कडेकोट सुरक्षा : भाजपमध्ये उत्साहनागपूर : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच नागपुरात आगमन होत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. विमानतळावरून भव्य रॅलीद्वारा त्यांना निवासस्थानापर्यंत नेण्यात येईल. यानंतर त्रिवेणी पार्क येथे त्यांचे भव्य स्वागत होईल. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरच्या त्रिकोणी पार्कमध्ये भव्य डोम उभारण्यात आला असून घरासमोर सुद्धा भव्य मंडप टाकण्यात आला आहे. मैदानातील भव्य व्यासपीठावर मुख्यमंत्री व प्रमुख पाहुणे बसतील. या स्वागत सोहळ्यात सर्वसामान्यांना देखील मुख्यमंत्र्यांचे स्वागत करता येईल. व्यासपीठावर पुष्प सजावट करण्यात आली असून परिसरातदेखील रोशनाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यानंतर विमानतळाहून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागोजागी स्वागतद्वार व कमानी उभारल्या आहेत. ही मिरवणूक धरमपेठ येथील निवासस्थानी पोहोचल्यावर येथे स्वागत सोहळा होईल. त्रिकोणी पार्क येथे सर्वसामान्यांसाठी दोन द्वार राहणार असून विशेष व्यक्तींच्या प्रवेशासाठी वेगळी व्यवस्था राहील. आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे उपस्थित राहतील. कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बागडी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)त्रिकोणी पार्ककडे वाहनांना बंदी काशिनाथ फडणवीस मार्ग-कांचन कीर्ती गल्ली-सुयश मेडिकल गल्ली-मामा रोड येथे सिंगल लेन पार्किंग राहील. टिळकनगर मैदानात वाहने पार्क करता येईल. कॉफी हाऊस चौक-मयुर स्टेशनरी ते त्रिकोणी पार्क आणि लक्ष्मी निवास-अग्रेसन मार्ग ते त्रिकोणी पार्क दरम्यान सकाळी ११ ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहनांना बंदी राहील.
नागपूरकर करणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत
By admin | Updated: November 2, 2014 00:59 IST