अहेरी क्षेत्रात एक जागा : भाजपच्या घोषणापत्रातील कोलांटउडीने नाविसपुढे पेचगडचिरोली : स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती अडचणीत आली आहे. भाजपने विदर्भ राज्याची साथ सोडल्यामुळे आपण आता मतदारांना काय सांगायचे, हा प्रश्न नाविससमोर पडला आहे. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज हे स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या सबंध राजकीय आयुष्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही सोडली नाही. जांबुवंतराव धोटे, ब्रिजलाल बियाणी यांच्या समवेत विश्वेश्वरराव महाराजांनी अहेरी ते नागपूर असा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मोर्चाही काढला होता. विश्वेश्वररावांच्या निधनानंतर श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनीही सातत्याने विदर्भ राज्याचा पुरस्कार केला व विदर्भ राज्याच्या बाजुने राहणाऱ्या पक्षाचे समर्थन घेत त्यांनी अनेक निवडणुका लढल्या व जिंकल्या. त्यांच्या मृत्यूनंतर नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज यांनीही विदर्भाची मागणी लावूनच धरली. लोकसभा निवडणुकीच्या काळात वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपला विदर्भाच्या मुद्यावर समर्थन देण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाला गडचिरोलीसह विदर्भात प्रचंड यश लोकसभा निवडणुकीत मिळाले.नाग विदर्भ आंदोलन समितीला मानणारा मोठा वर्ग गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातही आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत गंभीर असल्याचे नाविसच्या लक्षात आल्यावर राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहेरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टी विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने वचन नाम्याच्या स्वरूपात दृष्टिपत्र जाहीर केले आहे. या दृष्टिपत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाग विदर्भ आंदोलन समिती समोरची अडचण वाढण्याची शक्यता आहे. स्वतंत्र विदर्भ व स्वतंत्र अहेरी जिल्हा हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे नाविसच्या केंद्रीय अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट केले होते. आता विदर्भाचा मुद्दा भाजपने गायब केल्याने नाविससमोरची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वेगळ्या विदर्भाबाबत मतदारांना काय सांगायचे?
By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST