती : राजकारणाच्या पटावर हवे आपलेच मोहरे अन् आपलेच राज्य
पाचोरामध्ये (जि. जळगाव) शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्ष झाल्या.चाळीसगावच्या नगराध्यक्षपदी स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली.मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का देत शिंदेसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील नगराध्यक्ष झाल्या.अकोला जिल्ह्याने घराणेशाही नाकारली. माजी आमदार नातिकोद्दिन खतिब यांच्या पत्नीचा बाळापूरमध्ये तर काँग्रेस नेते दीपक बोडखे यांच्या पत्नीचा अकोटमध्ये पराभव झाला. मूर्तिजापूरमध्ये आ.हरिष पिंपळे यांचे बंधू हरले.अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी तेथील नगराध्यक्षपदी निवडून आले.खामगावच्या नगराध्यक्षपदी जिंकलेल्या अपर्णा सागर फुंडकर या राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी आहेत.अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी यांना दर्यापूर (जि.अमरावती) येथे काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे यांनी पराभूत केले.
बुलडाण्यात नगराध्यक्ष म्हणून जिंकलेल्या पूजा गायकवाड या शिंदेसेनेचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी आहेत. पराभूतांमध्ये भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांचा समावेश आहे.धामणगाव रेल्वेच्या भाजप नगराध्यक्ष अर्चना रोठे-अडसड या ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या कन्या तर स्थानिक आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी आहेत.देवळीत (जि.वर्धा) नगराध्यक्षपदी पराभूत झालेल्या शोभा तडस या भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी आहेत.पुसदच्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक (अजित पवार गट) या राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत.शिंदेसेनेचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर हे माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत.अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे स्थानिक भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे तर माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांचे पती आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत पाच ठिकाणच्या नगराध्यक्षांना यापूर्वी राजकीय वारसा असल्याचे दिसून आले. त्यांचे वडील किंवा पती आमदार, खासदार तसेच यापूर्वी नगराध्यक्ष राहिलेले होते.संगमनेरमध्ये नगराध्यक्षपदी जिंकलेल्या डॉ. मैथिली तांबे या आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत. सत्यजित यांच्या आई दुर्गाताई तांबे या संगमनेरच्या १५ वर्षे नगराध्यक्ष होत्या. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मैथिली या भाचेसून आहेत.श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे हे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र असून त्यांच्या आई राजश्री ससाणे या श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत.पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचे वडील दिवंगत बाबूजी आव्हाड हे आमदार होते. राहाताचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधिन गाडेकर यांचे वडील नगराध्यक्ष, तर आई नगरसेविका होत्या.देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे वडील चंद्रशेखर कदम हे राहुरीचे आमदार होते.श्रीरामपूरमध्ये माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक या नगरसेवक निवडणुकीत पराभूत झाल्या. त्या माजी खासदार दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या कन्या.
Web Summary : Maharashtra municipal polls saw mixed fortunes for political families. Some relatives of leaders won, like Ashok Wuike's daughter. Others, including Sanjay Savkare's wife, faced defeat, highlighting the unpredictable nature of dynasty politics.
Web Summary : महाराष्ट्र नगर पालिका चुनावों में राजनीतिक परिवारों के लिए मिश्रित परिणाम सामने आए। अशोक वुइके की बेटी जैसे कुछ नेताओं के रिश्तेदार जीते, जबकि संजय सावकारे की पत्नी जैसे अन्य लोगों को हार का सामना करना पड़ा, जो वंशवादी राजनीति की अप्रत्याशित प्रकृति को उजागर करता है।