मुंबई : देशभरातील जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी मते दिली. पण ते अजूनही गुजरातमध्येच असल्यासारखे वागताहेत. मोदींनी आता थोडं देशाकडे बघावं, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी निवडक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला़ राज म्हणाले, तिकडे सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारीत आमचे जवान शहीद होत असताना पंतप्रधान प्रचार सभा घेत आहेत. नुकत्याच काही राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने मोदी महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये प्रचार सभा घेत असल्याचा आरोप राज यांनी केला. अच्छे दिनचे सर्वसामान्यांना सुखस्वप्न दाखवत मोदी केंद्रात सत्तेवर आले. मात्र, काँग्रेसच्या काळातही आमचे जवान शहीद होत होते आणि आता मोदींच्या काळातही! मग फरक कुठे पडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांची वक्तव्ये, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारख्या घोषणांमुळे यांच्या हेतूबद्दल शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले़ या संपूर्ण घडामोडी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला़ मात्र, कोणत्याही परिस्थिती मुंबई वेगळी होऊ देणार नसल्याचे राज यांनी ठणकावले़ युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्रभर मॉल, रेस्टॉरंट चालू ठेवण्याची मागणी केली. यासंदर्भात विचारले असता मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्याला त्या नजरेतूनच बघायला हवं. मात्र, सुरक्षा व्यवस्थाच कोलमडल्याने रात्रभर मॉल, रेस्टॉरंट चालविण्या जोगी परिस्थिती नसल्याचे राज म्हणाले. (प्रतिनिधी)
तुम्हाला काय फक्तगुजरातींनी मते दिली?
By admin | Updated: October 11, 2014 05:44 IST