गेल्या काही वर्षांत जगाने सांसर्गिक आजारांच्या अनेक साथी बघितल्या. त्यातील अगदी अशात आलेल्या आणि भारतात परिणाम दाखवलेल्या साथी म्हणजे २००५चा बर्ड फ्लू आणि २००९चा स्वाइन फ्लू. यात आपले अतोनात नुकसान झाले. बर्ड फ्लूमुळे लाखो कोंबड्या मारून टाकाव्या लागल्या आणि आर्थिक फटका बसला. स्वाइन फ्लूच्या वेळी असेच भीतीचे वातावरण होते आणि हजारो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. आता आपल्यापुढे कोरोनाचे संकट उभे आहे. जॉर्ज सांतायानाने १९०५ मध्ये जे म्हटले ते खरे वाटावे अशीच आजची परिस्थिती आहे!हा लेख लिहीपर्यंत कोरोनामुळे देशात ३००० व्यक्तींना लागण झाली असून त्यापैकी ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. जगासाठी ही संख्या अनुक्रमे १०,९८,८४८ आणि ५८,८७१ अशी आहे. जगातील इटली, इराण, स्पेन आणि अमेरिका अशा अनेक देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती बरी असली तरी हेही लक्षात घ्यायला हवे की आपण अपघाताने या संकटात सापडलो आहोत आणि या देशांच्या तुलनेत आपल्याला तयारीसाठी जास्तीचा वेळही मिळालेला आहे.
२४ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाउनचे भविष्यात अनेक आर्थिक दुष्परिणाम होणार आहेतच. पण नाइलाज म्हणून आपल्याला हे करावे लागले आहे. १४ एप्रिलनंतर काय, हा एक भयंकर प्रश्न वैद्यकीय आणि प्रशासकीय धुरीणांपुढे उभा ठाकला आहे. खरेच अशी स्थिती यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली असेल. एक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ म्हणून उपरोक्त सर्व साथींमधील महत्त्वाचे साम्य म्हणजे आपल्याकडे माहिती नसणे आणि पूर्वतयारी नसणे! त्यामुळे अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये काय संशोधन प्रकाशित होते याकडे आपण डोळे लावून बसलो आहोत आणि त्यानुसार कृती कार्यक्रम ठरवत आहोत किंवा त्यात बदल करत आहोत. हवाई प्रवासावर बंदी घालावी की नाही, आणि घातल्यास कधी घालावी, लोकल ट्रेन कधी बंद करायच्या, लॉकडाउन लागू करावा की नाही, असे अनेक प्रश्न आपण घाईघाईत सोडवल्याचे जाणवते आहे! त्यामुळेच हे उपाय झाल्यावर आता पुढे काय, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक हिताच्या जाणिवेचा अभाव : आपल्या सवयी, वागण्याची पद्धत यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते याविषयी प्रचंड अज्ञान आणि एक प्रकारची बेफिकिरी समाजात दिसून येते. त्यामुळेच एखादी वलयांकित गायिका आजार लपवते, प्रख्यात हृदयशल्य चिकित्सक आजार लपवून रुग्णावर उपचार करतो, एका समाजाचे लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येतात आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाºया पोलिसांवर लोक दगडफेक करतात!पुढे काय घडेल हा लाख मोलाचा प्रश्न आहे. माझ्या मते लॉकडाउन जाहीर होण्याच्या आधी लाखो भारतीय परदेश प्रवास करून भारतात आले आणि त्यापैकी बरेच ओला, उबर, मेट्रो, लोकल अशा अनेक प्रकारे विविध ठिकाणी पोहोचले. त्यांनी अनेक हॉटेल्समध्ये मुक्काम केला. लोकल बंद करायच्या आधीच लाखो कामगार, हातावर पोट असणारे लोक मुंबई सोडून उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये निघून गेले. रोगाचा सरासरी अधिशयन कालावधी ५ ते ६ दिवस आणि जास्तीत जास्त १४ दिवस समजला तर आतापर्यंत प्रचंड प्रमाणात रुग्णांची संख्या वाढायला हवी होती. आज तरी तसे घडताना दिसत नाही. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात काही हजार रुग्ण आणि १०० पेक्षा कमी मृत्यू हे प्रमाण जागतिक आकडेवारीशी तुलना करता अतिशय कमी असेच आहे. अर्थात एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये रुग्णांची संख्या १, २ लाख होणे आणि त्यात २ ते ३ टक्के मृत्यू होणे हे साथरोग शास्त्रीयदृष्ट्या होऊ शकते. असे घडण्याचे कारण म्हणजे बहुधा कोट्यवधी लोकांना सौम्य स्वरूपात विषाणूची लागण झाली असावी आणि त्यामुळे त्यांना प्रतिकारशक्ती निर्माण झाली असावी. अर्थात काही कालावधीनंतर अॅन्टिबॉडी तपासण्यांद्वारे याबाबत खात्रीने काही बोलता येऊ शकेल. हे घडण्यात भारतातील उच्च तापमान, सार्वत्रिक बीसीजी लसीकरण, विषाणूमध्ये झालेले जनुकीय बदल, भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती अशा अनेक घटकांचा काही प्रमाणात वाटा असू शकतो.
लहानपणी आपण एक म्हण शिकलो : ‘Health is wealth’ कोरोनाच्या साथीमुळे हे अगदी शब्दश: खरे ठरले आहे! सध्याच्या साथीबद्दल मात्र मी आशावादी आहे... एका लेखकाने असे लिहिले आहे की “My life was full of miseries… most of which never happened!” असेच घडावे अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे.
डॉ. जगन्नाथ दीक्षित(लेखक हे सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आहेत.)