कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील ३०६७ मंदिरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कामकाजाच्या ‘सीआयडी’ चौकशीला बुधवारपासून सुरुवात झाली. गुन्हा अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक दीपाली काळे यांच्यासह सहाजणांची टीम या प्रकरणांचा तपास करीत आहे. अंबाबाई, जोतिबासह तीन हजार देवस्थानांचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सीआयडी चौकशीचे आदेश मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याला दिले होते. कोल्हापूर परिक्षेत्रातील गुन्हा अन्वेषण शाखेला हे आदेश मंगळवारी प्राप्त झाले. त्यानुसार बुधवारपासून देवस्थान समितीच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली. समितीच्या कामकाजाची व्याप्ती फार मोठी आहे; त्यामुळे काही दिवस केवळ समितीच्या कामकाजाची माहिती घेण्यात येणार आहे.हजारो एकर जमिनी, खंड, उत्खनन, देवस्थानांचे उत्पन्न, त्यात जमिनींची परस्पर विक्री, उत्खननातील घोटाळा, दागिन्यांच्या नोंदींत फारकत, लेखापरीक्षणच नाही असे अनेक प्रकारचे गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठ एप्रिलला हा प्रश्न लक्षवेधीद्वारे मांडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार मे महिन्यात देवस्थान समितीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. कागदोपत्री आदेशांची पूर्तता झाल्यानंतर ते कोल्हापूर क्षेत्रातील विभागाला प्राप्त झाले. देवस्थान समितीच्या कामकाजाचा व्याप खूप मोठा आहे. बुधवारपासून आम्ही चौकशीच्या कामाला सुरुवात केली आहे. प्र्राथमिक टप्प्यात समितीकडे असलेली मंदिरे, जमिनी, संपत्ती, कामकाजाची पद्धत यांची माहिती घेण्यात येणार आहे. - दीपाली काळे, उपअधीक्षक, गुन्हा अन्वेषण शाखादेवस्थानच्या सीआयडी चौकशीला अजून सुरुवात झालेली नाही. समितीच्या कामकाजाची फक्त प्राथमिक माहिती घेण्यात आलेली आहे. अद्याप आमच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची लेखी मागणी करण्यात आलेली नाही. - शुभांगी साठे, सचिव, देवस्थान समिती
पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची ‘सीआयडी’ चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 23:39 IST