ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - जनतेने नाकारलेल्यांच्या पाठिंब्यावर सरकार कसे चालवणार याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असे सांगत महाराष्ट्राची तिजोरी कुरतडणा-या उंदरांच्या मदतीने विश्वासदर्शक ठराव जिंकणार आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला देऊ केलेल्या पाठिंब्याच्या मुद्यावरून 'सामना'च्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला आज आपले बहुमत सिद्ध करायचे असतानाच ते शिवसेनेसोबत युती करणार की राष्ट्रवादीने बाहेरून दिलेला पाठिंबा स्वीकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपा सरकार कसे तरणार? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
राष्ट्रवादीची भूमिका भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करण्याची आहे तसेच महाराष्ट्र लुटण्याची आहे, मात्र त्यांच्या भूमिकेशी भाजपा सरकारला काहीच देणेघेणे नाही. न मागता दिलेला पाठिंबा स्वीकारून सरकारचे डोहाळेजेवण एकदाचे उरकून घ्यावे अशा नैतिक व तात्त्विक मुद्यांवर भाजपचे एकमत झालेले दिसते असा टोलाही लेखातून हाणला आहे. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादीला आज चौथ्या क्रमांकांवर फेकले आहे, असे असताना पहिल्या स्थानावर असलेल्या भाजपा केरात टाकलेल्या पक्षाची धूळ मस्तकी लावून कोणती नैतिकता व तत्त्व तेजोमय करणार आहे, याचा जबाबादेखील नव्या राज्यकर्त्यांना द्यावा लागेल, असेही लेखात म्हटले आहे..
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे-
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘‘राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही मागितला नव्हता, त्यांनी आपणहून दिलेल्या पाठिंब्याशी आणि त्यांच्या भूमिकेशी भाजपला काही देणेघेणे नाही!’’ मुख्यमंत्र्यांचे हे समर्थन लंगडे आहे. महाराष्ट्राची विधानसभा त्रिशंकू आहे व बहुमतासाठी भाजपला नाना खटपटी लटपटी कराव्या लागणार आहेत. त्या खटपटी लटपटी कोणत्या ते जनतेसमोर मांडावे लागेल.
भाजपला आपले सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा चालेल, पण शिवसेनेस सरकारात सामील करून घेण्याबाबत चर्चेची गाडी ते पुढे ढकलायला तयार नाहीत. नैतिकतेच्या आणि तात्त्विक मुद्यांवर शिवसेनेने पाठिंबा द्यावा असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. हे नैतिक आणि तात्त्विक मुद्दे नेमके कोणते, याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
- शिवसेना नको, पण राष्ट्रवादी चालेल. न मागता दिलेला पाठिंबा अव्हेरायचा कसा? राष्ट्रवादीची भूमिका भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करण्याची आहे, महाराष्ट्र लुटण्याची आहे, पण त्यांच्या भूमिकेशी भाजप सरकारला काहीच देणेघेणे नसून त्यांनी न मागता दिलेला पाठिंबा स्वीकारून सरकारचे डोहाळेजेवण एकदाचे उरकून घ्यावे अशा नैतिक व तात्त्विक मुद्यांवर भाजपचे एकमत झालेले दिसते. सरकार टिकविण्यासाठी तुम्ही कोणाच्या तालावर नाचणार हाच खरा प्रश्न आहे.
- राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात आज चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. जनतेने निवडून दिलेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष चौथ्या म्हणजे शेवटच्या क्रमांकाच्या पक्षाशी हातमिळवणी करून सरकार वाचवीत आहे. केरात टाकलेल्या पक्षाची धूळ मस्तकी लावून सरकार कोणती नैतिकता व तत्त्व तेजोमय करणार आहे.